– अजिंक्य उजळंबकर 

काही चित्रपटांना कथा नसते… कारण कथा म्हटल्यावर साहजिकच आला तो म्हणजे घटनाक्रम. असा घटनाक्रम काही चित्रपटांमध्ये नसतो. केवळ चित्रण असतं एखाद्या घटनेचं. आणि त्या घटनेत असलेल्या पात्रांचं …त्यांच्या विश्वाचं. म्हणाल तर हा फक्त एक दृष्टीक्षेप असतो कारण यात विश्लेषण नसतं. नवोदित दिग्दर्शक अभिजीत वारंग यांचा मराठी चित्रपट ‘पिकासो’ हा त्यापैकीच एक. तळकोकणातील एका लहानशा खेड्यात राहणाऱ्या आणि अगदीच बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या एका कुटुंबात घडलेल्या एका घटनेचं चित्रण यात वारंग यांनी केलंय. आई, वडील आणि मुलगा अशी पात्रेही केवळ तीनच त्यामुळे त्यांचं विश्वही तसं छोटंसं. त्यामुळे एका रात्रीत घडणाऱ्या घटनेचं चित्रण करतांना फारशी लामण न लावता सिनेमा सुद्धा मोजून १ तास १३ मिनिटात संपतो. 

सातवीत शिकणारा गंधर्व एका राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम येतो. आता राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याला गरज असते १५००/- रुपयांची आणि ही रक्कम दुसऱ्याच दिवशी जमा करायची असते. राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या तीनात येणाऱ्या विजेत्यांना स्पेन येथे पिकासोच्या गावी जाऊन चित्रकला शिकण्याची संधी असते. गंधर्व घरी येऊन आईला ही आनंदाची बातमी देतो. आई घरातले डबे उघडून काही ठेवीतले पैसे निघतात का बघते. पण पैसे नसतात. गंधर्वचे वडील दशावतार ही लोककला सादर करणारे कलाकार असतात व सोबत एक सुंदर गणपतीचे मूर्तिकार पण असतात. पण त्यांना असलेल्या व्यसनामुळे आधीच त्यांच्या डोक्यावर कर्ज असते. त्यामुळे यातून आता गंधर्वला लागणारे १५०० रुपयेसुद्धा उभे राहतील का नाही याची शाश्वती नसते. यातून पुढे काय आणि कसा मार्ग निघतो या घटनेचं चित्रण आपल्याला पिकासो मध्ये बघायला मिळते. गंधर्वची भूमिका समय संजीव तांबे, वडिलांची प्रसाद ओक व आईच्या भूमिकेत अश्विनी मुकादम यांचा अभिनय आपल्याला पिकासोत बघायला मिळतो. 

prasad oak in picasso

मुळात ‘पिकासो’ हा सिनेमा प्रेक्षकांना दाखविण्यामागे अभिजीत वारंग यांचा असलेला एकमेव उद्देश म्हणजे सुमारे ८०० वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली कोकणातील दशावतार ही लोककला. कुठल्याही प्रकारच्या राजाश्रयाशिवाय आजही अस्तित्व टिकवून असलेल्या या लोककलेवर जवळपास ३.५ लाख कलाकार आजही आपला उदरनिर्वाह चालवतात. आज या सर्व कलाकारांची आर्थिक परिस्थिती किती बिकट आहे हे प्रेक्षकांसमोर आणणे हा स्तुत्य असा उद्देश वारंग यांचा आहे व त्यामुळे पिकासो व्यवसायिकतेत कमी पडणारा सिनेमा जरी असला तरी भावस्पर्शी नक्कीच झालाय. १ तास १३ मिनिटांच्या या छोट्याशा प्रवासात बरीचशी दृश्ये ही दशावतार लोककला सादर करतानाची आहेत. म्हणाल तर मनोरंजनाची अपेक्षा ठेवणाऱ्या टिपिकल प्रेक्षकास ही दृश्ये अडथळ्याची वाटू शकतात. परंतु ही सर्व दृश्ये दिग्दर्शक वारंग यांनी आपल्याला गंधर्वाच्या नजरेतून दाखवली आहेत. यात प्रसाद ओक यांनी साकारलेला असा पिता आहे जो स्वतःवर नाराज आहे. आपल्या व्यसनाधीनतेमुळे आपल्यावर ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीचा त्याला पश्चाताप होत असतो व त्याचे फळ यापुढे आपल्या मुलाला चाखावे लागेल याचेही वाईट त्याला वाटत असते. हे सर्व दशावतार नाटक सादर करत असतांना होत असते त्यामुळे या दृश्यांना या घटनेत महत्व आहे. अर्थात ही दृश्ये कायम ठेऊन वडील-मुलगा किंवा आई-मुलगा या नात्यांमधील अजून काही भावस्पर्शी दृश्ये पटकथेत घेतली असती तर सिनेमाचा होणारा इम्पॅक्ट अजून कैक पटीने वाढला असता हे नाकारून चालणार नाही. 

samay sanjeev tambe in picasso

 
अभिनयाच्या बाबतीत प्रसाद ओक व समय संजीव तांबे या दोघांनीही वडील आणि मुलाची भूमिका छानच सादर केली आहे. समय ने साकारलेला चणचुणीत गंधर्व लक्षात राहतो. प्रसाद यांचा पश्चातापाच्या सावटाखाली दशावतार साकारणारा कलाकार तितकाच प्रभावी आहे. अश्विनी मुकादम यांची भूमिका त्यामानाने छोटी आहे परंतु त्यांचाही अभिनय छान झालाय. पिकासो मध्ये अतिशय आकर्षक काय असेल तर तळकोकणाचे छायाचित्रण. त्यातही छायाचित्रकार स्टॅनली मुद्दा यांनी पावसात चिंब भिजलेला कोकण दाखवल्याने काही दृश्ये तर अगदी ‘ट्रीट टू वॉच’ आहेत. खासकरून गंधर्व आपल्या घरून निघून वडिलांना भेटायला मंदिरात जातो त्यादरम्यानची त्याची प्रवासातील दृश्ये. आहाहा! ‘कोकण म्हणजे स्वर्ग आहे’ हे दाखवणारी ही दृश्ये आहेत. मोहक दृष्यांना साथ देणारे आनंद लुंकड यांचे पार्श्वसंगीतही प्रभावी आहे. 

एकंदरीत काहीसा कलात्मक चित्रपटांकडे झुकलेला वाटणारा असा ‘पिकासो’ बनलाय तो एका चांगल्या हेतूने. दशावतार कलेला यानिमित्ताने रसिकांसमोर आणणे हा तो हेतू. त्यामुळे व्यावसायिक मनोरंजनात जरी कमी पडणारा वाटला तरी पिकासो बघायला हवा तो आपल्या महान सांस्कृतिक परंपरेसाठी. जगातल्या सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या आपल्या महान लोककलेसाठी. अमेझॉन प्राईम व्हिडिओवर. 

  • Shaitaan Movie Review | उत्तम नाही पण तरीही चांगला
  • Navrang Ruperi Diwali Magazine 2021 Marathi Vruttapatra Lekhak Sangh's State Level Award
    'नवरंग रुपेरी-२०२१' ला उत्कृष्ट दिवाळी अंकाचा राज्यस्तरीय पुरस्कार
  • विद्या बालन आणि शेफाली शाह अभिनीत, अ‍ॅमेझॉन ओरिजिनल 'जलसा'चा ट्रेलर प्रदर्शित
  • Amazon Original Cinema 'Sharmaji Namkeen' Will Be Premiered On Prime Video On March 31, 2022
    अमेझॉन ओरिजनल सिनेमा 'शर्माजी नमकीन' 31 मार्च 2022 ला प्राइम व्हिडिओवर झळकणार
  • २९ एप्रिलपासून सर्वत्र घुमणार 'चंद्रमुखी'च्या घुंगरांचे बोल..पहा टिझर
  • अमेझॉन ओरिजनल मूव्ही गेहराईयांचा वर्ल्ड प्रीमियर 11 फेब्रुवारी रोजी
  • Bali (Marathi) - Official Trailer
  • करमणूक जगतास वाहिलेल्या 'नवरंग रुपेरी' दिवाळी अंकाच्या ३५ व्या अंकाचे पुण्यात प्रकाशन संपन्न!!
  • Actor Vicky Kaushal Introduces His 'New Look' From Upcoming 'Sardar Udham'
    विक्की कौशलने सादर केला आगामी 'सरदार उधम'मधून आपला 'नवा लुक'
  • अमेझॉन प्राइम व्हिडिओ तर्फे सरदार उधमचे ट्रेलर प्रदर्शित

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment