सुप्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथा लेखिका सुमित्रा भावे (Writer Director Sumitra Bhave) यांचे आज पुण्यात निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शक द्वयीने अनेक दर्जेदार व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट रसिकांना दिले आहेत. बाई, पाणी, जिंदगी जिंदाबाद, कासव, देवराई, वास्तुपुरुष, संहिता, अस्तु, एक कप च्या, दहावी फ, दोघी, नितळ, बाधा, घो मला असला हवा, मोर देखने जंगल में ही त्यातील काही नावे. 

भावे यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजतून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून राज्यशासन आणि समाजशास्त्र या विषयात दोन वेळा एम.ए. केले. शिवाय त्यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची ग्रामकल्याण विषयाची पदविका आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले. पुण्याच्या कर्वे विद्यापीठाच्या समाजसेवा संस्थेत दहा वर्षे प्राध्यापक आणि त्यानंतर सरकारप्रणीत कम्यूनिटी एड अँड स्पॉन्सरशिपच्या त्या कार्यक्रम व्यवस्थापिका होत्या.

भावे यांच्या अनेक समाजकल्याणविषयक शोधपत्रिका प्रकाशित झाल्या आहेत. आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका होत्या. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या जोडीने अनेक सामाजिक आशयाचे व मनोरंजक चित्रपट तयार केले. दिग्दर्शनासोबतच स्वतःच्या चित्रपटांचे कला दिग्दर्शन, वेशभूषा हे भागही तया स्वतः सांभाळीत असत. लोकसंस्कृतीचे प्रदर्शन हे त्यांच्या चित्रपटाचे वैशिष्ट्य असे. बाई आणि पाणी या चित्रपटांना राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले होते. अमेरिका, यु.के., फ्रान्स, स्पेन, नॉर्वे, कॅनडा, इजिप्त, रशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया येथील चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. व्ही. शांताराम पुरस्कार, अरविंदन पुरस्कार, फिल्मफेअर, कालनिर्णय आणि नानासाहेब सरपोतदार असे राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कार समित्यांवर परीक्षक म्हणून त्यांनी काम पहिले होते. दोघी या सिनेमासाठी त्यांना अकरा राज्य पुरस्कार मिळाले होते. दूरदर्शनसाठी अनेक टेलिफिल्म्स व मालिकाही त्यांनी निर्मित व दिग्दर्शित केल्या होत्या.

सुमित्रा भावे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

Website | + posts

Leave a comment