– अजिंक्य उजळंबकर

१९९३ साली दक्षिणेतील प्रख्यात दिग्दर्शक संथना भारती यांनी अभिनेता प्रभू व अभिनेत्री सुकन्या यांच्या प्रमुख भूमिकेत तामिळ भाषेत ‘चिन्ना मपिल्लै’ नावाचा सुपरहिट सिनेमा बनविला होता जो बघून दिग्दर्शक डेव्हिड धवन यांना त्याचा हिंदी रिमेक करावा वाटला. ‘चिन्ना मपिल्लै’ ला इलायराजा यांचे सुपरहिट संगीत होते. हिंदीत ती जबाबदारी आनंद मिलिंद यांना देऊन डेव्हिड धवन यांनी आपल्या ९० च्या दशकातील मसाला सिनेमांच्या फॅक्टरीत १९९५ साली ‘कुली नं-१’ या सिनेमाची भर घातली. डेव्हिड व गोविंदा यांचे ट्युनिंग अगदी मस्त जमले होते. पिट्यातल्या प्रेक्षकाला काय पाहिजे हे माहित असलेली ही मनमोहन देसाई-अमिताभ सारखी जोडी आहे. आज त्या ‘कुली नं-१’ ला २५ वर्षे झालीत. डेव्हिड यांचा मुलगा वरुण आजचा आघाडीचा कलाकार आहे. वरुण ला गोविंदाच्या जागी घेऊन डेव्हिड यांनी तोच ‘कुली नं-१’ पुन्हा बनवला आणि तो आज अमेझॉन प्राईम व्हिडीओ वर प्रदर्शित झाला. डेव्हिड यांचे याआधीचे दोन्ही सिनेमे म्हणजे ‘मैं तेरा हिरो’ व ‘जुडवा-२’ सुद्धा वरुण लाच नायक म्हणून घेऊन बनवले होते. थोडक्यात सध्या डेव्हिड यांच्यातील दिग्दर्शकाने बॅक सीट घेतली आहे तर बापाने फ्रंट सीट. 

९५ सालचा कुली नं-१ हा व्यावसायिक दृष्ट्या सुपरहिट सिनेमा होता व डेव्हिड यांच्या इतर सिनेमांप्रमाणे प्रेक्षकांची करमणूक करणे या एकमेव उद्देशाने बनवलेला होता. गोविंदाचा जबरदस्त अभिनय, त्याचे परफेक्ट कॉमिक टायमिंग, त्याचा नाच व सोबतीला आनंद मिलिंद यांचे सुपरहिट संगीत यामुळे कुली प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. तेच कथानक, तीच पात्रे, तीच गाणी परत वापरून त्याला आजच्या पॉलिश अंदाजात डेव्हिड यांनी आणले खरे पण ते पॉलिश करतांना मूळ सिनेमाचा आत्माच हरवून बसला आहे. कथानक काय ते इथे नव्याने सांगण्याची गरज नाही. एव्हाना आजच्या पिढीने सुद्धा ९५ चा कुली कित्येकदा पाहिला असेल. वरुण च्या या कुलीचे ट्रेलर बघूनच यात काहीच नावीन्य नसणार याचा अंदाज आला होता. पण निदान कथेच्या सादरीकरणात काही नवीन अथवा रोमांचक डेव्हिड नक्की करतील अशी पुसटशी अपेक्षा होती. कारण डेव्हिड हे रसिकांची करमणुकीची नाडी सापडलेले डॉक्टर आहेत. शिवाय आपल्या मुलात आणि गोविंदामध्ये तुलना होणार याची त्यांनासुद्धा जाणीव असणार पण तरीही आधी म्हटल्याप्रमाणे दिग्दर्शकाची जागा बापाने घेतली आहे हे सिनेमा बघताना पदोपदी जाणवते.

Varun Dhawan and Sarah ali Khan in coolie no. 1

गोविंदा इज गोविंदा. त्याला कोणीही रिप्लेस करू शकत नाही. वरुण तर नाहीच नाही. आणि गोविंदाने साकारलेला कुली प्रेक्षकांच्या डोक्यात इतका पक्का बसला आहे कि बस्स. वरुण चा प्रयत्न चांगला आहे पण गोविंदासमोर तो नगण्य आहे. मुळात डेव्हिड यांनी पुत्रप्रेमापोटी ही चूक करायलाच नको होती. बरं केल्यावर निदान कथेत, त्याच्या सादरीकरणात जास्तीत जास्त नैसर्गिकता कशी राहील निदान इतकी काळजी तरी घेणे अपेक्षित होते. करिष्मा कपूर व शक्ती कपूर यांनी साकारलेली भूमिका यात सारा अली खान, राजपाल यादव यांनी साकारल्या आहेत. दोघेही सपशेल फेल. गोविंदाच कशाला आधीच्या कुली मधील कादर खान यांनी रंगविलेला नायिकेचा बाप होशियार चंद सुद्धा कमालीचा रंगतदार होता. यात त्या भूमिकेत दस्तुरखुद्द परेश रावल असूनही ही व्यक्तिरेखा अगदीच बेरंग झाली आहे. 

Javed Jaferi, Paresh Rawal and Varun Dhawan in coolie no.1

फ्रेम टू फ्रेम सिनेमा आधीचाच आहे. संवादही जवळपास तेच आहेत. बंगल्यांची उंची वाढली आहे, रेल्वे स्टेशन खूप पॉश झाले आहे, एकंदर सर्वच चकाचक आहे पण सगळं काही कृत्रिम आहे, प्लास्टिक आहे. शरीर आकर्षक आहे पण त्यात आत्माच नाही. कथेतील विनोदी प्रसंगांवर हसणे तर सोडा उलट दिग्दर्शकाच्या प्रयत्नावर हसू आणि कीव येते. आधीच्या कुलीत असलेले दोन पात्र जे साकारले होते हरीश व कांचन या अभिनेत्यांनी, त्यांना यात अगदीच दुय्यम स्थान आहे. सदाशिव अमरापूरकर यांनी साकारलेला पंडित यात जावेद जाफरीने साकारला आहे जो अजिबातच रंगत आणत नाही. 

एकुणात काय तर “मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो भेल पुरी खा रहा था” असे गोविंदाच्या जागी यात वरुण म्हणतो खरा पण रसिकांना मनोरंजनाची स्पायसी मिरची कुठे लागतच नाही. सगळं कसं मिळमिळीत .. गुळगुळीत. माझ्या तर अपेक्षाच नव्हत्या म्हणून निराशाही झाली नाही. हां वेळ फुकट गेला त्याचे दुःख आहे. आता मुलाला हिरो नं-१ बनवायच्या नादात डेव्हिड मधल्या बापाने असल्या चुका पुन्हा करू नयेत इतकीच अपेक्षा. 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment