त्या वर्षी आजच्या दिवशी.. कभी कभी ची ४५ वर्षे.

-अजिंक्य उजळंबकर

सेहवाग, विराट अथवा सौरव यापैकी कोणीही राहूल द्रवीड सारखं शांत, संयमित व सुसंस्कृत क्रिकेट खेळतांना कसे दिसतील ? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला असेल आणि त्याचे उत्तर तुम्हाला सापडले नसेल तर त्या प्रेक्षकांनी ‘कभी कभी’ मधला अमिताभ आपल्या डोळ्यासमोर आणावा असे मला नेहमी वाटते. बरोबर ४५ वर्षांपूर्वी, आजच्या दिवशी १९७६ साली, ‘कभी कभी’ प्रदर्शित झाला होता. एकाच वर्षापूर्वी म्हणजे १९७५ साली पोलीस इन्स्पेक्टर च्या रूपात ज्या रवी वर्माने आपल्या अंडरवर्ल्ड भाई विजयला ‘मेरे पास माँ है’ असे उत्तर दिले होते अथवा ‘भाई तुम साईन करोगे या नहीं?’ असा ओरडून प्रश्न विचारला होता तोच भाऊ १९७६ साली, घरंदाज आर्किटेक्ट बनला ज्याची पत्नी असते एका प्रसिद्ध उर्दू शायरची पूर्वाश्रमीची प्रेयसी. आणि तो उर्दू शायर म्हणजे ‘दिवार’चा विजय अर्थात बीग बी अमिताभ बच्चन. शशी कपूरला आपण कोणत्याही अवतारात बघू शकतो पण त्याकाळी अँग्री यंग मॅन च्या इमेजला ब्रेक देत चक्क एका शायर च्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर उभी करण्याची जोखीम केवळ दिग्दर्शक यश चोप्राच उचलू शकत होते. विशेष म्हणजे ‘दिवार’ चे दिग्दर्शन सुद्धा त्यांचेच होते. दिग्दर्शक म्हणून यश चोप्रा यांची ‘कभी कभी’ ही नववी कलाकृती जरी असली तरी निर्माता या रोलमध्ये १९७३ च्या ‘दाग’ नंतर ते दुसऱ्यांदा उभे होते.पत्नी पामेला चोप्रा हिने लिहिलेल्या कथानकाला रुपेरी पडद्यावर आणण्याकरिता. 

पामेला चोप्रा यांच्या कथेला पटकथेत रुपांतरीत केले सागर सरहदी यांनी. संवाद सुद्धा त्यांनीच लिहिले ज्यासाठी त्यांना उत्कृष्ट संवादलेखक म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. कभी कभी आजही ओळखला जातो तो त्याच्या गीत-संगीतासाठी. अर्थात साहिर यांची भावपूर्ण गीते व खय्याम यांचे मधुर संगीत. गीतकार साहीर व यश चोप्रा यांची घट्ट मैत्री होती. यश चोप्रांच्या १९७३ च्या ‘दाग’मध्येही राखी यांची प्रमुख भूमिका होती. त्याच वेळी यशजींच्या डोक्यात कभी कभी चा विचार सुरु झाला होता आणि त्यासाठी त्यांनी राखी यांचा होकार तेंव्हाच मिळवला होता. परंतु दरम्यान राखी यांचे गीतकार गुलजार यांच्यासोबत लग्न झाले. राखी यांनी अभिनयातून निवृत्ती घ्यावी अशी गुलजार यांची इच्छा होती त्यामुळे यशजींना शूटिंग सुरु करता येऊ शकत नव्हते. दुसऱ्या कुण्या अभिनेत्रीला यशजी घेण्यास तयार नव्हते. त्यांना अमित या शायरची प्रेयसी पूजा या भूमिकेसाठी राखीच हव्या होत्या. अखेर गुलजार यांनी यशजींच्या विनंतीला ग्रीन सिग्नल दिला आणि ‘दिवार’ नंतर लगेच यशजींनी कभी कभीचा प्रोजेक्ट हातात घेतला. 

kabhi kabhie

कथेचा नायक शायर… ज्याची प्रेमकहाणी अधुरी राहते. असा सर्व माहोल असल्यावर त्या शायराना गीतांना संगीत देणारा संगीतकारही तितकाच ताकदीचा हवा हे यशजी जाणून होते. कभी कभी च्या आधी खय्याम यांच्या खात्यात बरीच वर्षे कुठले मोठे व्यावसायिक हिट चित्रपटाचे नाव जमा नव्हते. असे असले तरीही यशजींना खय्याम यांच्या प्रतिभेविषयी अजिबात शंका नव्हती त्यामुळे त्यांनी कभी कभी ची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. साहिर यांच्या हरेक अर्थपूर्ण व कथेशी प्रासंगिक अशा रचनेला खय्याम यांनी आपल्या जादुई संगीताने असे काही सजवले की बस्स. ‘मैं पल दो पल  का शायर हूँ’, ‘तेरा फूलों जैसा रंग’, ‘मेरे घर आई एक नन्ही परी’, ‘प्यार कर लिया तो क्या, प्यार है खता नहीं’, ‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नज़ारे हम क्या देखें’ व सर्वात महत्वपूर्ण गाणे जे आजही हिंदी संगीताच्या जगतात एक अजरामर गीत म्हणून समजले जाते असे ‘कभी कभी मेरे दिलमें ख़याल आता है’ अशी एकाहून एक गाणी साहिर यांनी रचली व खय्याम यांनी त्याला संगीतबद्ध केले. ‘कभी कभी मेरे दिलमें’ या गाण्याने साहिर व गायक मुकेश यांना त्यावर्षीचा उत्कृष्ट गीतकार व उत्कृष्ट गायक हा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला तर खय्याम ठरले त्यावर्षीचे उत्कृष्ट संगीतकार. 

kabhi kabhie

खय्याम यांच्यासोबत स्पर्धेत होते कल्याणजी आनंदजी (बैराग), आर.डी. बर्मन (मेहबुबा), रवींद्र जैन (चितचोर) व मदन मोहन (मौसम). स्पर्धा तगडी होती परंतु खय्याम यांनी बाजी मारली. साहिर यांनी सुद्धा गुलजार (दिल ढुंढता है-मौसम) व आनंद बक्षी (मेरे नैना सावन भादो-मेहबुबा) सारख्या मातब्बर स्पर्धकांना हरवून बाजी मारली होती. खरी मजा आली होती मुकेश यांची. कारण त्यांना स्पर्धा देणाऱ्या स्पर्धकांमध्ये येसूदास व महेंद्र कपूर व्यतिरिक्त इतर दोघेही मुकेशच होते. एक मुकेश गात होते ‘एक दिन बीक जायेगा माटी के मोल’, तर दुसरे मुकेश गात होते ‘कभी कभी’ मधील ‘मैं पल दो पल का शायर हूँ’. या चौघांना हरवून ‘कभी कभी मेरे दिलमें’ गाणाऱ्या मुकेश यांनी फिल्मफेअर वर विजय प्राप्त केला. ‘कभी कभी’ला या व्यतिरिक्त १३ फिल्मफेअर पुरस्कार श्रेणीत नामांकनं मिळाली होती. बिनाका गीतमालेच्या वार्षिक कार्यक्रमात ‘कभी कभी मेरे दिलमें’ गाण्याने प्रथम क्रमांक पटकाविला होता. साहिर आणि खय्याम यांच्या चित्रपट कारकिर्दीत कभी कभी हा एक ‘माईलस्टोन’ म्हणून आजही ओळखला जातो. यानंतर खय्याम फिल्मफेअरच्या व्यासपीठावर गेले ते १९८१ च्या ‘उमराव जान’ साठी. 

Khayyam and Sahir
Khayyam and Sahir

अमिताभ सोबतच या चित्रपटात शशी कपूर, राखी, वहिदा रेहमान, ऋषी कपूर, नीतू सिंग या साऱ्यांनी आपापल्या भूमिका सुंदर साकारल्या आहेत. एखादा सराईत कुंभार जसा फिरत्या चाकावर मातीला त्याला हवा तसा आकार देतो तसे होते दिग्दर्शक यश चोप्रा. अमिताभला शायर म्हणून दाखविण्याची जोखीम त्यांनी उचलली व ती यशस्वीही करून दाखवली. कभी कभी नंतरच्या त्रिशूल व काला पत्थर मध्ये याच यशजींनी पुन्हा अमिताभला अँग्री यंग मॅन म्हणून प्रस्थापित केले व त्यानंतर परत एकवार त्यास सिलसिला मध्ये रोमँटिक हिरो म्हणून सादर केले. २०-२० मध्ये दाणादाण उडविणाऱ्या क्रिकेटरकडून ५ दिवस चालणाऱ्या टेस्ट मॅच मधूनही उत्कृष्ट खेळी काढून घेण्यासारखे अवघड काम असते हे. 

‘कभी कभी’ आजही एखाद्या टेस्ट मॅच प्रमाणे घरी निवांत बसून एन्जॉय करण्यासारखी कलाकृती आहे. 

director yash chopra
Director Yash Chopra
Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment