भारतीय सिनेमात दिवे लावणारा अवलिया … पी.सी. बरुआ!

– अजिंक्य उजळंबकर

 

प्रथमेश चंद्र बरुआ म्हणजेच पी.सी. बरुआ हे भारतीय सिनेमा इतिहासातील अतिशय महत्वाचे असे नाव असूनही त्यांच्याबद्दल आपल्याकडे फारसे लिहिले न गेल्याने हे व्यक्तिमत्व जरा दुर्लक्षिले गेले. १९३५ ते ३७ या तीन वर्षात, तीन भाषांमध्ये व रुपेरी पडद्यावर ज्यांनी शरदचंद्र चट्टोपाध्याय लिखित देवदास अभिनित व दिग्दर्शित केला ते म्हणजे पी.सी. बरुआ. तिन्ही देवदास चे दिग्दर्शन त्यांचेच होते. बंगाली देवदास त्यांनी स्वतः साकारला, आसामी देवदास फनी शर्मा तर हिंदी के.एल. सैगल यांनी. बोलपटांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये ज्यांनी पहिल्यांदा अनोखे तांत्रिक प्रयोग करून पाहिले असे दिग्दर्शक म्हणजे पी.सी. बरुआ. ज्या माणसाने भारतीय सिनेमात पहिल्यांदा दिवे लावले असा माणूस. ते कसे ते पुढे वाचाल. आज त्यांचा स्मृतिदिन. 

पी.सी. यांचा जन्म आसामच्या धनाढ्य जमीनदार घराण्यातला. ब्रिटिशकालीन भारतात १९०३ सालचा. जमीनदार वडील राजा प्रभात चंद्र बरुआ  ही तेंव्हाची एक मोठी आसामी. पी.सी. यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण कलकत्ता येथे झाले व शिक्षण घेत असतांनाच वयाच्या १८ व्या वर्षी लग्नही झाले. पी.सी. यांची एकूण ३ लग्ने झाली त्यापैकी तिसरी बायको म्हणजे अभिनेत्री जमुना बरुआ जिने बंगाली आणि हिंदी देवदास मध्ये पारो साकारली. पदवी पूर्ण झाल्यावर पी.सी. युरोप दौऱ्यावर असताना पहिल्यांदा त्यांची ओळख सिनेमाशी झाली. इथून परतल्यावर काही काळ त्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी कार्यरत असलेल्या स्वराज पार्टी साठी काम केले परंतु नंतर वडिलांच्या इच्छेविरुद्ध सिनेमा जगतात प्रवेश केला. बंगाली सिनेमाचे भीष्म पितामह धीरेंद्र नाथ गांगुली यांच्याशी पी.सी. यांची ओळख झाली ती रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन येथे  व तिथून पुढे त्यांचा सिनेप्रवास सुरु झाला. 

१९२६ ते ३० असा चार वर्षांचा अभिनय प्रवास धिरेंद्रनाथ गांगुली यांच्या ब्रिटिश डॉमीनियन फिल्म्स या बॅनरखाली काम करीत पूर्ण केला. नंतर इच्छा झाली स्वतःचे निर्मिती बॅनर असावे म्हणून. घरची सधन परिस्थिती असल्याने पैशाची काहीच कमी नव्हती. कमी होती ती तांत्रिक ज्ञानाची. ते शिकण्याची पी.सी. यांना जबरदस्त इच्छा होती. १९३० साली पी.सी. यांनी किडनी स्टोन च्या आजाराने ग्रासले, त्यावर ऑपरेशन करण्यासाठी म्हणून इंग्लंडला जावे लागणार होते. तांत्रिक शिक्षणासाठी म्हणून मग ऑपरेशन झाल्यावर पॅरिस येथील सुप्रसिद्ध सिने छायाचित्रकार एम. रॉजर यांची भेट घेण्याचे ठरविले व त्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शिफारशी चे पत्रही सोबत नेले. सर्वकाही ठरल्याप्रमाणे सुरळीत पार पडले व भारतात परतल्यावर सर्व काही शिकून परफेक्ट झालेल्या पी.सी. यांनी स्वतःची निर्मिती संस्था सुरु केली बरुआ स्टुडिओ या नावाने. 

युरोपमधून विकत घेऊन सोबत आणलेल्या सर्व लायटींग उपकरणांच्या साहाय्याने मग पी.सी. यांनी विविध प्रयोग सुरु केले. पहिला चित्रपट होता अपराधी. अपराधी हा भारतीय सिनेमा इतिहासातील अतिशय महत्वाचा सिनेमा ज्याने भारतीय सिनेमाच्या सिनेमाटोग्राफी म्हणजेच छायाचित्रणात पहिली क्रांती घडवून आणली. अपराधी हा पहिला असा सिनेमा आहे ज्यात कृत्रिम लाईट्स चा वापर करण्यात आला. याच्या आधी पर्यंत सूर्यप्रकाशावरून परावर्तित होणाऱ्या लाईटचा वापर छायाचित्रणासाठी केला जायचा. आता कृत्रिम लाईट्स वापरायचे म्हटल्यावर कलाकारांच्या मेक-अप मध्येही बदल करणे गरजेचे होते. म्हणजे खर्च वाढला. आता हा प्रयोग पहिल्यांदा करण्यामध्ये जवळपास ५० हजार फूट चित्रपटांच्या रीळ वाया गेल्या. म्हणजे नुकसानच नुकसान. पण पी.सी. हे अतिशय झपाटल्यासारखे काम करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांनी हे नुकसान सहन केले आणि अपराधी पूर्ण केला. पहिल्यांदा लाईट्स अर्थात दिवे लावणारा माणूस म्हटले ते या अर्थाने. या सिनेमाने त्याकाळच्या सर्व निर्मात्या-दिग्दर्शक मंडळींना छायाचित्रणाचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला आणि त्याचा परिणाम असा झाला कि लाईट्स आणि मेक-अप हे व्यवसायाचे दोन नवे पर्याय लोकांना उपलब्ध झाले. 

१९३३ साली बरुआ यांनी ‘बंगाल-१९८३’ नावाचा त्यांच्या करिअरचा पहिला बोलपट बनविला जो साफ कोसळला व पी.सी. यांना प्रचंड नुकसान होऊन स्वतःची निर्मिती संस्था बंद करावी लागली. बी.एन. सरकार यांच्या निमंत्रणावरून त्यांनी न्यू थिएटर्स जॉईन केले. १९३४ साली त्यांनी न्यू थिएटर्स करिता रुपलेखा नावाचा द्वैभाषिक (हिंदी व बंगाली भाषेत) चित्रपट बनविला. हिंदीत याचे नाव होते मोहब्बत की कसौटी. या सिनेमात पहिल्यांदा फ्लॅश बॅक स्टोरी टेलिंग चा प्रयोग करण्यात आला होता. मग १९३५ साली आला देवदास. बंगाली भाषेतला. ज्यात ते स्वतःच देवदास बनले होते. स्वतः धनाढ्य जमीनदाराचा मुलगा असल्याने बरुआ यांनी अगदी सहजतेने ही भूमिका साकारली व त्यात ते अगदी फिट्ट बसले. यात बरुआ यांनी असंख्य तांत्रिक प्रयोग केले जे पूर्वी कधीही केले गेले नव्हते. हे सर्व प्रयोग रसिकांना आवडले. देवदास प्रचंड यशस्वी झाला व पी.सी. बरुआ यांचे नाव झाले. १९३६ व ३७ साली बरुआ यांनी त्याची हिंदी व आसामी आवृत्ती बनविली. १९३७ साली मुक्ती नावाचा सिनेमा बरुआ यांनी आणला. यातही त्यांनी अनेक प्रयोग पहिल्यांदा केले. रवींद्रनाथ टागोर लिखित व संगीतबधद केलेल्या गाण्यांचा समावेश करणारा हा पहिला सिनेमा होता. शिवाय पहिल्यांदाच सिनेमाचा जास्तीत जास्त पार्ट थेट आउटडोअर लोकेशन्स वर शूट करणारा हा पहिला सिनेमा होता. 

देवदास नंतर पी.सी. म्हणजे ट्रॅजेडी हिरो बनविणारे दिग्दर्शक अशी ओळख निर्माण झाली होती. ती त्यांनी पुसली १९३९ साली. रजत जयंती या सिनेमाने प्रेक्षकांना खूप हसविले व बोलपटामधला पहिला विनोदी सिनेमा दिला. याच साली अधिकार नावाच्या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सामाजिक चित्रपटाची खूप चर्चा झाली. यात बरुआ यांनी अनेक सामाजिक रूढी परंपरांवर मोठा आक्षेप नोंदविला होता. भारतीय शास्त्रीय संगीत व पाश्चात्य संगीत यांचा मिलाफ करणारा हा पहिला सिनेमा ठरला. १९४० साली बरुआ यांनी छायाचित्रणातील कट-शॉट तंत्रज्ञान पहिल्यांदा भारतात आणले. सिनेमा होता शापमुक्ती ज्याची तारीफ आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली. बिमल रॉय व फणी मुजुमदार यांचे करिअर सुरु झाले ते बरुआ यांच्या हाताखाली शिकून. बरुआ यांच्या बऱ्याच चित्रपटांच्या छायाचित्रणाची जबाबदारी बिमल रॉय सांभाळीत. 

 

न्यू-थिएटर्स सोडल्यानंतर बरुआ यांना उतरती कळा लागली. १९४० ते ५० या वर्षांमध्ये त्यांनी दहा एक सिनेमे बनविले. काही चालले, काही कोसळले. त्या दरम्यान बरुआ यांना दारूचे प्रचंड व्यसन लागले. स्वतःच्याच देवदास सिनेमातील नायकाप्रमाणेच. होतेही धनाढ्य जमीनदाराचे चिरंजीव. व्यसन इतके वाढले कि अखेर त्या दारूने बरुआ यांचा बळी घेतला. भारतीय सिनेमा इतिहासातील पहिला प्रयोगशील दिग्दर्शक खूपच लवकर जग सोडून गेला. १९५१ साली बरुआ आजच्या दिवशी गेले तेंव्हा त्यांचे वय होते केवळ ४८ वर्षे! बरुआ यांना दारूने ग्रासले नसते तर या प्रतिभासंपन्न व झपाटलेल्या माणसाने अजून कित्येक नवे प्रयोग केले असते, नवे तंत्रज्ञान आणले असते. परंतु नियतीला ते मंजूर नव्हते.

बरुआ गेले तेंव्हा त्यांच्या पत्नी जमुना केवळ ३२ वर्षांच्या होत्या व मागे तीन मुले होती. बरुआ यांच्या जमीनदार घराण्याने त्या तीन लहान मुलांची जबाबदारी नाकारली. जमुना यांनी मोठी कायदेशीर लढाई लढली. अखेर जिंकल्या. सिनेमा सोडला व उरलेले आयुष्य या तीन मुलांना मोठे करण्यात घालवले. २००३ साली बरुआ यांची जन्मशताब्दी साजरी झाली. जन्मशताब्दीच्या सर्व सरकारी समारंभात त्या हजर होत्या व तिथे त्यांचा सन्मानही झाला. पुढे दोन वर्षांनी २००५ साली जमुना यांचे निधन झाले. 

लवकर एक्झिट घेऊनही पी.सी. बरुआ हे नाव मात्र भारतीय सिनेमात अजरामर राहील. जरी त्यांच्याबद्दल फारसे लिहिले न गेले तरीही! कारण त्यांनी दिवेच असे लावले आहेत!! भावपूर्ण श्रद्धांजली.

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment