-धनंजय कुलकर्णी

साधारणत: शंभर वर्षापूर्वी १९२० च्या दशकांत पुण्यातील काही समविचारी कवींनी एकत्र येऊन ‘रविकिरण मंडळ’ स्थापन केले होते. रविकिरण मंडळात एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने काव्यलेखन करण्याचा प्रयोगही झाले. त्यांच्या या कवी मंडळाला ‘सन टी क्लब’ असे नामाभिधानही देण्यात आलेले होते. मराठी कवितेला प्रसिद्धी मिळवून देण्यात रविकिरण मंडळाचा मोठा वाटा आहे. रविकिरण मंडळाच्या माध्यमातून कविता सर्वसामान्य रसिकांपर्यंत जाउन पोहोचली.  हे मंडळ १९३५ पर्यंत कार्यरत होते. मराठी कवितेतील सौंदर्यवादी धारा दृढमूल करण्यात आणि ती समाजाभिमुख करण्यात रविकिरण मंडळाचे श्रेय फार मोठे आहे. या कवींनी काव्यगायनाची प्रथा सुरू केली.पण याच काव्यगायनाचे खरे कार्य १९३५ सालानंतर मोठ्या प्रमाणात वेगळ्या पध्दतीने  सुरू झाले ते भावगीत गायनातून. जी. एन. जोशी, जे. एल. रानडे, गजाननराव वाटवे, दत्त वाळवेकर, बबनराव नावडीकर, गोविंद पोवळे  असे दमदार भावगीत गायक तयार झाले. गजानन वाटवे (Singer and Music Composer Gajanan Watve) या भावसंगीत विद्यापीठाचे कुलगुरू ठरले. ८ जून १९१७ मध्ये बेळगावात जन्मलेल्या वाटवे यांनी संगीतसाधना करण्यासाठी वयाच्या पंधराव्या वर्षीच आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन घर सोडले व पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयात ते दाखल झाले. ‘गोपाळ गायन समाज’ चे गोविंदराव देसाई यांनी त्यांच्या संगीत शिक्षणाची व्यवस्था केली. एक संपूर्ण पिढी त्यांच्या स्वरांनी आणि सुरांनी नादावली आणि त्याच बरोबर  त्यातून निर्माण झालेलं रसिक मन पुढच्या अनेक पिढ्यात झिरपत राहिलं. त्या निमित्ताने त्यांच्या सुरील्या कालखंडाची  नव्या पिढीला देखील ओळख व्हावी म्हणून हा लेख प्रपंच. (Remembering Gajanan Watve one of the finest singer and music composer of Marathi Music World)

तो काळ मोठा स्थित्यंतराचा होता . राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठे मन्वंतर घडत होते. देशात स्वातंत्र्याची चळवळ टिपेला पोचली होती. जगात दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजायला सुरू वात झाली होती. मूकापटाचा अस्त होवून बोलपटाचा उदय झाला होता. बोलणाऱ्या सिनेमाच्या आगमनाने संगीत नाटकांना ओहोटीचे दिवस आले होते. उच्च प्रतीच्या इंग्रजी/मराठी  साहित्याने रसिक मन तृप्त होत होते. त्या साहित्यातील हळुवार प्रेम, शृंगार, विरह , मिलन अशा भावनांनी रसिक मन अधीर झाले होते. मराठीतही साहित्याच्या दुनियेत नवी पालवी फुटत होती. रविकिरण मंडळ हा त्याचाच एक भाग होता. नेमकं या मोक्याच्या क्षणी गजानन वाटवे यांचा उदय झाला. १९३७ साली पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये त्यांच्या काव्य गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम झाला.(तब्बल सात रुपये मानधन त्यांना मिळाले!) तरूणाईने प्रचंड गर्दी केली होती. वाटवे यांनी माधव ज्युलियन  यांची ‘आई’ हि कविता मोठ्या भावोत्कट स्वरात गात होते. समोर प्रेक्षकांमध्ये एक तरूण मुलगी होती. तिची आई नुकतीच वारली होती. ती मुलगी कविता ऐकताना इतकी भावूक झाली की प्रचंड दु:खाने चक्कर येवून पडली! पहिल्याच कार्यक्रमात अशी घटना घडल्याने वाटवे यांच्या कार्यक्रमाची लोकप्रियता अफाट वाढली. त्यांचे लखलखीत शब्दोच्चार भावोत्कट स्वररचना आणि अर्थासहित भावनेनं गायलेली  कविता रसिकांना आपली वाटत होती. नाटक सिनेमाचे दर सामान्याना परवडत नसत त्यामुळे वाटवे यांच्या कार्यक्रमातून, मेळ्यातून मिळणारा हा अस्सल काव्यानंद आणि तो ही मोफत म्हणजे रसिकांना पर्वणीच होती. गणेशोत्सवातील दहाही दिवस हमखास बुकिंग असणारे वाटवे हे त्या काळातील एक अत्यंत मोठे सेलिब्रिटी आर्टिस्ट होते. गजाननराव वाटव्यांच्या कार्यक्रमांना त्या काळात होणारी गर्दी इतकी अफाट असायची की कधी कधी पोलिसांना पाचारण करावे लागे. प्रत्येक कार्यक्रमात एक तरी नवे गीत सादर करण्याची त्यांची परंपरा होती. शास्त्रीय संगीताच्या फारशा वाट्याला न जाता आणि ताना, हरकतीयाना पूर्णपणे फाटा देत, शब्दांना धरून चालणारी स्वररचना आणि प्रवाही भावोत्कट स्वर यामुळे वाटवे यांची भावगीते खूपच भावली. कवितेवर स्वरांची कुरघोडी होणार नाही याची ते दक्षता घेत.  त्यांच्या गाण्यात स्वरांचा जो ओलावा होता, तो रसिकांना अधिक भिडत होता. गाण्याचे जाहीर कार्यक्रम करून वाटवे त्या काळी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. १९३७ ते १९९४ अशी तब्बल ५७ वर्षे वाटवे गाण्याचे कार्यक्रम करीत असत. जुने ते सोनेच पण नवीन काही कथिल नाही अशी त्यांची भावना होती. नव्या कवींच्या कित्येक रचनांना त्यांनी स्वराबध्द केले.

३ सप्टेंबर १९३९ ही तारीख ‘इंग्रज सरकारची दुसऱ्या महायुद्धाची घोषणा साठी प्रसिध्द असली तरी हा दिवस वाटवे यांच्या आयुष्यात संस्मरणीय ठरला कारण याच दिवशी ते मुंबई आकाशवाणीवर पहिल्यांदा गायले आणि याच दिवशी एच एम व्ही कडे त्यांनी ‘वारा फोफावला’ हे गीत रेकोर्ड केले. या फोफावलेल्या वाऱ्याने मग कधी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या भावगीताने पुढची ३० वर्षे झपाटली गेली. ‘गगनी उगवला सायंतारा’, ‘चंद्रावरती दोन गुलाब’, ‘कसा गं बाई झाला कुणी गं बाई राधे तुझा सैल अंबाडा’, ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’, ‘गेला दर्यापार घरधनी’, ‘आई तुझी आठवण येते’, ‘गर्जा जयजयकार’, ‘ती पाहा ती पाहा बापूजींची प्राणज्योती..’ ‘फांद्यावर बांधिले गं मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला, डोळे माझे ओले’ कुंभारा सारखा गुरू नाही या त्यांच्या गीताने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. ‘बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदीर एक विशाल यमुना काठी ताजमहाल’, ‘गगनी उगवला सायंतारा’, ‘मोहुनिया तुजसंगे नयन खेळलो जुगार’, अशा अनेक रचनांतून ‘वाटवे-युग’ निर्माण झाले, गाजले. त्या काळातली अनेक स्त्री गीते वाटवे स्वत: च गात ती देखील बेफाम लोकप्रिय ठरली. ’कुणी ही पाय नका वाजवू’’रानात सांग कानात आपुले नाते मी भल्या पाहते येते’निरंजन पडले तबकात’,’ मैत्रिणी नो सांगू नका नाव घ्यायला‘, ‘नका गडे माझ्याकडे पाहू  हि गाणी त्यातील गोडव्याने आजही गुणगुणावीशी वाटतात.

 

मनमोहन नातू, ग दि माडगूळकर, राजा बढे, बाबूराव गोखले, कवी सुधांशू, अनिल भारती, वसंत बापट, भा. रा. तांबे, गिरीश, सोपानदेव , ना घ देशपांडे , सुरेश भट या सुवर्णयुगातील कवी पासून थेट अलीकडच्या च्या काळातील, रमण रणदिवे, जयंत भिडे, संगीता बर्वे या जवळपास अडीचशे  कवींच्या हजारो रचनांना अण्णांनी स्वरबद्ध केलं. नव्या पिढीतील अनेकांना त्यांनी आपल्या संगीतात गाण्याची संधी दिली.

गीत रामायाणा तील ‘बोलले इतुके मज श्रीराम’ हे सुमंताच्या तोंडी असलेले गीत वाटवे यांनी गायले होते. ते चित्रपटात फारसे रमले नाही. काव्य गायक हीच त्यांनी आपली प्रतिमा ठेवली. फक्त हार्मोनियम आणि तबला च्या साथीने त्यांनी एक युग निर्माण केलं. कुमार गंधर्वासारख्या प्रतिभावंतानेही त्यांच्या देवासमधल्या घरी गजाननरावांना खास बोलावून त्यांची मैफल जमविली होती, याचे कारणच वाटवे भावसंगीतातील एका घराण्याचे संस्थापक होते संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना ‘दिनानाथ मंगेशकर’,‘लता मंगेशकर’, ‘सुशीलस्नेह’, ‘युग प्रवर्तक’ आदींसह गदिमा प्रतिष्ठानचा पुरस्कारही मिळाला आहे. ‘गगनी उगवला सायंतारा’ हे आत्मचरित्र व ‘निरंजनातील वात’ हे त्यांच्या गीतांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. सदैव तरुणात रमणारा आणि सतत नाविन्याची आस असलेला हा कलावंत २ एप्रिल २००९ साली वयाच्या ९२ व्या वर्षी भावगीतांच्या दुनियेला अलविदा म्हणत निघून गेला.

गजानन वाटवे यांच्या  भावगीतावरून घेतलेल्या  व अफाट लोकप्रिय  ठरलेल्या दोन हिंदी गाण्यांची आठवण करून देतो. हि गाणी एवढी गाजली की त्याचं  मूळ ज्या भावगीताच्या चालीत आहे ते भावगीत देखील लोकांना आठवत नाही. गजानन वाटवे यांचं एक भावगीत चाळीसच्या दशकात आलं होतं ’फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’ (कवी ग दि मा ) या चालीवर बेतलेली दोन गाणी पहा. एक होतं बी आर चोप्रांच्या ’धूल का फूल’ (१९५९) मधील  ’झुकती घटा गाती हवा सपने सजाये नन्हा सा दिल मेरा मचल मचल जाये’(सं एन दत्ता) आणि दुसरं गाणं होतं राज कपूर नर्गीस च्या शंकर जयकिशनने संगीत दिलेल्या ’ चोरी चोरी’(१९५६) मधील ’पंछी बनू उडती फिरू मस्त गगन मे आज मै आजाद हूं दुनिया के चमन में …’ गजानन वाटवे रॉक्स!

 

Dhananjay Kulkarni
+ posts

1 Comment

  • DR DIWAKAR D KULKARNI
    On June 8, 2021 8:04 am 0Likes

    Excellent vintage collection! Dhanu, your writings, way of explanation and presentation style everything is marvelous! We, the Mandakhalikars are proud of you!

Leave a comment