अशोक शेवडे, चित्रपट प्रेमींच्या ओळखीचे एक नाव! मुंबई परिसरात ते एक उत्कृष्ट मुलाखत कार म्हणून प्रसिद्ध होते .त्यांना मुलाखतीचे बादशहा असे म्हटले जायचे. 1975 ते 1985 च्या काळातील चित्रपट साप्ताहिकांमधून , मासिकांमधुन लेखन करणारे अशोक शेवडे फक्त चित्रपट विषयक कलावंतानं बद्दल लिहीत होते असे नव्हे तर ते नाट्यकलावंत यांच्याबद्दल सुद्धा लिहीत असत . 1983 च्या चित्रानंद, या सिने साप्ताहिका मध्ये त्यांनी लिहलेला,” नाटकातील रमेश रणदिवे ” हा त्यांचा लेख, तसेच,” प्रदीप दळवी” यांच्याबद्दल चा एक प्रदीर्घ लेख, अशासारख्या लेखांमधून त्यांनी नाट्यकलावंतांबद्धलही लिहले होते,व त्या त्या कलावंताचे एकूण व्यक्तीमत्व साकारले होते.

चित्रपट कलावंतांपैकी स्मिता पाटील या अभिनेत्री विषयी 1984 मधील चित्रानंद मध्ये त्यांनी लिहिलेला,’ स्मिता पाटील ची गगनभरारी’ हा लेख स्मिता मधील कलावंताचे विविध पैलू स्पष्ट करणारा ठरला. कधीकधी काही चित्रपट कलावंतांच्या कृती, या समाजात चर्चा घडवणाऱ्या ठरतात .आणि त्यामध्ये नामवंत कलावंताचे नाव समाविष्ट असेल तर, अशा प्रसंगी नेमके वास्तव काय आहे? तो नामवंत कलाकार चुकीचा वागला आहे काय ?हे सगळे आपल्या लेखांमधून मांडणे धारिष्ट्याचे ठरते आणि असे धारिष्ट्य अशोकजीं जवळ होते म्हणून तर, 1982 मध्ये चित्रानंद साप्ताहिकात अशोकजीनी “यह शादी नही बरबादी है” या शीर्षकाचा, प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार यांच्या बद्दलचा, लेख लिहिला होता आणि तो चित्रानंदचे संपादक इसाक मुजावर यांनी छापलाही होता. असाच अशोक जींचा आणखीन एक,’ ‘बोल्ड’ विषयावरचा लेख 1982 मध्ये, चित्रानंद मधून प्रसिद्ध झाला होता .त्याचे शीर्षकच होते की, “बो डेरेक- सेक्सचा चमत्कार”.

ashok shevde

वादग्रस्त विषयावरचे लेख यामध्ये अशोकजीनी शब्दबद्ध केलेली,’ चित्रानंद ‘मधील जवळजवळ पंधरा भागांची लेखमाला खूपच गाजली होती .मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते राजा गोसावी यांच्या पत्नीचे ते आत्मकथन होते ,ते शेवडे यांनी शब्दबद्ध केले होते. अखेर कोणीही, कितीही मोठा , लोकप्रिय कलावंत झाला तरी, त्याचे पाय मातीचेच असतात .हे कटू सत्य दाखवणारी लेखमाला आवर्जून वाचावी अशीच होती. अशा काही लेखांमध्ये नामवंत कलावंतांचे पोस्टमार्टेम करणारे अशोकजी आपणाला सतत भेटले नाहीत. याउलट नाण्याच्या दोन्ही बाजू कशा आहेत, हे दर्शवणारा 1983 च्या चित्रानंद मधील प्रसिद्ध अभिनेत्री,’ रीना रॉय ‘च्या वडिलांबद्दल चा लेख अशोकजीनी खरी माहिती मिळवण्यासाठी , मुंबईतील विविध भागात जाऊन घेतलेले कष्ट, केलेली धडपड हे दर्शवणारा होता. आणि त्या घटनेतील दोन्ही बाजू आपणापुढे मांडून अशोकजी यातले योग्य काय आणि अयोग्य काय हे वाचकांनाच ठरवायला सांगतात.

DOORDARSHAN PROGRAM CHANDERI SONERI - ASHOK SHEVDE WITH DILIP PRABHAVALKAR AND SHARMILA KULKARNI.
DOORDARSHAN PROGRAM CHANDERI SONERI – ASHOK SHEVDE WITH DILIP PRABHAVALKAR AND SHARMILA KULKARNI.

रीना राँय ची कथा आणि व्यथा सांगणारे अशोकजी,’ मीनाकुमारी ‘या अभिनयसम्राज्ञी बद्दल, तिच्यामधील कवियत्री बद्दल लिहिताना ,आशय संपन्न व भावपूर्ण लेखन शैलीचे एक वेगळेच दर्शन घडवतात. त्यासाठी 1979 मध्ये प्रसिद्ध झालेला त्यांचा, “मीनाकुमारी एक उध्वस्त जीवन” हा लेख वाचायला हवा ! शेवडे यांच्या या पद्धतीच्या लेखनशैलीचा अनुभव, ‘यशवंत दत्त’ या अभिनेत्या वरील लेखांमध्ये आपण घेतो. चित्रपट व नाट्य क्षेत्राबद्दल लिहिणाऱ्या अशोक शेवडे यांनी ,व .पु. काळे यांच्या कथाकथना बद्दलही लिहिले होते. त्यासाठी निमित्त होते , कथाकथनाच्या कार्यक्रमात,’ आशा काळे’ या अभिनेत्रीला सामील करून घेतले ,या घटनेचे !

असे विविध प्रकारचे लेखन चित्रपट व नाट्य कलेबद्दल आणि रंगमंचावरील अविष्कार यांबद्दल करणारे अशोक शेवडे यांचे अजून एक मोठे कर्तुत्व आहे .ते म्हणजे त्यांची ‘ओळखीचे चेहरे ‘ही लेखमाला होय ! चित्रपट बघत असताना त्या मधील प्रमुख कलावंतांची नावे ही सर्वांच्या परिचयाची होत असतात .पण चित्रपटात तेवढेच कलावंत नसतात. नोकरचाकर, गुंड, मवाली, नृत्यात नायीकेच्या मागे नाचणारे, असे अनेक कलावंत असतात .त्यांची दखल फारशी घेतली घेतली जात नाही .एवढेच नव्हे तर त्यांची नावेही प्रेक्षकांना माहीत नसतात .एका चित्रपटात गुंडाची भूमिका केली की, दुसर्‍या चित्रपटातही तशीच भूमिका त्यांच्या वाट्याला येते ,आणि हे चेहरे मग प्रेक्षकांच्या ओळखीचे बनतात. पण त्यांची नावे काय हे मात्र कळत नाही.

GOLDEN MEMORIES WITH FILM ACTOR DEVEN VARMA AT ROOPTARA STUDIO IN JUNE 1971.
GOLDEN MEMORIES WITH FILM ACTOR DEVEN VARMA AT ROOPTARA STUDIO IN JUNE 1971.

अशाच कलावंतांच्या परिचयाची लेखमाला अशोक शेवडे यांनी लिहिली होती . 1978 मध्ये सुरू केलेल्या या,’ ओळखीचे चेहरे ‘या लेखमालेत त्यांनी, हबीब, सोहेल खान, राम मोहन या कलावंतां बद्दल लिहिले ,जे एखाद्या चित्रपटात गुंड, अगर काका, मामा अशा छोट्या भूमिकेत दिसायचे. काही मराठी कलावंतांचीही ओळख अशोकजींमुळे झाली, उदाहरणार्थ काकू, मावशी अगर शेजारणीच्या भूमिकेत दिसणाऱ्या रेखा देशपांडे , तुणतुणे वाजवणारा मल्लेश, नाचाच्या भूमिकातील दामोदर गायकवाड, मैत्रिणीच्या भूमिकेतील देवयानी ठक्कर , अशा अनेक कलावंतां बद्दल त्यांनी या लेखमालेत लिहिले होते ;आणि त्यांचा परिचय चित्रपट प्रेमींना करून दिला होता.

हे असे चित्रपट विषयक लेखन करणारे अशोक शेवडे वयोमानानुसार आता थकले होते. कालच्या 18 मार्च २०२१ रोजी ते ,हे जग सोडून गेले .परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. चित्रपटविषयक लिहिणारे अनेक आहेत, होत राहतील. पण शेवडे यांची लेखन शैली वेगळीच ! साधारण पस्तीस चाळीस वर्षापूर्वी चित्रपटप्रेमींना रिझवणारा हा लेखक, नवीन पिढीसाठी ‘ओळखीचे एक नाव ‘बनून राहिला तरी, त्यांचे लेखन सार्थ ठरले असे म्हणावे लागेल.

Padmakar Pathakji
+ posts

Leave a comment