-डॉ. राजू पाटोदकर

मेरे देश की धरती….
सोना उगले ….
उगले हिरे मोती..
मेरे देश की धरती..
उपकार चित्रपटातील एक लोकप्रिय गीत. आपल्या मातीचे, आपल्या देशाचे, आपल्या राष्ट्रभक्तीचे सुरेख वर्णन या गीतातून आहे. गुलशन बावरा लिखित आणि महेंद्र कपूर यांनी गायलेल्या या गीताला अफाट अशी लोकप्रियता मिळाली. उत्तम असे देशभक्तीपर गीत म्हणून या गीताचा नावलौकिक वाढला. 26 जानेवारी,15 ऑगस्ट हे आपले राष्ट्रीय सण. या दिवशी हमखास हे गीत आपल्याला ऐकायला, पहायला मिळतेच. या गीताला जशी तोड नाही… तशीच तोड निर्माता अभिनेता-दिग्दर्शक मनोज कुमारजी यांना देखील नाही.

कथा, पटकथालेखन, दिग्दर्शन निर्माता, अभिनेता अशा विविध भूमिका मनोज कुमार यांनी निभावल्या. मनोज कुमार यांनी शहीद भगतसिंग यांच्या जीवनावरील चित्रपट कथा पटकथा पूर्ण केली. त्यात स्वतःची त्यांची मुख्य म्हणजे भगतसिंग यांची भूमिका होती. हा चित्रपट खूप गाजला होता. मनोज कुमार यांचे सेक्रेटरी कश्यप यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. विशेष म्हणजे हा चित्रपट आपले तत्कालीन प्रधानमंत्री लालबहादुर शास्त्रीजी यांना एका विशेष शो मध्ये आयोजन करून दाखविण्यात आला. त्यांना देखील खूप चित्रपट आवडला. त्यांनी मनोज कुमार यांना अशी विनंती केली की, त्यांची जी घोषणा आहे ‘जय जवान जय किसान’ या संदर्भात देशवासियांसाठी एखादा वेगळा चित्रपट का तयार करत नाहीस… त्या वाक्याने प्रेरित होऊन मनोज कुमार यांनी दिल्ली ते मुंबई प्रवासात ‘उपकार’ या चित्रपटाची कथा-पटकथा तयार केली. या चित्रपटासाठी निर्माता म्हणून स्वतःच्या पत्नीला सामोरे आणले. विशाल इंटरनॅशनल प्रॉडक्शन या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. कथा, पटकथा संवाद अभिनय अशा सर्व बाबी मनोज कुमार यांनी सांभाळल्या. ‘उपकार’ बद्दल काही नव्याने सांगणे नको. देशभक्ती, सैनिक आपली माती, काळी आई, कुटुंब, सैनिकांबद्दल आदरभाव, देशसेवा अशा विविध प्रसंगांना उपकार या चित्रपटातून मनोज कुमार यांनी साकारले. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. रौप्यमहोत्सवी चित्रपट म्हणून हा गाजला.

Lalkar (1972) hindi war film

ललकार
उपकार सारखाच मला एक भावलेला चित्रपट होता ललकार. धर्मेंद्र, राजेंद्रकुमार माला सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट. भारत आणि चीन विरुद्धच्या लढाईचे काहीशी प्रसंग या चित्रपटात होते. बरेचसे स्टंट या चित्रपट होते.दारासिंगजी आणि एक महाकाय अजगर यांची झटापट, पहाडी रस्ता जंगल दलदल अशा भागातून आपल्या सैन्यांचा प्रवास, चिनी लोकांकडून पकडल्या गेल्या नंतर होणारा छळ असे बरेचसे प्रसंग या चित्रपटात आहेत.1972 यावर्षी निर्माता-दिग्दर्शक रामानंद सागर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. नासिर हुसेन, कुमकुम, रमेश देव केस्टो मुखर्जी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात होत्या.

Haqeeqat 1964 film poster

हकीकत
कर चले हम फिदा जानो तन साथियो…. अब तुम्हारे हवाले वतन साथियो…. हे अजरामर गीत असलेला चित्रपट म्हणजे चेतन आनंद दिग्दर्शित 1964 यावर्षी प्रदर्शित झालेला हकीकत. 1962 लडाख युद्धाच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेला हा युद्धपट. नॅशनल अवॉर्ड या चित्रपटाला मिळाले. धर्मेंद्र विजय आनंद, बलराज सहानी प्रिया राजवंश, जयंत हे मातब्बर कलावंत या चित्रपटात आहेत. मदन मोहन आणि कैफी आजमी यांनी दिलेल्या अजरामर संगीत तर त्यांचीच शब्दरचना.. अप्रतिमच…
कट गये सर लेकिन कुछ गम नही….
सर हिमालय का हमने ना झुकने दिया…. अंगावर शहारे आणतात अशी ही शब्दरचना. ब्लॅक अँड व्हाईट असला तरी हा चित्रपट एक सर्वोत्तम  युद्धपट म्हणून आजही अग्रेसर आहे.

Border 1997 film poster

बॉर्डर
सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांनी 1997 या वर्षी बॉर्डर हा एक आगळावेगळा चित्रपट निर्माण करून इतिहास रचला. लोंगोवाल पोस्ट येथील भारत पाक युद्धाचे प्रसंग असलेला हा चित्रपट आहे. यातील प्रमुख भूमिका मेजर कुलवंत सिंग ही सनी देओल यांनी अत्यंत मेहनतीने व समर्पक अशी साकारली आहे.
संदेशे आते है… हमे तडपाते है.. हे गीत डोळ्यात पाणी आणते.1971 ला झालेल्या युद्धात संपूर्ण रात्रभर आपल्या सैन्यदलाने आणि ही पोस्ट लढविली होती आणि सकाळी म्हणजे पहाटे त्यांना वायुदलाची मदत मिळाली व आपण विजयी झालो. सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, पुनीत इस्सार, कुलभूषण खरबंदा यांच्याही या चित्रपटात लक्षवेधी भूमिका आहेत.

LOC Kargil movie poster

LOC कारगिल
बॉर्डर च्या अभूतपूर्व यशानंतर जे.पी. दत्ता यांनी 2003 मध्ये एल ओ सी कारगिल हा आणखी एक युद्धपट साकारला. अजय देवगन, संजय दत्त, सैफ अली खान, अक्षय खन्ना अभिषेक बच्चन, नागार्जुन, सुनील शेट्टी, मनोज वाजपेयी, संजय कपूर, आशुतोष राणा, मोहनीश बहल, अरमान कोहली, नम्रता शिरोडकर, दिव्या दत्ता, ईशा देओल, राणी मुखर्जी, करीना कपूर आणि भरपूर अशी मल्टी मल्टी कास्ट या चित्रपटात होती. कारगिल युद्धावर आधारित हा चित्रपट होता. मल्टी स्टारकास्ट असल्याने हा चित्रपट फारसा प्रभावी होऊ शकला नाही. काहीसा प्रेम प्रकरणात फसलेला हा चित्रपट वाटला. मात्र युद्धभूमी युद्धप्रसंग उभारण्यात जे पी दत्ता नेहमीप्रमाणे यशस्वी ठरले. आपल्या पतीचे शव पाहताना करीना कपूर यांनी केलेला उत्कट अभिनय हा खरोखरच मनाला भावतो. डोळ्यात पाणी येते.

URI film poster

उरी -द सर्जिकल स्ट्राइक
अलीकडच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 2019 मध्ये प्रदर्शित झालेला उरी- द सर्जिकल स्ट्राइक हा एक उत्तम असा युद्धपट. दिग्दर्शक आदित्य धार. प्रमुख कलावंत विकी कौशल, परेश रावल, मोहित रैना, यामी गौतम, योगेश सोमण. प्रत्येक भारतीय मनाला पटलेला आणि आवडलेला हा चित्रपट, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. एका विशिष्ट प्रसंगानंतर या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. तो काळ आणि त्यावेळची परिस्थिती हा चित्रपट पाहताना अधिक प्रकटतेने जाणवते.

माँ तुझे सलाम, इंडियन, टॅंगो चार्ली, जमीन, परमाणु, अब तुम्हारे हवाले वतन साथियो, तसेच काही प्रमाणात देशभक्ती प्रकट करणारे चित्रपट यामध्ये गदर-एक प्रेम कहानी, तिरंगा तर शहिदांवर आलेले चित्रपट यात भगतसिंग यांच्यावरील मनोज कुमार, अजय देवगन, बॉबी देवल यांचे चित्रपट. अक्षय कुमारचा केसरी, आमिर खानचा मंगल पांडे, नेताजी सुभाषचंद्र बोस, असे बरेचसे चित्रपट आहेत. ज्यातून देशभक्ती प्रगट होते.

एकूणच युद्ध पटाची निर्मिती करणे तसे कठीण काम.. कारण एक तर युद्ध परिस्थिती दाखवताना येणाऱ्या अडचणी, येणारे अडथळे त्याचप्रमाणे त्यातील परफेक्ट नेस हा महत्त्वाचा असतो. तो अचूक व योग्य दाखवायला हवा अन्यथा त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात याचे भान निर्माता-दिग्दर्शकाला सातत्याने ठेवावे लागते. त्यामुळे त्यामुळे दिग्दर्शक निर्माता मंडळी अशा चित्रपटाच्या वाटेला जात नाही जुन्या काळातील काही मंडळींनी हा प्रयोग केला आहे. अलीकडच्या काळामध्ये असे फारसे प्रयोग झाले नाहीत.असो.

युद्धपटामुळे देशभक्तीची भावना मात्र निश्चितच आपल्या भारतीयांच्या मनात जागृत होते हे महत्वाचे.. 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ही एक छोटीशी आठवण… जय हिंद -जय महाराष्ट्र.
…………………………………

raju patodkar
Dr Raju Patodkar
+ posts

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) (वर्ग-1) या पदावर कार्यरत.

शिक्षण- पीएच.डी, एम.ए., (जर्नालिझम), एम.ए., (मराठी), एम.ए., (राज्यशास्त्र), एम.ए., (समाजशास्त्र), बॅचलर इन ड्रामा, हिंदी (पंडित), जीडीसीए, बी.कॉम, बी.जे., जवळपास दोनशे मराठी, हिंदी मालिका तसेच 25 मराठी चित्रपटात अभिनय. राज्यातील विविध वर्तमान पत्रातून लेखन. जवळपास 5 हजार लेख-मुलाखती प्रकाशित.

पी.एच.डी. विषय श्री. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद एक चिकित्सक अभ्यास. (1975 ते 2005)

भ्रमणध्वनी क्र.- 9892108365.

Leave a comment