– अजिंक्य उजळंबकर

लॉकडाऊन झाले आणि जग थांबले. पॉझ झाले. जो जिथे आहे तिथेच…  थांबला, अडकला, पॉज झाला. पण न थांबणे, चालत राहणे व पुन्हा अनपॉज्ड होणे हा मनुष्याचा स्थायी स्वभाव आहे. याच स्थायी स्वभावा भोवती फिरणाऱ्या ५ कथांचा एकत्र संग्रह करून नुकताच अमेझॉन प्राईम व्हिडीओ वर अनपॉज्ड नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. लॉकडाऊन हे या सर्व कथांचे केंद्रस्थान आहे. अचानक आलेल्या संकटकाळी तुम्ही-आम्ही जरी काही करू शकत नसलो तरी संकटाचा धीराने मुकाबला करणे व त्यातून मार्ग काढत अवतीभोवतीच्या नातेसंबंधांना जपणे अशा आशयाच्या या पाच कथा आहेत. पाच पैकी तीन कथा निश्चितच छान जमल्या आहेत. 

‘ग्लीच’ या पहिल्या कथेत दिग्दर्शक राज आणि डीके या जोडीने. व्हायरस मुळे भविष्यात (साधारणतः अजून १० वर्षांनी) काय परिस्थिती निर्माण होते व त्यातून एक प्रेमी युगल व्हर्च्युअल डेटिंग करून कसा मार्ग काढते हे दाखविण्याचा प्रयत्न केलाय. प्रेमीयुगलाच्या भूमिकेत सयामी खेर व गुलशन देवैय्या या दोघांनी काम चांगले केले असले तरी लेखकाच्या साधारण लेखनामुळे ग्लीच ही कथा फारशी कनेक्ट होत नाही. पाच कथांमधील पहिलीच असली तरी ही सर्वात विकेस्ट अर्थात दुबळी कथा आहे. 

दुसरी येते ‘अपार्टमेंट’ ज्याचे दिग्दर्शन निखील अडवाणी सारख्या मातब्बर दिग्दर्शकाने केले आहे. लॉकडाऊन सुरु होण्याच्या अगदी तोंडावर एका सुप्रसिद्ध ऑनलाईन मासिकेच्या संपादक महिलेच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात एक मोठे वादळ येते. तिच्या नवऱ्यावर तिच्याच टीममधील दोन सहकारी महिला लैंगिक शोषण केल्याचे आरोप करतात. यातून नैराश्यात गेलेली ही मासिकाची संपादक महिला लॉकडाऊन दरम्यान दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते पण दोन्ही वेळेस तिच्या अपार्टमेंट समोर राहणाऱ्या एका व्यक्तीमुळे हा प्रयत्न अयशस्वी होतो. हा अनोळखी मनुष्य तिला धैर्य देतो व पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करण्याची विनंती करतो. संपादक महिलेच्या भूमिकेत रिचा चड्ढा ने छान काम केले आहे. अनोळखी शेजारी म्हणून ईश्वक सिंग आहे तर फसविणाऱ्या नवऱ्याच्या रोलमध्ये सुमित व्यास. ही कथा तुम्हाला बऱ्यापैकी खिळवून ठेवते. 

तिसरी शॉर्ट स्टोरी आहे ‘रॅट-ए-टॅट’ जिचे दिग्दर्शन केलंय तनिष्ठा चॅटर्जीने. यात लिलेट दुबे ही मुंबईत एकटी राहणारी अर्चना नावाची वयस्क महिला आहे जिच्या शेजारी लॉकडाऊन दरम्यान एक तरुण मुलगी प्रियांका (रिंकू राजगुरू) राहण्यास येते. अर्चना यांच्या आयुष्यात असलेले एकटेपण हळूच प्रियांकाच्या येण्याने दूर होते तर घरच्यांच्या विरोधाला ना जुमानता मुंबईत करिअर बनवायला आलेली प्रियांका अर्चना यांच्या सल्ल्याने पुन्हा घरच्यांच्या संपर्कात येते. दिग्दर्शक तनिष्ठाने लिलेट व प्रियंकाकडून काम चांगले काढून घेतले आहे परंतु पटकथेत भावस्पर्शी प्रसंगांची व तश्याच संवादांची कमी पडल्याने ही कथा चांगली असूनही फारशी स्पर्शून जात नाही. 

Unpaused Amazon Prime Video Movie Poster

चौथी व सर्वात जास्त इम्पॅक्ट करणारी शॉर्ट स्टोरी आहे ‘विषाणू’ जिचे दिग्दर्शन केलं आहे पाताल लोक वेब सिरीजचा प्रगल्भ दिग्दर्शक अविनाश अरुणने. लॉकडाऊन मुळे परराज्यातील मजूर लोकांची मुंबईत अडकल्यावर झालेली अवस्था दाखविण्यासाठी यात एका मजूर कुटुंबाची कहाणी दाखविण्यात आली आहे. या कुटुंबाला परत आपल्या राज्यात जायचे आहे परंतु घरदार गमावलेले हे नवरा-बायको व त्यांचा लहान मुलगा लपून एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या रेडी सॅम्पल फ्लॅट मध्ये रहात असते. अभिषेक बॅनर्जीने साकारलेला मनीष नावाचा मजूर कमालीचा रंगतदार झाला आहे. काही दिवसांसाठी का होईना पण नवऱ्यासोबत अचानक राहायला मिळालेल्या आलिशान घरात स्वप्नरंजन करणाऱ्या त्याच्या बायकोच्या भूमिकेत गीतिका विद्या ओहल्याननेही सुंदर काम केले आहे. पाच कथांमध्ये सर्वोत्कृष्ट वाटणारी ही कथा आहे. 

पाचवी व शेवटची शॉर्ट स्टोरी ‘चाँद मुबारक’ सुद्धा या पाच कथांचा अपेक्षित लास्टिंग इम्पॅक्ट क्रिएट करण्यात यशस्वी झाली आहे. साधं कथानक आहे. उमा (रत्ना पाठक शाह) या वयस्क व तिच्या प्रिय जुळ्या भावाच्या निधनानंतर एकट्या पडलेल्या महिलेच्या आयुष्यात लॉकडाऊन मध्ये तिला मदत करणारा एक रफीक (शार्दूल भारद्वाज) नावाचा रिक्षावाला येतो. रफीक चे कुटुंबीय त्याच्यापासून दूर आहेत. रमझान चा महिना चालू आहे व ईद जवळ आली आहे. रफीकला घरी जाण्याची ओढ लागली आहे. रफीकने केलेल्या मदतीमुळे उमाला रफीकमध्ये आपला भाऊ सापडतो व ईदच्या दिवशी ईदी म्हणून साधा मोबाईल बाळगणाऱ्या रफीकला उमा कुटुंबियांशी बोलण्यासाठी म्हणून स्मार्ट फोन देते. रफीकला नवी आपा मिळते व कथा संपते. बऱ्याच आंतरराष्ट्रीय पातळीच्या सिनेमांमध्ये सहाय्य्क दिग्दर्शन करणारी व २०१६ सालच्या बार बार देखो या सिनेमाची दिग्दर्शिका नित्या मेहराने चाँद मुबारक या शॉर्ट स्टोरीचे दिग्दर्शन केले आहे जेकी मनाला भावून जाते. रत्ना पाठक शाह व शार्दूल दोघांनीही छान काम केलंय. 

लॉकडाऊन व त्यादरम्यान समाजातील विविध स्तरातील लोकांना कराव्या लागलेल्या संकटांचा सामना असा आशय असणाऱ्या कथांचा संग्रह म्हणजेच अनपॉज्ड हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे. पाच दिग्दर्शकांनी व त्यांच्या टीमने मिळून केलेला. प्रयत्न कौतुकास्पद आहे. एक अजिबात ना भावणारी, एक अजून छान होऊ शकली असती अशी व तीन उत्तम जमलेल्या कथांचा हा संग्रह एकदा अनुभव घेण्यासारखा नक्कीच आहे. कुठलाही पॉज न घेता. 
 

Ajinkya Ujlambkar
+ posts

3 Comments

  • Anil Boralkar
    On December 27, 2020 7:39 pm 0Likes

    Wonderful revIews
    I will watch the movie now

Leave a comment