-अशोक उजळंबकर

बॉक्स ऑफिसच्या खिडकीवर लक्ष ठेवून चित्रपट तयार करणारे अनेक निर्माते व दिग्दर्शक आपण पाहिले आहेत. बंगाली दिग्दर्शक मात्र कथानकावर भर देत असत. त्यात परत संगिताकडे देखील त्यांचे लक्ष असायचे. मुखर्जी या आडनावामुळे प्रेक्षक बरेच दिवस सुबोध मुखर्जी (Subodh Mukherjee) यांना बंगाली बाबू समजत होते; परंतु ही आसामी उत्तर प्रदेशातील झांशी या गावची निघाली. 1942 च्या चलेजाव चळवळीच्या वेळी पकड वॉरंट निघाल्यावर सरळ आपले बंधू शशीधर मुखर्जी यांच्या घरचा रस्ता धरणारे सुबोध मुखर्जी झांशी येथून थेट मुंबईत येऊन दाखल झाले. (Remembering Director Subodh Mukherjee)

      झांशी येथे बी.ए.एल.बी. पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर खरे तर झांशी किंवा लखनौ येथे कोर्टात वकिली करायचा विचार; परंतु स्वारी तडक मुंबईत आपल्या भावाकडे येऊन त्याचा सहायक म्हणून फिल्मी दुनियेत दाखल झाली. शशीधर मुखर्जी यांचे फिल्मीस्तानचे बॅनर खूपच फॉर्मात होते. ‘चल चल रे नौजवान’ या अशोककुमार व नसीम बानू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन ग्यान मुखर्जी करीत होते, तेव्हा त्यांचा सहायक म्हणून शशीधर यांनी सुबोध यांना काम दिले. ‘चल चल रे नौजवान’ चे संगीत गुलाम हैदर यांनी दिले होते. सहायक म्हणून केवळ एकाच चित्रपटाकरिता काम केल्यानंतर सुबोध मुखर्जी यांना स्वतंत्ररीत्या काम मिळावे असे वाटायला लागले.

‘पेइंग गेस्ट’ या चित्रपटाची कथा त्यांच्या डोक्यात घोळत होती व अशोककुमार, नलिनी जयवंत यांना घेऊन चित्रपट तयार करण्याचा त्यांचा विचार होता; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे तो मागे पडला व ‘मुनीमजी’ हा देवानंद, नलिनी जयवंत यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. फिल्मीस्तानचे बॅनर व सचिन देव बर्मन यांचे संगीत यामुळे ‘मुनीमजीला’ बऱ्यापैकी यश मिळाले. ‘जीवन के सफर मे राही, मिलते है बिछड जाने को, और दे जाते है यादे, तनहाई मे तडपाने को’ हे किशोरच्या आवाजातील गीत आजही ‘मुनीमजी’ची आठवण करून देते. मुनीमजीमध्ये गाणी पुष्कळ होती; परंतु एक-दोन गाणी खूप गाजली. मुनीमजी नंतर देव-सुबोध यांची खूपच मैत्री झाली व ‘पेईंग गेस्ट ’ हा चित्रपट देवानंदला बरोबर घेऊन तयार करण्याचा त्यांनी विचार केला.

      नलिनी जयवंत व देवानंद ही जोडी ‘मुनीमजी’मध्ये चमकली होतीच; परंतु परत नलिनीला घेण्याचा विचार बाजूला ठेवून सुबोध मुखर्जी यांनी देवानंदबरोबर नूतनला करारबद्ध केले. भाडेकरू म्हणून राहायला येणाऱ्या एका युवकाची गुलाबी प्रणय कथा त्यांनी इतक्या सुरेखरीत्या पेश केली की ‘सब देखते रह गये’. देवानंदचा चॉकलेटी अभिनय व नूतनचा अवखळपणा ‘पेंइंग गेस्ट’मध्ये पहायला मिळाला. नायकाची वाट पाहत गच्चीवर उभी राहून चंद्राकडे बघत गाणे म्हणणारी नूतनची छबी आजही डोळ्यासमोरून जात नाही. ‘चांद फिर निकला मगर तुम न आये, जला फिर मेरा दिल करू क्या मै हाये’, ही मजरूहची रचना लताच्या आर्त स्वरात सचिनदा यांनी खूपच सुरेख तयार केली होती. किशोर, आशा, लता यांच्या आवाजातील ‘पेइंग गेस्ट’ची सर्वच गाणी गाजली होती. ‘मुनीमजी’नंतर आलेल्या सुबोध मुखर्जी यांच्या ‘पेइंग गेस्ट’ला मिळालेल्या यशामुळे त्यांचे सर्वत्र नाव झाले होते.

      थोरले बंधू शशीधर मुखर्जी व इतरांकडून थोडेसे अर्थसाह्य मिळवून सुबोध मुखर्जी यांनी 1958 मध्ये स्वतःची निर्मिती संस्था काढली व युवा प्रेमविवाह विषयावर चक्क ‘लव्ह मॅरेज’ चित्रपटाची निर्मिती केली. संगिताची जबाबदारी मात्र सचिन देव बर्मन यांच्याऐवजी फॉर्मात असलेल्या शंकर-जयकिशन या दुकलीवर सोपवली होती. लताच्या आवाजातील ‘कहे झुम झुम रात ये सुहानी’ हे गाणं टॉपवर होतंच. या शिवाय इतर सगळी गाणी कर्णमधुर होती. लता-रफीच्या आवाजात, ‘धीरे-धीरे चल चाँद गगन मे, कही ढल ना जये रात टूट न जाये सपने’ हे द्वंद्वगीत तर अप्रतिम होतं. ‘लव्ह मॅरेज’करिता मालासिन्हाची निवड सुबोध मुखर्जी यांनी केली होती. ‘लव्ह मॅरेज’ला रौप्यमहोत्सवी यश मिळालं व सुबोध मुखर्जी यांची गुंतवणूक दुप्पट झाली.

‘दिल देके देखो’, ‘तुमसा नही देखा’पासून शम्मी कपूर फॉर्मात आला होता व त्याने आपली अभिनयाची स्टाईल पूर्णपणे बदलली होती. शम्मी कपूरला घेऊन त्यांनी ‘जंगली’ चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली व संगीताकरिता शंकर-जयकिशन यांनाच करारबद्ध केले. नसीम बानू आपली कन्या सायरा बानू हिला चित्रपटसृष्टीत प्रवेश देऊ पाहत होती व त्याच सुमारास सुबोध मुखर्जी यांच्या ‘जंगली’बद्दल तिला समजलं. शम्मी कपूर – सायरा बानू या जोडीला घेऊन त्यांनी ‘जंगली’ तयार केला. लाडात वाढलेल्या रागिट स्वभावाच्या एका युवकास एक शांत स्वभावाची तरुणी कशी ताळ्यावर आणते याचे सुरेख चित्रण त्यांनी ‘जंगली’मध्ये केले होते. लाजऱ्या स्वभावाची सायरा ‘जंगली’मध्ये  खूपच गोड दिसली. ललिता पवार तिला काही विचारत असताना तिचे एक ठराविक उत्तर असायचे. ‘जी हाँ, जी नही’. मुळात सेटवरदेखील ती खूपच अबोल होती; परंतु शम्मी कपूरने तिला खूप धीट बनवले. ‘जंगली’ चित्रपटाची गाणी किती गाजली, हे मी सांगायला नको. दिग्दर्शक म्हणून सुबोध मुखर्जी यांनी आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती.

      सायरा बानू व विश्‍वजित या जोडीला घेऊन त्यांनी ‘एप्रिल फूल’ तयार केला. ‘जंगली’ची बरोबरी हा चित्रपट करू शकला नाही; परंतु म्युझिकल हिट म्हणत खूप गाजला. विश्‍वजितसारख्या ठोकळ्या नायकाकडून त्यांनी बऱ्यापैकी अभिनय करून घेतला होता. त्यानंतर जॉय मुखर्जी, सायरा बानू यांच्या ‘शागीर्द’ची कथा त्यांनी लिहिली; परंतु ‘शागीर्द’चे दिग्दर्शन मात्र समीर गांगुली यांच्याकडे सोपविले होते. ‘शागीर्द’चे निर्माते तेच होते; परंतु त्यांनी दिग्दर्शन केले नाही. ‘जंगली’पासून सुबोध मुखर्जी यांनी रंगीत चित्रपटांची सुरुवात केली. त्यांचे अनुकरण अनेकांनी सुरू केले. कृष्णधवल चित्रपटांचा जमाना जवळपास संपण्याच्या मार्गावरच होता.

      ‘सपनो का सौदागर’मध्ये राज कपूरची नायिका म्हणून दाखल झालेल्या हेमामालिनीला सोबत घेऊन त्यांनी ‘अभिनेत्री’हा चित्रपट तयार केला. एका कलावंताच्या जीवनावर वेगळा प्रकाश टाकण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. हेमामालिनी-शशी कपूर यांच्या ‘अभिनेत्री’मध्ये प्रमुख भूमिका होत्या. ‘सारे -ग-म-प-प-ध-नि-सा’ हे किशोर-लताच्या आवाजातील गाणे खूप गाजले. जुळ्या बहिणींची कथा असलेला ‘शर्मिली’ मात्र समीर गांगुली यांनी दिग्दर्शित केला होता. राखीचे ‘जीवन-मृत्यू’द्वारा आगमन झाले होते. ‘शर्मिली’मुळे तिच्या अभिनयाला खरा ब्रेक मिळाला.

      ‘शर्मिली’ला एस.डी. बर्मन यांचे संगीत होते. कोणत्याही कथानकात थोडीशी उपकथानके जोडून प्रत्येक प्रसंगाला एक वेगळेपणा देणे हा सुबोध मुखर्जी यांचा खास गुण. प्रत्येक प्रसंगात रंगत कशी येईल, याकरिता ते कसोशीने प्रयत्न करीत असत. कलावंतांना प्रत्येक प्रसंगात अभिनयाचे वेगळेपण कसे दाखवायचे हे ते समजावून सांगत असत. आपल्या स्वतःच्या बॅनरशिवाय त्यांनी ‘साज और आवाज’ व ‘तिसरी आँख’ हे चित्रपट दिग्दर्शित केले. साज और आवाजचे निर्माते, संगीतकार नौशाद यांचे भाऊ होते, तर तिसरी आँख समीर मुखर्जी यांचा होता.

      ‘तिसरी आँख’ मारधाड से भरपूर होता. यात धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, झिनत अमान, नीतू सिंग, अमजदखान यांच्या प्रमुख भूमिका होत्या, तर संगीताची बाजू लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची होती. शर्मिलीमध्ये थोडाफार वेगळा सस्पेन्स मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. सुबोध मुखर्जी यांच्या संपूर्ण चित्रपट कारकीर्दीकडे दृष्टिक्षेप टाकल्यास असे दिसून येईल की, त्यांनी नेहमीच नवे कलावंत घेऊन निर्मिती केली. देवसोबत त्यांनी तीन-चार चित्रपट केले; परंतु नायिका मात्र नव्या घेतल्या. ‘जंगली’च्या वेळी शम्मी कपूरच्या पदरी अनुभव तसा शून्यच होता; परंतु शम्मी कपूरकडून त्यांनी ‘जंगली’मध्ये उछलकूद करताना थोडाफार अभिनयदेखील करून घेतला होता. ‘जंगली’ची नायिका सायरा बानू नवीनच होती. ‘जंगली’च्या सेटवर ती खूपच बुजल्यासारखी वावरत असताना त्यांनी तिला अभिनयाचे योग्य प्रशिक्षण देऊन सादर केले. ‘सपनो का सौदागर’नंतर हेमामालिनीच्या नावावर फारसे चित्रपट नव्हते; परंतु तिला घेऊन त्यांनी ‘अभिनेत्री’ यशस्वी केला होता. हेमामालिनीचा अभिनय अभिनेत्रीमध्ये बराच खुलला होता. ‘शर्मिली’ची राखीदेखील नवीनच होती. तरी पण दुहेरी भूमिका देऊन त्यांनी राखीकडून सुरेख काम करून घेतले.

      नवे कलावंत घेण्यात फायदा असतो याची चांगली जाणीव सुबोध मुखर्जी यांना झाली होती. या कलावंतांना पुढे जाण्याची धडपड असल्यामुळे हे शिकायला तयार असतात. या उलट जे कलावंत स्थिरावलेले आहेत, त्यांना अभिनय शिकविणे जड जाते. सायरा बानू त्यांच्या चित्रपटात खुलून दिसली होती. ‘जंगली’मधील तिचा चेहरा पाहिल्यानंतर ‘शागीर्द’मधील नटखट नायिका हीच का, असा प्रश्‍न पडतो. सायरा बानूचा अभिनय त्यांनी ‘शागीर्द’मध्ये खूपच खुलविला होता.

      1975 नंतर चित्रपटसृष्टीमध्ये झालेले बदल पाहिल्यानंतर सुबोध मुखर्जी यांनी आपली चित्रपटनिर्मिती जवळपास थांबविली होती. 1985 साली त्यांनी राजबब्बर, रती अग्निहोत्री, उत्पल दत्त यांना सोबत घेऊन ‘उल्टा सिधा’ या चित्रपटाची निर्मिती केली व चित्रपट उल्टाच झाला. नव्या कलावंतांची वागण्याची ऐट, तारखांचा प्रश्‍न यामुळे त्यांनी या चित्रपटावर फारसे लक्ष केंद्रित केले नाही. त्यानंतर मात्र ते चित्रपटनिर्मितीकडे वळलेच नाहीत. संगीत, कथानक, फोटोग्राफी व इतर तांत्रिक बाबींकडे त्यांचे नेहमीच लक्ष असायचे. त्यांचे चित्रपट फार दर्जेदार जरी नसले तरी अतिसुमारदेखील नव्हते. बदलत्या काळानुसार या क्षेत्रातून निवृत्ती घेण्याचे त्यांनी ठरविले.

***

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment