-विवेक पुणतांबेकर

‘किसी ने अपना बना के मुझको मुस्कुराना सिखा दिया…’. रेडिओवर हे गाणे लागले आणि झटकन डोळ्यासमोर आल्या आपल्या मराठमोळ्या उषा किरण. पन्नास च्या दशकात ज्या मराठी अभिनेत्री हिंदी सिनेविश्वात आपला ठसा उमटवून गेल्या त्यात उषा किरण अग्रगण्य. वसईच्या सुखवस्तू कोकणस्थ ब्राह्मण मराठे कुटुंबात २२ एप्रिल १९२९ साली उषा किरण यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा विष्णुपंत मोरेश्वर मराठे वसईचे प्रतिष्ठित नागरिक. मराठे घरात कुणीही फारसे शिकलेले नव्हते किंवा कलेचीही कोणाला आवड नव्हती. पाच मुली आणि एक मुलगा असे कुटुंब. उषाकिरण या दोन नंबर. त्याच्या जन्माच्या वेळी मुलगी झाल्याचे समजल्यावर घरात नाराजीचे वातावरण होते. या नवजात कन्येला नवीन कपडे सुध्दा शिवले नाही.

वडील इंडियन ह्युम पाईप कंपनीत नोकरीला होते. मुलगी झाल्याचे समजल्यावर बाहेर गावाहून घरी पैसे पाठवायला निघाले. वाटेतच चोरांनी लुटले. लहानपणी ऊषाच्या डोळ्यात फूल पडलेले. त्यामुळे आईला सतत काळजी. पण काही दिवसांनी डोळे आपसुकच बरे झाले. त्यांचे पाळण्यातले नाव होते सिंधू. लाडाने त्यांना उषा म्हणत. तेच नाव शाळेत लागले. शालेय शिक्षणासाठी त्यांना वसईला आजोबांकडे पाठवले. तिसरी पर्यंतचे शिक्षण म्युनिसिपालटीच्या शाळेत झाले. शालेय जीवनात मेळ्यात छोटी छोटी नाटके असत. त्यात उषा भाग घेत. कथाकथनात त्यांना पहिले बक्षीस मिळाले होते. बाळबोध आणि कडक शिस्तीच्या पण प्रेमळ आजोळी तिसरी पर्यंत उषाताई आणि त्यांची मोठी बहिण मजेत राहिल्या. अचानक आजोबा वारले. याच कालखंडात आईला संधीवाताचा झटका आला. आई अधू झाली. नाईलाजाने उषाताई आणि मोठी बहिण लिलाताई वडिलांच्याकडे मुंबईत आल्या. मुंबईत म्युनिसिपालटीच्या शाळेत या दोघी बहिणी जाऊ लागल्या. वडिल स्वभावाने विचित्र आणि तापट. मुंबईतील दोन खोल्यात या दोघींची धुसमट होत असे. त्यातच लहान भाऊ सुधीर अचानक वारला.

usha kiran

परत आईचे बाळंतपण आले म्हणून हे सगळे परत वसईला आले. चौथी पण मुलगी झाली. घरातील सगळे नाराज झाले. या नंतर परत सगळे जण मुंबईत आले. शिवाजी पार्कला कच्छ कँसल चाळीत रहायला लागले. त्याच मजल्यावर नाच शिकवायचा क्लास होता. वडिलांनी उषा आणि लिला या दोघींना नाचाच्या क्लासला घातले. शाळा संभाळत नाच शिकता शिकता गणपतीत तसेच इतर समारंभात क्लासच्या मुलांबरोबर या दोघी कार्यक्रम करु लागल्या. वडिलांची बदली भावनगरला झाली. तिथेही म्युझिशियन्स पकडून नाचाचे कार्यक्रम सुरु राहीले. परत वडिलांची बदली मुंबईत झाली. दादर स्टेशन समोरच्या विजयनगर बिल्डिंग मधे मराठे कुटुंब राहू लागले. एक दिवशी त्यांच्या वडिलांना समजले की अत्रे पिक्चर्स ला सिनेमासाठी लहान मुली हव्या आहेत. म्हणून या दोघांना घेऊन वडिल स्टुडिओत घेऊन गेले. तिथे काही या दोघींची निवड झाली नाही. गजानन जागिरदार यांच्या शिफारसी मुळे मो.ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतन संस्थेच्या आशीर्वाद नाटकात उषाताईना भुमिका मिळाली. या नाटकात उषाकिरण गात असत. ‘आशीर्वाद’ नाटक खूप गाजले. पण नातेवाईक मराठे कुटुंबाला टाळायला लागले. ब्राह्मणाची मुलगी नाटकात काम करते हेच सहन होईना. वयात आल्यामुळे नाटकातला रोल उषाकिरण ना सोडावा लागला. यानंतर रांगणेकरांच्या नंदनवन नाटकात उषा किरणना काम मिळाले.

नाच शिकायला नंदीमास्तर या बंगाली नर्तकाकडे उषाकिरण जाऊ लागल्या. इथे त्यांची सहकारी होती गीता रॉय. नंदनवन नाटक पडले. एक दिवशी डान्स मास्तर त्यांना घेऊन राजकमल स्टुडिओत घेऊन गेले. इथेच पहिल्यांदा ग्रुप डान्स मधे नाच करत उषा किरण प्रथम पडद्यावर आल्या. सेवन आर्ट सेंटर नावाची एक संस्था मुंबईत सुरु झाली. नाचाचे कार्यक्रम करणारी संस्था. महिना तिनशे रुपये पगारावर उषा किरण आणि त्यांची बहिण काम करू लागल्या. याच संस्थेतर्फे रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये स्टेज शो होता. जगप्रसिद्ध नर्तक उदय शंकर हा शो पहायला आले. त्यांनी ‘कल्पना’ सिनेमात काम करायची ऑफर या दोघा बहिणींना दिली आणि मद्रासला बोलावले. प्रत्येकी पाचशे रुपये पगार ठरला. सगळे मराठे कुटुंब मद्रास ला गेले. पार्श्वनाथ आळतेकर, उदय शंकर याच्या मार्गदर्शानाखाली तालमी सुरु झाल्या. आठ जण निवडले गेले. त्यात त्रावणकोर सिस्टर्स (ललिता, पद्मिनी आणि रागिणी) तसेच उषा किरण आणि त्यांची बहिण निवडल्या गेल्या. एकदा उदयशंकर बरोबर उषाकिरण चा वाद झाला. परिणाम या दोघींची हकालपट्टी झाली. परत सगळेजण मुंबईत आले. वडिलांनी नोकरी सोडून दिली. उद्योगपती वालचंद हिराचंद आणि त्यांचे बंघू रतनचंद हिराचंद यांच्याकडून अर्थसहाय्य घेऊन भूपाल पिक्चर्स ची स्थापना केली.

usha kiran in madhosh

आठवीतच या दोघी बहिणींची शाळेतून नावे जबरदस्तीने काढून टाकली. भूपाल पिक्चर्स चा पहिला सिनेमा ‘कुबेर’ ज्यात पु.ल. देशपांडे, इंदिरा चिटणीस, उषा किरण आणि त्यांच्या बहिणीने मुख्य भुमिका केली केली होती आपटला. वडिल कर्जबाजारी झाले. वयाने वाढलेल्या मुलींची लग्ने न करता सिनेमात घातल्याने नातेवाईकांची बोलणी खावी लागली. देणेकरी वाढले. सगळी संपत्ती जाऊन मराठे कुटुंब कफल्लक झाले. इतके होऊनही वडिलांचे सिनेमा काढायचे वेड जात नव्हते. निर्माते पी.बी.झवेरी यांच्या ‘सती सोण एटले हलाम जेठवो’ या गुजराथी सिनेमात उषा किरण च्या मोठ्या बहिणीला रोल मिळाला. यानंतरच्या झवेरी प्रॉडक्शन च्या दुसऱ्या सिनेमात बहिणीला सेकंड हिरॉईनचा रोल आणि उषाकिरण ना एक छोटासा रोल मिळाला. यानंतर वडिलांनी उषा किरणना बरोबर घेऊन स्टुडिओत चकरा मारायला सुरुवात केली. पी.बी. झवेरींच्या गुजराथी सिनेमात उषा किरणना हिरॉईनचा रोल मिळाला. प्रभात फिल्म कंपनीत स्क्रीन टेस्ट दिल्यावर पदरी आली निराशा. पण बाळासाहेब पाठक यांच्या सीतस्वयंवर सिनेमात उषा किरणना वेदवती ची भुमिका मिळाली. या भूमिकेमुळे उषाकिरण चे नाव झाले. यानंतर त्यांना मिळाला मल्टीस्टार सिनेमा ‘माया बाजार’. ‘माया बाजार’ अतिशय गाजला. हिंदी पौराणिक सिनेमात नाचाचे आणि छोटेमोठे रोल उषाकिरण ना मिळू लागले. अश्याच एका सिनेमाच्या वेळी अभिनेते डेव्हिड यांच्याशी भेट झाली. डेव्हिडनी सिगारेट ऑफर केली. उषा किरण भडकल्या. नंतर कळले डेव्हिड त्यांची मस्करी करत होते. गैरसमज दूर झाल्यावर डेव्हिड बरोबर जुळायला लागले.

usha kiran with dev anand

याचवेळी उषा किरण च्या आयुष्यात आले अमिया चक्रवर्ती. अमिया चक्रवर्ती एका नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे असा निरोप उषा किरण च्या वडिलांना मिळाला. ते उषा किरण ना घेऊन बॉंबे टॉकीज मध्ये गेले. तिथे थोड्या गप्पा झाल्यावर बाकी काही न विचारता अमिया चक्रवर्ती नी वेगवेगळ्या अँंगल्स नी उषा किरण चे फोटो घेतले. दोन दिवसानी भेटायला बोलावले. हिरॉईन चा रोल ऑफर केला. उषाकिरण ना पर्सनॅलिटी डेव्हलप करायला हेअर ड्रेसर नेमली. केस कुरळे केले. चांगल्या टेलर कडून व्यवस्थित ब्लाऊज शिवले. यामुळेच उठावदार दिसलेल्या उषाकिरण घरी गेल्या तेव्हा घरातील सगळे चकीत होऊन पहात राहीले. ज्या सिनेमाची ऑफर अमिया चक्रवर्ती नी दिली तो होता ‘गौना’. यात हिरो होता अनुप कुमार. या सिनेमापासून उषा मराठे ‘उषा किरण’ झाल्या. यानंतर त्यांना मिळाला मराठी सिनेमा जशास तसे. ‘पुढचे पाऊल’ मधली दुय्यम भुमिका मात्र उषा किरण ना नाकारली गेली. ‘जशास तसे’ चे दिग्दर्शक होते राम गबाले. राम गबाले आणि उषाकिरण यांची दोस्ती जमली. आऊटडोअर शूटिंग भोरला झाले. यात डोंबारणीचा रोल उषा किरण करत होत्या दोरीवर चालायचा शॉट डमी न घेता त्यांनी इतका हुबेहूब दिला की सगळे चकीत झाले. तसेच सुरा मारण्याचा शॉट एखाद्या अस्सल डोंबारणी सारखा दिला. हळूहळू राम गबाले आणि उषा किरण यांचे छान जमले.

‘गौना’ सिनेमा पुरा होईपर्यंत उषा किरण अमिया चक्रवर्तीकडे आकर्षित झाल्या. ते विवाहित होते. त्यांना दोन वर्षाचा मुलगा होता हे माहीत असूनही त्या स्वतःला सावरु शकल्या नाहीत. अमिया पण काहीतरी कारण काढून त्यांच्या घरी येऊ लागले. याच वेळी उषा किरण यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न पुण्यातील रास्ते यांच्या मुलाबरोबर ठरले. पैश्याची तंगी म्हणून गौना च्या निर्मात्या कडून कर्ज घ्यावे लागले. गौना अपयशी ठरला. एकही हिंदी निर्माता उषा किरण ना घ्यायला तयार नव्हता. मराठीत मात्र त्यांनी अभिनय केलेला ‘बाळा जो जो रे’ जबरदस्त चालला. चक्रवर्तीनी स्वतः ची ‘मार्स अँंड मूवर्स’ संस्था स्थापन केली. पहिला सिनेमा काढला ‘दाग’. उषा किरण ना यात सेकंड हिरॉईन चा रोल दिला. दिलिप कुमार निम्मी च्या प्रमुख भुमिका असलेला आणि शंकर जयकिशन नी संगीत दिलेला हा सिनेमा यशस्वी झाला. यात उषा किरण नी लावणी सादर केली. हिंदी सिनेमातली ही पहिली लावणी. ‘दाग’ च्या यशानंतर झांझर, बादबान हे सिनेमे उषाकिरण ना मिळाले. याच सिनेमाच्या भुमिकेसाठी उषा किरण ना फिल्मफेअर मिळाले. ‘दाग’ नंतर अमिया चक्रवर्ती नी ‘पतिता’ सुरु केले. फायनान्स मिळत नव्हता म्हणून घर गहाण टाकून पैसा उभा केला. ‘पतिता’ मध्ये हिरॉईनचा रोल उषा किरणना दिला.

usha kiran with kishore kumar

मराठीत ‘आकाशगंगा’ सिनेमा उषा किरण ना मिळाला. या सिनेमासाठी संगीतकार वसंत प्रभूनी उषा किरणना नाच शिकवला. यानंतर स्री जन्मा ही तुझी कहाणी या सिनेमातली उषा किरण यांची भुमिका खुप गाजली. या नंतर एक आणखी माईल स्टोन सिनेमा उषा किरण ना मिळाला ‘दूधभात’. या भावनाप्रधान सिनेमाला संगीत लाभले होते पु.ल.देशपांडे यांचे. इकडे ‘पतिता’ चे शूटींग जोरात सुरु होते. हिरो होते देवानंद. अबोल स्वभावाचे देवानंद आणि उषा किरण यांच्यात शॉट व्यतिरिक्त फारसे संभाषण होत नसे. शंकर जयकिशनच्या मधुर संगीताने नटलेला पतिता यशस्वी झाल्यावर उषा किरण हिंदी सिनेजगतात यशस्वी कलाकार म्हणून ओळखल्या गेल्या. पण घरातील वातावरण बिघडत चालले. पैसा आला पण वडिलांचे पिणे वाढत चालले. वेड्यासारखा खर्च होऊ लागला. चक्रवर्तीनी कॉन्टॅक्टचे पैसे उषा किरण च्या वडिलांना न देता बँकेत अकाऊंट उघडून जमा करायला सुरुवात केली. अश्या अवस्थेत चक्रवर्तीची बायको कमला अपसेट झाली. तिने उषा किरण ना सांगितले ‘मी डायव्होर्स घेते तुम्ही दोघे लग्न करा’. उषा किरण ना धक्का बसला. पुर्ण विचार केल्यावर चक्रवर्तीं बरोबर संबंध तोडून टाकायचा निर्णय त्यांनी घेतला.

मग त्यांनी पंधराव्या वर्षांपासून मनात भरलेल्या मनोहर खेरांशी लग्न करायचा निर्णय घेतला. मनोहर खेर एम.बी.बी.एस ला युनिव्हर्सिटीत पहिले आले होते. त्यांच्याशी उषा किरणनी संपर्क साधला. भेट घेतल्यानंतर उषा किरण नी आपली परिस्थिती आणि मनस्थिती मोकळेपणाने सांगितली. डॉक्टर खेर लग्न करायला तयार झाले. फक्त सगळे स्थिरस्थावर होईपर्यंत एक वर्ष थांबायला सांगितले. इकडे अमिया चक्रवर्तीच्या ‘बादशहा’चे शूटिंग उषा किरण नी पुर्ण केले. याच वेळी किशोरकुमार बरोबर ‘धोबी डॉक्टर’ सिनेमा केला. विक्षिप्त स्वभावाच्या वडिलांनी मनात अढी धरून कन्यादान करायला नकार दिला. नरिमन पॉईन्टवर पुर्वी पँगोडा रेस्टॉरंट होते. तिथे रजिस्टर पध्दतीने लग्न झाले. लग्नाला आई-वडील तसेच दोन्ही बाजूची मंडळी हजर होती. दुसरे दिवशी रिसेप्शनला सिनेविश्वातली भरपूर मंडळी तसेच अनेक डॉक्टर हजर होते.

usha kiran with om prakash in chupke chupke

 

खेरांच्या घरी मात्र उषा किरणचे भरपूर कोडकौतुक झाले. बादबान सिनेमा रिलीज झाला. त्या भुमिकेसाठी उषाकिरण ना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. उषाकिरण ना भारत सरकार तर्फे युगोस्लावियाचा दौरा करायची संधी मिळाली. परत आल्यानंतर लग्नाची बेडी , तुझे आहे तुजपाशी नाटकात उषा किरण नी काम केले. औलाद, काबुलीवाला, दिल भी तेरा हम भी तेरे, परिवार सिनेमात कामे केली. पहिल्या अपत्याची चाहूल लागली. अश्या अवस्थेत ह्रषिकेश मुखर्जींच्या ‘मुसाफिर’ चे शूटींग पुर्ण केले. याच वेळी अमिया वारले. डॉक्टर खेरांनी मोठ्या मनाने अमियांच्या अंत्यदर्शनासाठी उषा किरणना नेले. उषा किरण नी एका ठिकाणी उल्लेख केला आहे की ‘मी भाग्यवान इतका दिलदार नवरा मला लाभला’. मोठ्या मुलाच्या अद्वैतच्या जन्मानंतर शिकलेली बायको, पोस्टातली मुलगी, कन्यादान, मेहंदी रंग लाग्यो, गहरा दाग,  गरीबाघरची लेक, नझराना, मदहोश या सिनेमात उषा किरणनी दमदार अभिनय केला. दुसऱ्या मुलीच्या संहिताच्या (तन्वी) जन्मानंतर सिनेमात काम करणे सोडले. ‘गारंबीचा बापू’ नाटकात काशिनाथ घाणेकरांबरोबर काम केले.

डॉक्टर खेरांना अमेरिकेत फेलोशिप मिळाली होती. त्यांच्या बरोबर उषा किरण अमेरिकेला गेल्या. त्या मुक्कामात नँश टीव्ही च्या कार्यक्रमात काम करायची संधी उषा किरणना मिळाली. परत आल्यावर त्या मुलांच्या संगोपनात रमून गेल्या. बारा वर्षानंतर ह्रषिकेश मुखर्जीनी बावर्ची सिनेमाची ऑफर दिली. यानंतर, चुपके चुपके, मिली मध्ये कामे केली. ‘बावर्ची’ पासून ह्रषिकेश मुखर्जी उषा किरण चे राखी बंधू झाले. बदलत्या वातावरणाने उषा किरण नी सिनेविश्वाचा निरोप घेतला. मुलीने बाबा आझमी शी लग्न करायचा निर्णय त्यांना प्रचंढ मनस्ताप देऊन गेला. पण मोठ्या मनाने खेर दांपत्याने लग्न लावून दिले. मुलगा अद्वैत अनेक नोक-या केल्यावर स्थिरावला. उत्तरा ही गुणी मुलगी सून म्हणून लाभली. १९९६ -९७ या वर्षात त्या मुंबईच्या नगरपाल होत्या. डॉक्टर मनोहर खेर सायन हॉस्पिटलचे डीन होते. समाधानी जीवन जगलेल्या उषा किरण वयाच्या ७१ व्या वर्षी ९ मार्च २००० ला कँसर ने गेल्या. अविस्मरणीय भूमिकेमुळे त्या रसिकांच्या मनात कायम रहातील.

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment