-© विवेक पुणतांबेकर

 

“यूं हसरतोंके दाग मोहोब्बत ने धो लिए
खुद दिल से दिल की बात कही और रो दिए”

अदालत चे गाणे ऐकताना डोळ्यासमोर येते नर्गिस. आज तिचा स्मृतीदिन. तिचा जीवनपट उलगडायचा हा अल्पसा प्रयत्न नर्गिसची कहाणी सुरु करायच्या आधी आपण थोडे मागे जाऊ. नर्गिसची आजी दिपा बालविधवा बनली परित्यकतेचे जीवन तिच्या नशिबी आले. त्याला कंटाळून घर सोडून गेली. एका नाचगाणे करणार्‍या कंपूत सामिल झाली. आता एक नवे दालन तिच्यासाठी खुले झाले. पण तिला जाणवले की या साठी किंमत मोजावी लागेल. बरोबरचा सारंगीवादक मियाॅंजान ने तिला लग्नाची मागणी घातली. धर्मत्याग करुन त्याच्याबरोबर दिपा ने निकाह केला. पहिला मुलगा गेला मग त्यानंतर जन्मलेला मुलगा जल्लाई. त्यानंतर जन्मली जद्दन. हे सुख पण फार काळ लाभले नाही. जद्दन सहा वर्षाची असतानाच मियाजाॅंन अल्लाला प्यारे झाले. जद्दन चा गळा फार छान होता. आता पूर्वीचाच व्यवसाय स्वीकारणे दिपा ला भाग होते. जद्दन गाणे शिकत होती. पण तिला पुढचे शिक्षण देणे भाग होते. आपल्या दोन्ही मुलांना घेऊन दिपा कलकत्त्याला गेली. तिथे तिची ओळख गोहरजान या प्रसिध्द नर्तकीशी झाली. (याच गोहरजान वरुन कमाल अमरोहींना पाकिझा चा विषय सुचला) गोहर जान चा वरदहस्त जद्दन ला लाभला. हळूहळू अनेक प्रतिष्टीत लोकांना भेटायची संधी जद्दन ला लाभली. हळूहळू ती धनसंपन्न झाली. तिच्या गानकलेतल्या कौशल्याने मत्सर वाटून गोहरजान जद्दन ला टाळायला लागली. यानंतर जद्दन कलकत्ता सोडून बनारसला निघून गेली. तिथे आपला जम बसवला. शेट बी.जी.बाबू जद्दनवर मेहेरबान झाले. तिला बी.जी.बाबूंपासून मुलगा झाला. त्याचे नाव अख्तर. पण काही दिवसातच बी.जी. बाबू मरण पावले. यानंतर जद्दन मैसूर ला गेली. ठिकठिकाणी फिरुन नाचगाणी करुन लोकांचे मनोरंजन करु लागली. हार्मोनियम वादक मीर साहेब तिच्या प्रेमात पडले. त्यांच्या पासून झालेला मुलगा अन्वर (अभिनेता अन्वर हुसेन). यानंतर मीरसाहेबांनी जद्दन चा नाद सोडला. मग जद्दनकच्या आयुष्यात आला रावळपिंडीच्या धनिकाचा मुलगा उत्तमचंद मोहन. मेडिकल काॅलेजमध्ये शिकणारा. उत्तमचंद च्या घरच्यांना हे प्रेमप्रकरण मंजूर नव्हते. अखेर उत्तमचंद नी धर्मत्याग केला अब्दुल रशीद नाव घेतले आणि जद्दन बरोबर निकाह केला. अब्दुल रशीद पासून जद्दनला झालेली मुलगी फातमा कनिज. घरात तिला बेबी रानी म्हणत. बेबी रानी म्हणजेच नर्गिस.

नाच गाण्याच्पा पेशाला जद्दन कंटाळली. हकीम रामप्रसादनी जद्दन ला कलकत्त्याला बोलावून राजा गोपीचंद सिनेमात भुमिका दिली. मग यानंतर ‘इन्सान और शैतान’ या सिनेमात चांगली भुमिका केल्यामुळे जद्दन चे नाव झाले. मग जद्दन कायमची मुंबईकर झाली. सिनेमात मिळालेल्या माफक यशानंतर जद्दनबाईने संगीत मोदी टोन नावाची सिनेमा कंपनी सुरु केली. तलाशे हक सिनेमा निर्माण केला. या नंतर मॅडम फॅशन सिनेमा निर्माण केला. या दोन्ही सिनेमात नर्गिस बालकलाकार होती.

नर्गिस त्यावेळी कोटीन मेरी हायस्कूल मध्ये शिकत होती. बालकलाकार म्हणून भुमिकाही करत होती. मोहनबाबूंचे नर्गिसवर फार प्रेम होते. नर्गिस ला वडिलांप्रमाणे डाॅक्टर व्हायचे होते. अभिनेत्री व्हायचे नव्हते. जद्दनबाई तापट होती. तिच्या हट्टापाई कोणाचेच चालत नसे. जद्दनबाईने निर्माण केलेले सिनेमे अपयशी झाले. नर्गिसला सिनेमात अभिनेत्री बनवायचा तिने निश्चय केला. निर्मात्यांचे उंबरे झिजवायला तिने सुरुवात केली. सडपातळ नर्गिस निर्मात्यांना फारशी पसंत पडेना. मेहबूब खान नी तकदीर सिनेमासाठी नर्गिस ची निवड केली. नाईलाजाने नर्गिस अभिनेत्री बनली. नंतर जद्दनबाईने रोमिओ ज्युलिएट सिनेमा नर्गिस साठी निर्माण केला. मग यानंतर अस्मत सिनेमा निर्माण केला. हे सिनेमे फारसे चालले नाहीत. पण आपल्या सहजसुंदर अभिनयाने नर्गिस चे नाव झाले. त्या काळी सिनेमा निर्माण करायला लायसन्स घ्यावे लागे. ही पध्दत रद्द झाली आणि जोमाने सिनेनिर्मिती सुरु झाली. नटनट्यांचा भाव वधारला. भरपूर पैसा मिळायला लागला. जद्दनबाई च्या दृष्टीने नर्गिस हे पैसा मिळवायला चलनी नाणे बनले. रहाणीमान उंचावले. यातच नर्गिसला घोड्याच्या रेसचा नाद लागला. रेसकोर्सवर तिच्या आयुष्यात आला कॅप्टन अन्सारी. नर्गिसला अन्सारी आवडला. या दोघांच्या भेटी सुरु झाल्या. धूर्त जद्दनबाईने खोडा घातला आणि अन्सारी दूर झाला. नर्गिसची स्वप्ने उधळली गेली. यानंतर इशरत तिच्या आयुष्यात आला. पण त्याच्या वागण्याने संतप्त होऊन नर्गिस ने त्याला दूर केला. मग प्रिंन्स पृथ्वीसिंग वारियाचा पुत्र र्‍होडसी तिच्या आयुष्यात आला. धूर्त जद्दनबाईने या संबंधांना उत्तेजन दिले. पण काही दिवसातच उच्च शिक्षणासाठी र्‍होडसी स्वित्झर्लंड ला निघून गेला. जाताना लग्नाचे वचन देऊन गेला. नर्गिस वाट पहात राहिली. त्याने एके दिवशी पत्र लिहून नकार कळवला. नर्गिसवर हा मोठा आघात होता. कोणीही आपला जीवनसाथी म्हणून स्वीकार करणार नाही हे कटू सत्य तिला जाणवले. अशा वेळी जद्दनबाई कडे ‘आग’ सिनेमाची एक नायिका म्हणून राज कपूरनी प्रस्ताव दिला. त्यावेळी नर्गिस साठी चाळीस हजार रुपये मानधन जद्दनबाई ने मागितले. पैसे असतील तरच घराची पायरी चढ असे राज कपूरना सुनावले. राज कपूरनी ठरवले या जद्दनबाईना नाक घासायला लावीन. चाळीस हजार रुपये घेऊन आले. करार झाला आणि राज नर्गिस पर्वाला सुरुवात झाली.

त्या कालखंडात राजकपूर अभिनेते म्हणून पुढे येत होते. नजिकच्या भविष्यकाळात ते नामवंत निर्माता दिग्दर्शक बनतील याची कोणालाही कल्पना नव्हती. दिलीप कुमारांनी अभिनय क्षेत्रात नाव मिळवले होते. नर्गिस दिलीप जोडीचे मेला, बाबूल, हलचल सिनेमे गाजले होते. त्यानंतर आला अंदाज. यात राज कपूर पण होते. आग सिनेमाला मिळालेल्या माफक यशानंतर राज कपूर नी ‘बरसात’ सिनेमाची तयारी सुरु केली. या काळात जद्दनबाई च्या मनात दिलिप कुमार ला जावई करायची स्वप्ने जद्दनबाई पाहू लागली. पण नर्गिस राजकपूरांकडे आकर्षित झाली. जद्दनबाईने धोका ओळखला. ‘बरसात’ च्या आउटडोअर शूटींगसाठी काश्मिर ला जायला नर्गिस ला तिने मनाई केली. नाईलाजाने राजकपूरनी काश्मिरचा बॅकड्राॅप शूट केला आणि महाबळेश्वर ला शिकारा उभारुन बरसात चे शूटिंग सुरु केले. नर्गिसनी राजकपूर ना आपला स्वप्नातला राजकुमार समजायला सुरुवात केली आणि जद्दनबाईचे वर्चस्व झुगारायला सुरुवात केली. जद्दनला न कळत ती फक्त राजकपूरांच्या सिनेमात मन रमवू लागली.हळूहळू निर्माते या दोघांना एकत्रच सिनेमात घ्यायला लागले. नर्गिसच्या मैत्रीने राजकपूर यांची मार्केट व्हॅल्यू वाढायला लागली.

बरसातच्या अपूर्व यशानंतर राजकपूरनी आवारा सिनेमाची घोषणा केली. हा सिनेमा आपल्याच स्टुडिओत निर्माण करायचा त्यांनी निश्चय केला. बरसात मधल्या राज नर्गिस यांच्या एका पोझ वर आर.के. फिल्मस चे बोधचिन्ह तयार झाले. नर्गिसचे वडिल मोहनबाबूंचे निधन झाले. या दुःखातून बाहेर येण्यासाठी स्वतःला चित्रपटात तिने गुंतुन घेतले. घरात पैसा येऊ लागला. नर्गिस आर्ट कर्सन या सस्थेतर्फे मोठा भाऊ अख्तरने सिनेनिर्मिती सुरु केली. हे सिनेमे फारसे यशस्वी झाले नाहीत. (एकदा फेमस लॅबोरेटरीला आग लागली.त्यात नर्गिस ने निर्माण केलेल्या सिनेमाच्या निगेटीव्ह जळून गेल्या.) यातून मिळणारा थोडाफार पैसा पण नर्गिसच्या हाती येत नसे. राज कपूर मधे गुंतलेल्या नर्गिस ला दूर करण्याचे जद्दनबाइंचे सारे उपाय संपले. शरीराने आणि मनाने कमजोर झालेली जद्दनबाई अल्लाला प्यारी झाली. आता कसलेही बंधन नर्गिस वर नव्हते. पूर्ण वेळ ती राज कपूर बरोबर घालवू लागली. आर.के. स्टुडिओच्या निर्मितीत तिचा पण सहभाग होता. तिथल्या कामगारांची व्यवस्था पण ती पहात असे. फक्त राज कपूर बरोबर काम करायचे ठरवल्यामुळे बाहेरचे सिनेमे स्वीकारणे तिने कमी केले. घरात दोन्ही भाऊ तिच्या जीवावर मजा मारत. नर्गिस चे हाल होत. त्या ताणतणावामुळे नर्गिस आजारी पडली. बैजू बावरा सिनेमाची भूमिका तिला सोडावी लागली. मेहबूब खान यांच्या आन सिनेमातली भुमिका तिने नाकारली.

संपूर्णपणे राज कपूरमय झालेली नर्गिस हे जाणून होती की राजकपूर यांचा विवाह आधीच झालेला आहे. राज कपूर यांची मुले तिने आपलीच मानली होती. सुरुवातीला कृष्णाकपूर आणि नर्गिस चे संबध चांगले होते. कपूर घरातल्या समारंभांना नर्गिस हजेरी लावत असे. राज नर्गिस संबंध वाढत चालले आणि कृष्णाकपूर आणि राजकपूरांच्या आई रमादेवीअस्वस्थ होऊ लागल्या. जमेल तसा पाणउतारा करणे सुरु झाले. त्यातच राज कपूर यांच्या पझेसिव स्वभावाचा त्रास नर्गिस ला होऊ लागला. अभिनेत्री म्हणून मनाची तगमग होतच होती. बूट पाॅलिश मधली नकारात्मक भुमिका तिला हवी होती पण राज कपूरनी नकार दिला. तसे आपण राजकपूर यांची पत्नी बनू शकणार नाही तरी पण राजकपूर बरोबर रहाण्याचा विचार तिने केला. चेंबूरला जागा विकत घेतली. नाराज नर्गिससाठी राजकपूरनी अजंठा या नृत्यप्रधान टेक्निकलर सिनेमाची घोषणा केली. पण हा सिनेमा निर्माण झालाच नाही. घरातल्या कटकटी वाढत होत्याच. वाढत्या खर्चाने आर्थिक गणित कोलमडले होते. अनेक संकटांना तोंड देत नर्गिस यशाच्या शिखरावर पोहोचली होती. आता मात्र घसरण सुरु झाली. आपल्या जीवनाची दिशा कशी बदलावी याचा विचार ती करत होती. ४ फेब्रुवारी १९५७ ला नर्गिस आर्ट प्राॅडक्शन चा मॅनेजर राजेश वर्माचा विवाह होता. संध्याकाळी रिसेप्शनला जाण्यासाठी राज कपूरना न्यायला नर्गिस आर.के. स्टुडिओत आली. तिथे राजकपूर यांच्याशी झालेल्या वादंगानंतर तिने निर्णय घेतला सर्वस्व वाहूनही इथे आपली किंमत नसेल तर आपण संबंध तोडणे हा एकच उपाय आहे. त्या दिवसानंतर तिने आर.के. स्टुडिओत जाणे बंद केले आणि आर.के. फिल्मस मधली भागीदारी बंद केली. मेहबूब खान औरत सिनेमाचा रिमेक करणार होते. त्यांनी नर्गिसला नायिकेची भुमिका देऊ केली. दिलीप कुमार प्रमुख भुमिकेत काम करणार होते. नर्गिसने दिलिपकुमार बरोबर काम करायला नकार दिला. ( दीदार सिनेमाच्या वेळी दिलीप कुमारबरोबर झालेल्या वादामुळे त्यांच्या बरोबर कधीच काम न करण्याचा निश्चय नर्गिस ने केला होता) मग त्या ऐवजी राजकुमार निवडला गेला. हा सिनेमा होता मदर इंडिया. या सिनेमातच नर्गिसला जीवनसाथी मिळायचा होता.

 

मदर इंडिया ची निर्मिती सुरु झाली. आर्थिक अडचणी वाढल्या.स्टुडिओ गहाण ठेवावा लागला. शूटींगच्या वेळी अपघातांची मालिका सुरु झाली. कॅमेरामन फरेदून इराणींचा हात फ्रॅक्चर झाला.कुमकुम आजारी पडली. स्टुडिओतला लाईट खाली पडला. मेहबूब खान थोडक्यात बचावले. सुनील दत्त चा पाय मुरगळला.नर्गिस कळवळली तिने हळूवारपणे त्याची शुश्रूषा केली.पुराचे दृश्य घेताना नर्गिस जोरात आपटली. त्यामुळे ती आजारी पडली. आगीचे दृश्य घेताना आग भडकली त्यात नर्गिस सापडली.क्षणार्धात विचार न करता सुनिल दत्त ने धाव घेतली. नर्गिस ला खांद्यावर घेऊन तो बाहेर आला. खूप भाजली होती. लगेचच दोघांना हाॅस्पिटल ला दाखल केले. दोघेही हळूहळू बरे झाले. परत शूटिंग सुरु झाले.एके दिवशी उदास सुनिल दत्त ला पाहून नर्गिस ने चौकशी केली. तिला समजले सुनिल दत्तची लहान बहिण राणीला क्षयरोग झाला होता. दोन लहान मुले होती तिला. उपचाराची गरज होती. नर्गिस थेट सुनिल दत्तच्या घरी गेली. उपचाराची व्यवस्था करुन राणीच्या लहान मुलांना आपल्या घरी घेऊन आली. शूटिंग मधून वेळ मिळाला की नर्गिस सुनिल दत्त च्या घरी जायला लागली. एकदा उशीर झाला म्हणून तिला पोहोचवायला सुनिल दत्त आला. त्यानी अनपेक्षितपणे विचारले माझ्याशी लग्न करशील? नर्गिस गोंधळली. काहीच उत्तर न देता घरी गेली. दोन दिवस विचार केला. राणी कडून जाणून घेतले की सुनिल दत्त च्या आईला हे लग्न पसंत पडेल का? सुनिल दत्तच्या आईला नर्गिस सून म्हणून पसंत होतीच. दोन दिवसानंतर राणीने नर्गिसचा होकार सुनिल दत्त ला सांगितला. दोघांनी हा निर्णय मेहबूब खान ना कळवला. त्यांनी विनंती केली की मदर इंडिया प्रदर्शित होईपर्यंत विवाह जाहिर करु नका. २५ ऑक्टोबर १९५७ ला मदर इंडिया रिलीज झाला. ११ मे १९५८ ला नोंदणी पध्दतीने विवाह करायचा ठरला. नर्गिसच्या सांगण्यावरुन सुनिल दत्तने राज कपूरना फोन करुन सांगितले आज मी फातमा रशिद बरोबर लग्न करतो आहे. ही बातमी ऐकून खचलेल्या राज कपूरांच्या हातून फोन चा रिसीवर गळून पडला. या धक्क्याने राज कपूर यांची मनःस्थिती पार बिधडली. मद्यपान तर अतोनात वाढलेच शिवाय नर्गिस बरोबरच्या सिनेमांची रीळे वेड्यासारखी सतत पहात. दोन वर्षे सिनेमा निर्मिती थांबली. स्टुडिओतल्या ३२ जणांचे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होते. ह्रषिकेश मुखर्जी, मुकेश या जिवलग मित्रांनी सतत धीर दिला. राज कपूर आपल्या अहंकारामुळे यातून सावरले आणि चित्रनिर्मिती परत सुरु केली. नंतर पद्मिनी, वैजयंतिमाला आयुष्यात आल्या तरीही नर्गिसची आठवण त्यांच्या मनात कायम होती. आपल्या प्रत्येक समारंभाला सिनेमाच्या प्रिमीयरला नर्गिस ला निमंत्रण जायचे. ती येत नसे.

nargis with sunil dutt

आपल्या संसारात नर्गिस पूर्णपणे रमली.सुनिल दत्तला उत्तेजन देऊन अजंठा आर्टस या फिल्म कंपनीची स्थापना करायला लावली. मदर इंडिया सिनेमाने तिला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. समाजकार्याला वाहून घेतले.मतिमंदांसाठी शाळा सुरु केली. सुनिल दत्त च्या यादे सिनेमाची कथा नर्गिस ची होती. या एकपात्री सिनेमात फक्त तिची सावली दिसली. तरीही प्रेक्षकांनी ओळखले ही नर्गिस होती. मोठा भाऊ अख्तर हुसेन याच्या रात दिन मधली दुहेरी भुमिका तिने जबरदस्त साकारली. अनेक वर्षे रखडलेला रात और दिन २९ ऑगस्ट १९६८ साली मुंबईच्या लिबर्टी सिनेमात प्रदर्शित झाला. या सिनेमाने तिला राष्ट्रीय बहुमान आणि उर्वशी अवाॅर्ड मिळाले. हे तिचे पडद्यावरचे शेवटचे दर्शन.यानंतर पूर्णवेळ समाजकार्याला वाहून घेतले. जवानांना रिझवायला आघाडीवर जाऊन मनोरंजन केले. फिल्म इन्स्टिट्युट च्या घडणीत मोठा सहभाग घेतला. चिल्ड्रेन फिल्म सोसायटी चे अध्यक्षपद,तसेच अनेक संस्थांमध्ये तिचा सहभाग होता. सोव्हिएत लॅन्ड नेहरु अवाॅर्ड मिळवले. राज्यसभेवर खासदार म्हणून तिची नियुक्ती झाली. राजकपूर बरोबर संबंध तोडले तरी शम्मीकपूर,शशीकपूर यांच्याशी तिचे संबंध छान होते.शम्मीकपूर ला तो काॅलेजमध्ये असताना ग्रामोफोन आणि इंग्लिश रेकाॅर्डस तिने भेट दिल्या.त्या ऐकून शम्मीने नृत्यकला शिकला. शम्मी आणि गीताबाली यांच्या लग्नाच्या पंगतीत नर्गिसने जेवण वाढले होते. पृथ्वीराज कपूर आणि रमादेवी आठ दिवसाच्या अंतराने गेले.तेव्हा समाचाराला सर्वप्रथम धावले नर्गिस आणि सुनिल दत्त. मेरा नाम जोकरच्या दणदणीत अपयशाने खचलेले राजकपूर शम्मी कपूरकडे एका पार्टीत समोरासमोर आले. तिने टोमणा मारला ही इज फिनिश. अस्वस्थ राजकपूर नी परत धैर्य केले. आपल्या स्फूर्तीदेवतेला दाखवून द्यायच्या जिद्दीवर बाॅबी ची निर्मिती केली आणि परत सिनेविश्वात जोमाने उभे राहीले . यातला डिंपल ऋषि कपूरच्या पहिल्या भेटीचा प्रसंग नर्गिस राज पहिल्या भेटीची आठवण करुन गेला.

ऋषि कपूर ची एंगेजमेंट पार्टी आर.के. स्टुडिओत होती. रात्री दहा वाजता सगळे दत्त कुटुंब आर.के.स्टुडिओत आले. राज कपूरना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. या पार्टीत नर्गिसने कृष्णा कपूरांची क्षमा मागितली. त्यांनी ही सर्व विसरुन तिला माफ केले. या घटनेचा उल्लेख करुन तब्बसुम नी दूरदर्शनवर नर्गिस ला विचारले आप दोनो फिरसे एकसाथ काम करोगे? नर्गिस हसून म्हणाली हां जरुर. १९८० साली नर्गिस ला स्वादुपिंडाचा कॅन्सर झाला. उपचारासाठी अमेरिकेत जावे लागले. अनेक शारिरीक व्याधींना तोंड दिल्यावर तब्येत सुधारली. ६ मार्च १९८१ ला भारतात परत आली. आपल्या मुलाच्या राॅकी सिनेमाचा ट्रायल शो पहाताना बेहोश झाली. तिला ब्रीच कॅन्डी हाॅस्पिटलमध्ये हलवले. ३ मे १९८१ला सकाळी नर्गिस या जगातून गेली. जवळ जवळ सगळी फिल्म इंडस्ट्रीमधली माणसे अंत्यदर्शनाला आली. दुपारी राज कपूर आल्यावर अंत्ययात्रा निघाली. तिला एका बाजूने राजकपूरनी खांदा दिला तर दुसर्‍या बाजूनी सुनिल दत्तनी. तिच्या इच्छेनुसार चर्नीरोड च्या कबरस्थानात जद्दनबाई च्या कबरी शेजारी तिचे दफन झाले. सिनेविश्वात अशी जोडी झाली नाही. एकमेकांपासून दुरावल्यावर ही कधीही एकमेकांबद्दल अपशब्द काढले नाहीत. नर्गिस, राज कपूर सुनिल दत्त , मेहबूब खान, आर.के.स्टुडिओ  इतिहासजमा झाले. आता उरल्या त्या फक्त आठवणी.

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment