– अजिंक्य उजळंबकर

“एक दिन दिनमें अंधेरा हो गया, एक छोटेसे चाँद ने इतने बड़े सूरज को ग्रहण लगा दिया… सूरज तो रोजही जीतता है..चाँद का भी तो दिन आता है ना!” बनारस मध्ये विधवा आश्रमात राहणारी एक विधवा जिचे नाव आहे ‘नूर’, बनारसच्या घाटांवर डोंबारीचे दोरीवर चालण्याचे खेळ करीत कसेबसे आपले आयुष्य काढणाऱ्या एका ८-१० वर्षाच्या अछूत व अनाथ ‘छोटी’ला जेंव्हा हे सांगते तेंव्हा त्या मुलीच्या डोळ्यातील अश्रू कमी होतात पण नकळतपणे हे दृश्य पाहणाऱ्या प्रेक्षकांचे डोळे मात्र पाणावतात. हे वर्ष असते १९८९ चे परंतु बनारसचा हिंदू समाज, न्यायव्यवस्थेतील मंडळी ही अजूनही व छूत-अछूत, विधवांचा सामाजिक बहिष्कार यात गुरफटलेली असते. सामाजिक बहिष्काराच्या बळी असलेल्या या दोघी, म्हणजे नूर व छोटी  दोघींमध्ये असलेला वयाचा दुरावा कमी करून एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणी बनतात. एकमेकींचा आधार बनतात. दोघींच्या या निरागस मैत्रीतून नकळतपणे या अन्यायाविरोधात लढण्याची पायाभरणी होते. पुढे हीच ८-१० वर्षाची छोटी जेंव्हा २४ वर्षानंतर, २०१३ साली, कोलकात्याहून बनारस ला परतते तेंव्हा ती सुप्रीम कोर्टाची वकील बनून. बनारसमध्ये विधवांना होळी खेळण्यापासून रोखणारी हजारो वर्षांची परंपरा मोडीत काढणारी न्यायालयीन लढाई या छोटीने सुप्रीम कोर्टात जिंकलेली असते…. आपल्या नूर नावाच्या वयस्क विधवा मैत्रिणीला अछूत छोटीने वाहिलेली ही खरी श्रद्धांजली असते. 

सुप्रसिद्ध फाईव्ह स्टार व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सेलेब्रिटी शेफ विकास खन्ना यांनी ‘दि लास्ट कलर’ याच नावाच्या स्वतःच्या पुस्तकावर आधारित हा सिनेमा दिग्दर्शित करून प्रदर्शित होऊन आता जवळपास दोन वर्षे झाली आहेत. ४ जानेवारी २०१९ रोजी सर्वप्रथम पाम स्प्रिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये या सिनेमाचा प्रीमिअर झाल्यानंतर जवळपास वर्षभर १०-१५ विविध फिल्म फेस्टिव्हलमधून हा सिनेमा प्रवास करत होता. सिनेमा खऱ्या अर्थाने चर्चेत व प्रकाशझोतात तेंव्हा आला जेंव्हा बेस्ट पिक्चर कॅटॅगिरीत ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकन मिळविण्याच्या स्पर्धेत उतरलेल्या चित्रपटांमध्ये त्याला ग्राह्य धरले गेले. ही घटना होती गेल्या वर्षी याच दिवसांतील. शिकागो, बर्लिन, बोस्टन व स्टुत्तगार्ट या चार फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फिचर फिल्म या पुरस्काराने सिनेमाला सन्मानित केलं गेलं. परंतु त्यानंतर सिनेमागृहात प्रदर्शित होण्यास कोरोना लॉकडाऊनचा अडथळा निर्माण झाला. गेल्या महिन्यात डिसेम्बरमध्ये अखेर काही निवडक सिनेमागृहात प्रदर्शित झाला खरा परंतु प्रेक्षकांविना परत गेला. अमॅझॉन प्राईम व्हिडीओने तो आता स्ट्रीम केल्याबद्दल खरंतर त्यांचे आभार मानावयास हवे. खऱ्या अर्थाने सर्व जगातील प्रेक्षकांसाठी सिनेमा आता ओपन झाला आहे. 

Neena Gupta and Aksa Siddiqui in The Last Colour
Neena Gupta and Aksa Siddiqui in The Last Colour

विधवा नूर च्या भूमिकेत आहे प्रतिभासंपन्न अभिनेत्री नीना गुप्ता जी या चित्रपटाचा आत्मा आहे व अछूत छोटीच्या फटाकड्या भूमिकेत आहे अक्सा सिद्दीकी जी या चित्रपटाचे धडधड करणारे हृदय आहे. नीना गुप्ता यांनी मानवीय भावनांच्या आकर्षक रंगांसाठी आसुसलेली पण समाजाच्या दडपणाखाली अव्यक्त अशी विधवा नूर कमालीच्या ताकदीने रंगविली आहे. तीही स्टार्ट टू एन्ड पांढऱ्या साडीत राहून! दि लास्ट कलर हा चित्रपट व नूर ही भूमिका नीना गुप्ता यांच्या करिअरमधील माईलस्टोन ठरावा. चित्रपटाचा आत्मा असा तर हृदय सुद्धा तसेच …अक्सा सिद्दीकी या छोटीने छोटीच्या भूमिकेत कमाल केली आहे. अर्थातच तिच्याकडून सहज अभिनय काढून घेण्याचे श्रेय दिग्दर्शक विकास खन्ना व संपूर्ण टीमला आहे. नूर व छोटी मधील मैत्री खुलविणारे अजून काही प्रसंग दाखविण्यास हरकत नव्हती ज्याने कथानकातले टेन्शन थोडे कमी झाले असते. 

दिग्दर्शक विकास खन्ना यांनी बनारस येथील छूत-अछूत व विधवा बहिष्कार या प्रश्नांसोबतच पुरुषप्रधान कौटुंबिक व्यवस्था व किन्नर समाजाचे पोलीस यंत्रणेकडून होणारे लैंगिक शोषण या दोन महत्वाच्या मुद्द्यांना सुद्धा हात घातला आहे. छोटीची एक किन्नर मैत्रीण अनारकली (रुद्राणी छेत्री) हिच्यावर स्थानिक पोलीस अधिकारी राजा (अस्लम शेख) कडून होणारे अत्याचार हा कथेचा टर्निंग पॉईंट आहे. कथेत आणखी एक अत्यंत महत्वाचे पात्र आहे जे म्हणावे तर दृष्य आहे, नाहीतर अदृष्य. ते आहे बनारस. हे शहर, गंगा किनाऱ्यावरील विहंगम घाट, तिथे होणारी पूजा आरती, सोबतच पार्थिवांवर होणारे अंत्यसंस्कार, तेथून दिसणारा मनमोहक सूर्योदय व सूर्यास्त, शहरातील त्यातील लहान लहान मंदिरे, छोट्या छोट्या गल्ल्या हे सर्व मिळून एक पात्र तयार होते व ते म्हणजे बनारस. ज्याच्या अवतीभोवती कथानक खुलते, ज्याच्यामुळे कथा जन्म घेते व अखेर तेच शहर कथेतील पात्रांना अंतिम न्याय पण देते. 

Director Vikas Khanna with the team of Actors of The Last Colour
Director Vikas Khanna with the team of Actors of The Last Colour

दिग्दर्शक विकास खन्ना यांनी सिनेछायाचित्रकार सुभ्रान्शू दास यांच्यासोबत जे बनारस टिपले आहे ते कमालीचे सुंदर आहे. ‘सिटी ऑफ कलर्स’ अशी ओळख असलेल्या बनारस शहराची पार्श्वभूमी घेत तिथे एका बेरंग जीवन जगत असलेल्या विधवेची कथा रंगविणे हे आव्हान विकास यांनी व्यवस्थित पेलले आहे. कला दिग्दर्शनात काही त्रुटी जाणवल्या जशा १९८९ च्या काळात बनारस चे घाट इतके स्वच्छ व चकचकीत नव्हते जो बदल गेल्या काही वर्षात झाला आहे. पण एकंदरीत विकास खन्ना यांचा दिग्दर्शनाचा हा पहिला प्रयत्न आहे हे चित्रपट पाहिल्यानंतर स्वीकारणे किंवा खात्री पटणे खरंच अवघड आहे. चित्रपटांमधील बरीच दृश्ये, पात्रे, घटना या काही व्यक्त न होता सुद्धा बरेच काही बोलून जातात व अपेक्षित संदेश व परिणाम साधण्यात यशस्वी होतात. छोटीचा मित्र चिंटू या भूमिकेत राजेश्वर खन्ना या बालकलाकाराने सुद्धा चांगले काम केले आहे. बनारस मध्ये खरोखर किन्नर असलेल्या रुद्राणीने अतिशय नैसर्गिक अभिनय केलाय तर राजाच्या खलनायकी भूमिकेत असलं शेख हा योग्य चॉईस ठरला आहे. छोटीच्या मोठेपणीच्या भूमिकेत प्रिन्सी सुधाकरण उत्तम.

 
केवळ दीडच तासाच्या लांबीत ‘दि लास्ट कलर’ प्रेक्षकांवर अनेक भावस्पर्शी प्रसंगांचे रंग टाकून जातो … असे रंग जे लवकर निघणे अवघड आहे…जे शब्दशः लास्टिंग इम्पॅक्ट करून जातात. थँक्स नीना गुप्ता…थँक्स विकास खन्ना. 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment