-©अशोक उजळंबकर

आज निर्माता-दिग्दर्शक बासू चॅटर्जी (Basu Chatterjee) यांची पहिली पुण्यतिथी आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी बासुदांनी एक्झिट घेतली होती. बासू चॅटर्जी यांचे नाव आठवले कि लगेच काही चित्रपट डोळ्यासमोर उभे राहतात. त्यापैकी ‘रजनीगंधा’, ‘स्वामी’, ‘अपने पराये’, ‘चितचोर’ हे खास चित्रपट म्हणावे लागतील. या सर्व चित्रपटांच्या कथानकावर नजर टाकल्यास असे लक्षात येते कि हे सर्व चित्रपट मध्यमवर्गीय कथानकाभोवती फिरत राहतात. पटकथाकार, संवाद लेखक, सहाय्यक दिग्दर्शक, दिग्दर्शक ते निर्माता असा बासू चॅटर्जी यांचा प्रवास होता. बासू चॅटर्जी यांच्या प्रत्येक चित्रपटास मध्यमवर्गीय प्रेक्षक गर्दी करीत असत. बॉक्स ऑफिस खिडकीवर नजर न ठेवता सामान्य प्रेक्षकांकडे पाहून आपली चित्र निर्मिती करणारा हा दिग्दर्शक. आज त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र शब्दांजली (Remembering the finest director of Hindi cinema Basu Chatterjee)

—————————————————————

राजस्थान मधील अजमेर येथे १० जानेवारी १९३० रोजी यांचा जन्म झाला. चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून येण्यापूर्वी त्यांनी ‘सरस्वती चंद्र’, ‘तिसरी कसम’ या चित्रपटाकरिता सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. गोविंद सरैया यांनी ‘सरस्वती चंद्र’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते तर बासू भट्टाचार्य हे ‘तिसरी कसम’चे दिग्दर्शक होते. राष्ट्रीय पुरस्कारात ‘तिसरी कसम’ने बाजी मारली होती तर ‘सरस्वती चंद्र’ हा चित्रपट देखील राष्ट्रीय स्तरावर गाजला. अशा नामवंतांच्या हाताखाली काम केल्यावर बासूदा यांनी १९६९ साली आकाशाला गवसणी घातली. ‘सारा आकाश’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. या चित्रपटाची पटकथा त्यांची होती तर सर्व कलावंत नवीन होते. राकेश, मधू, नंदिता या नव्या कलावंतासोबत त्यांनी ‘सारा आकाश’ पूर्ण केला. संगीताची बाजू सलील चौधरी यांनी संभाळली होती. ©

त्यानंतर १९७२ मध्ये मराठी मधील ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटाची हिंदी आवृत्ती ‘पिया का घर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. जया भादुरी, अनिल धवन यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात होत्या तर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले होते. मुंबई मध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबाची छोट्या घरात राहताना कशी त्रेधा उडते याचे सुरेख चित्रण या चित्रपटात होते. ‘पिया का घर’ रसिकांना आवडला.

त्यानंतर आलेल्या ‘उस पार’ या चित्रपटास मात्र मर्यादित यश मिळाले. विनोद मेहरा, मौसमी चटर्जी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. परंतु १९७४ साली आलेल्या ‘रजनीगंधा ‘ या चित्रपटाने बासूदा यांची खरी ओळख निर्माण झाली. या चित्रपटाची पटकथा त्यांचीच होतीय. अमोल पालेकर, विद्या सिन्हा, दिनेश ठाकूर यांचा अभिनय व सलील चौधरी यांचे संगीत यामुळे ‘रजनीगंधा’ खूपच गाजला. त्याकाळी महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी या चित्रपटाला खूप गर्दी केली होती. ©

रवींद्र जैन यांच्या संगीतामधील युवा पिढीला आवडतील अशी गाणी ‘चितचोर’ मध्ये ऐकायला मिळाली. पुन्हा एकवार अमोल पालेकर, जरीना वहाब व मा. राजू यांचा अप्रतिम अभिनय पाहायला मिळाला. बी आर. चोप्रा यांनी आपल्या ‘छोटी सी बात’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा बासूदा यांना दिली व बासुदांनी ती अत्यंत यशस्वीरीत्या सांभाळली. ‘रजनीगंधा’ नंतर अमोल पालेकर-विद्या सिन्हा हे हिट कॉम्बिनेशन, साधी सरळ कथा, श्रवणीय गीते यामुळे ‘छोटीसी बात’ सुपरहिट ठरला.

‘खट्टा मीठा’ या चित्रपटाची पटकथा बासूदा यांचीच होती. रोमु सिप्पी निर्मित या चित्रपटात राकेश रोशन, बिंदिया गोस्वामी, अशोक कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या तर राजेश रोशन यांनी संगीताची बाजू सांभाळली होती. ©

त्यानंतर आलेल्या ‘प्रियतमा’, ‘सफेद झूठ’ चित्रपटास फारसे यश मिळाले नाही परंतु ‘स्वामी’ या चित्रपटास राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. राजेश रोशन यांच्या संगीतामधील स्वामीची गाणी गाजली. शबाना आझमी, गिरीश कर्नाड यांचा अभिनय देखील अप्रतिम होता. ‘तुम्हारे लिए’, ‘दिल्लगी’ हे चित्रपट बडे कलावंत असनू देखील फारसे व्यावसायिक यश मिळवू शकले नाहीत. ‘दिल्लगी’ या चित्रपटात धर्मेंद्र, हेमा मालिनी ही जोडी होती. पटकथा बासूदा यांचीच होती.

अमिताभ बच्चन-‘मंझिल’, देव आनंद-‘मनपसंद’, राजेश खन्ना-‘चक्रव्यूह’ या चित्रपटांचे दिग्दर्शन बासुदांनीच केले होते. अमोल पालेकर, टिना मुनीम यांच्या ‘बातो बातो में’ ला बरे यश मिळाले होते. नंतरच्या काळात ‘रत्नदीप’, ‘अपने पराये’, ‘लाखों कि बात’, ‘पसंद अपनी अपनी’ हे चित्रपट आले. याच काळात त्यांच्या ‘शौकीन’, ‘हमारी बहू अल्का’ या चित्रपटाने रौप्य महोत्सव केला. अशोक कुमार, उत्पल दत्त, ए.के.हंगल या तीन ज्येष्ठ कलावंतांची तरुणाई ‘शौकीन’ मध्ये पाहायला मिळाली तर कौटुंबिक ड्रामा म्हणून ‘हमारी बहू अल्का’ या चित्रपटास मध्यमवर्गीयांनी गर्दी केली. ‘चमेली कि शादी’ मध्ये अनिल कपूर, अमृता सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. बासू चॅटर्जी यांचा गाजलेला व व्यावसायिक यश मिळवलेला शेवटचा चित्रपट म्हणून ‘चमेली कि शादी’ या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. ©

‘एक रुका हुवा फैसला’ ही दूरदर्शनकरिता तयार केलेली चित्रनिर्मिती होती. तर १९९० साली दाखल झालेला ‘कमला कि मौत’ समीक्षकांनी गौरविला होता. संवाद लेखक म्हणून बासू चॅटर्जी यांनी ‘लाखों कि बात’, ‘हमारी बहू अल्का’, ‘दिल्लगी’, ‘खट्टा मिठा’, ‘रजनीगंधा’, ‘पिया का घर’ या चित्रपटाकरिता काम केले तर निर्माता म्हणून बासू चॅटर्जी यांनी ‘उस पार’, ‘बातों बातों में’,’ पसंद अपनी अपनी’, ‘लाखों कि बात’, ‘एका रुका हुवा फैसला’ या चित्रपटाची निर्मिती केली.

दूरदर्शनकरिता दिग्दर्शक म्हणून त्यांनी प्रिया तेंडुलकर अभिनित ‘रजनी’ हि मालिका खूपच गाजली. तर ‘दर्पण’, ‘कक्काजी कहीं’, ‘व्योमकेश बक्षी’ या मालिका गाजवल्या. बंगाली मध्ये ‘त्रिशंकू’, ‘होचेताकी’, ‘तक झल मिष्टी’, ‘चुपी-चुपी’ हे चित्रपट त्यांनी केले. फिल्मफेअर तर्फे १९७२ साली ‘सारा आकाश’ या चित्रपटाच्या पटकथेकरिता सन्मान मिळाला. त्यानंतर ‘स्वामी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून १९७७ साली तर ‘रजनीगंधा’, ‘छोटीसी बात’, ‘जिना यहां’, ‘कमला कि मौत’ करिता फिल्मफेअर तर्फे सन्मान मिळाला. २००७ साली आयफा तर्फे ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ देण्यात आले. ©

ह्रिषीकेश मुखर्जी, बसू भट्टाचार्य, बिमल रॉय, असित सेन या सर्व बंगाली दिग्दर्शकांकडे काम करीत त्यांनी आपले वेगळे विश्व निर्माण केले. ‘स्वच्छ व कौटुंबिक चित्रपट’ अशी त्यांच्या चित्रपटाची व्याख्या केली तर चुकीचे होणार नाही. संपूर्ण कुटुंबालाच नव्हे तर युवा वर्गाला देखील त्यांनी आकर्षित केले होते. प्रत्येक चित्रपटात काहीतरी वेगळे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ‘कुछ खट्टा कुछ मिठा’ हा त्यांचा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला परंतु हिंदी चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग एव्हाना बदलला होता त्यामुळे बासूदा यांनी माघार घेतली. मॉस्को येथे झालेल्या १९७७ च्या चित्रपट महोत्सवाचे ज्युरी म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांची कन्या रुपाली गुहा हि पण दिग्दर्शिका आहे. ‘फिल्मकार्य’ या बॅनरखाली चित्रनिर्मिती व अनेक दूरदर्शन मालिकांची निर्मिती तिने केली आहे. मध्यम वर्गीय कौटुंबिक प्रेक्षकांची दखल घेणारा दिग्दर्शक म्हणून बासू चॅटर्जी यांची खास ओळख नेहमीच राहणार यात शंका नाही.

हेही वाचा –

  • जादू ९० च्या दशकाची... साल १९९०
  • Attack | Official Trailer
  • जन्मदिन विशेष-सी रामचंद्र-अण्णांचा धमाका!
  • दिलीप-राज-देव ते जितेंद्र-स्टार्स व त्यांच्या स्टाईल्स
  • अनपॉज्ड
  • स्मृतिदिन विशेष .. सिनेसृष्टीतील सुवर्णपर्ण पद्मश्री श्रीदेवी...

 

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment