-© विवेक पुणतांबेकर.

मराठी सिनेमात उषाकिरण पाठोपाठ चमकलेली एक आणखी अभिनेत्री सीमा. मुंबईतल्या गिरगाव च्या राममोहन शाळेतल्या चारजणी सिनेमात चमकल्या. मीनाक्षी शिरोडकर, नलिनी जयवंत, जयश्री गडकर आणि नलिनी सराफ उर्फ सीमा देव. आज सीमाताईंचा वाढदिवस. आज त्या ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. सीमाताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज सीमा देव यांचा जीवनपट तुमच्या समोर मांडायचा हा अल्पसा प्रयत्न.

उषाकिरण प्रमाणेच सीमा ताई पण घरच्या परिस्थिती मुळे सिनेमात आल्या. वडिलांचा आधार नव्हता. गिरगावातल्या बनाम हॉल लेन मधल्या गिरगाव टेरेस चाळीत १६ ×१८ च्या लहानश्या खोलीत आई, आजी, मावशी, नलिनी आणि तिच्या दोन बहिणी आणि एक भाऊ असे सातजणांचे कुटुंब रहात असे. आई ठाकूरद्वारच्या पेडणेकर कंपनी नोकरी करायची. तिला मिळत असलेल्या शंभर रुपये पगारात भागवावे लागे. मावशी आणि मोठी बहिण गुलाब ( दिग्दर्शक राजदत्त यांची पत्नी) यांना शालेय शिक्षण सोडावे लागले. नलिनी, लहान बहीण सुशीला आणि भाऊ यांचे शिक्षण पुरे करायला एंब्रॉयडरी शिकवायचे क्लासेस आईने सुरु केले. नलिनी आणि सुशिला अभ्यासात हुशार होत्या. भाऊ मात्र हूड होता. नलिनी ला डान्सची आवड होती. शाळेच्या मदतीसाठी ठेवलेल्या डान्स च्या कार्यक्रमात नलिनी ने पहिल्यांदा स्टेजवर डान्स केला.मधून मधून १५ ऑगस्ट, गणपतीच्या कार्यक्रमात नलिनी रेकॉर्ड डान्स करायची.लहानपणी ती झुरळाला खूप घाबरायची.एकदा डान्स करताना हातावर एक झुरळ बसल.डान्स थांबला.रेकॉर्ड वाजत होती.लहानगी नलिनी घाबरून झुरळाकडे पहात राहिली.प्रेक्षक हसू लागले.इतक्यात झुरळ उडाले.त्याबरोबर लय आणि ताल पकडून नलिनी ने डान्स सुरु केला.

संगीतकार आनंद जीं चा ऑर्केस्ट्रा होता त्यात पण नलिनी गात असे.धरातली ओढाताण वाढायला लागली म्हणून नलिनी च्या दोधी बहिणी आणि मावशी सिनेमात कोरस मध्ये गाऊ लागल्या. चाळीत कुजबुज सुरू झाली गौड सारस्वत समाजातल्या मुली सिनेमात गातात यावर टिका सुरु झाली. पण इलाजच नव्हता.त्यावेळी रात्री रेकॉर्डिंग होत असे. लहान नलिनी ने हट्ट धरला मला पण यायचे आहे. आशा दिदीं बरोबर रेकॉर्डिंग होते. रात्री साडेनऊ पर्यंत नलिनी बाकावर झोपून गेली.काही केल्या टेक ओके होत नव्हता आशादिदींनी सांगितल्यामुळे नलिनी ला आईने उठवले आणि टेक ओके झाला. त्या वेळी नलिनी ला कल्पना नव्हती की भविष्यात आशादिदींची गाणी ती पडद्यावर म्हणणार होती. नलिनी ची आजी स्वाभिमानी आणि काटकसरी होती. सारस्वत पद्धतीचा स्वयंपाक छान करत असे. आईच्या शिकवण्या श्रीमंत लोकांकडे असायच्या.मग परिस्थिती पाहून ते जुन्या साड्या , कपडे, चपला द्यायचे. वापरता वाईट वाटायचे पण कमीपणा कधीच वाटला नाही. याच काळात भारतीय विद्याभवन च्या राम शबरी बँले मध्ये काम करायची संधी नलिनी ला मिळाली.प्रत्येक शो चे दहा रुपये मिळत.या शो च्या अनुभवामुळे नलिनी घडत होती. दिग्दर्शक दिनकर पाटील यांना सिनेमा साठी नवीन मुलगी हवी होती. नलिनी आणि तिची आई त्यांना भेटायला गेल्या पण नकार मिळाला. राम शबरी नंतर आणखी दोन बँलेत नलिनी ला काम मिळाले.नूरजहाँ बँलेत आशा पारेख बरोबर नलिनी धोबिणीचे काम करत असे.प्रोड्युसर नडियादवाला तो शो पहायला आले.त्यांनी आशा पारेख ला आपल्या अयोध्यापती सिनेमात सीते चा रोल दिला आणि नलिनी ला लक्ष्मणाच्या बायकोचा. ५०० रुपयाचे कॉंट्रँक्ट झाले. हे साल होते १९५६.नलिनी नववीत गेली होती. तिने पूर्ण वेळ अभ्यासात लक्ष घातले. मँट्रिक होऊन नोकरी करायची हा विचार पक्का होता. पण नियतीच्या मनात वेगळचं होतं.

एके दिवशी निवेदिता जोशी चे वडिल गजानन जोशी अंमलदार नाटकाचे प्रपोजल घेऊन आले. प्रत्येक प्रयोगाला तीस रूपये नाईट मिळणार होती. नाईलाजाने नलिनी ने काम स्विकारले. तिथेच तिची ओळख सुरेश फाळके यांच्या शी झाली. फिल्मिस्तान ला मराठी सिनेमा साठी नवीन नायिका हव्या होत्या. नलिनी च्या मनात नव्हते. पण फाळके यांच्या आग्रहामुळे नलिनी आणि तिच्या आईने फिल्मिस्तान च्या गोरेगाव च्या स्टुडिओत जायचा निर्णय घेतला. तो दिवस होता १६ फेब्रुवारी १९५७. दोधींनी चर्नीरोड स्टेशनवरून गाडी पकडली. ग्रँटरोड स्टेशनवर एक तरुण गाडीत चढला आणि या दोघींच्या समोरच्या बाकावर बसला.नलिनी आईला म्हणाली हा बघ आंधळा मागतो डोळा चा खलनायक रमेश देव.गोरेगाव आले.रमेश देव उतरले.पाठोपाठ या दोघी.तिघेही एकदम स्टुडिओत शिरले.तोलाराम जालन च्या ऑफिसमध्ये गेले.नलिनी ची स्क्रीन टेस्ट झाली. तोलाराम जालन नी रमेश देव बरोबर करार केला आणि नलिनी ला सांगितले ४५० रुपये महिना पगारावर मी तुला घेतो.दुसरे दिवशी शूटिंग सुरु होणार होते. उसना नवरा या नाटकावर मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेल्या सिनेमाचे नाव होते आलिया भोगासी. यात सहनायिकेचा रोल नलिनी ला मिळाला. आनंदात मायलेकी घरी गेल्या दुसरे दिवशी स्टुडिओत आल्याबरोबर तोलाराम जालन नी सांगितले तुमच्या मराठी लोकांनी सांगितले या नव्या मुलीला इतका पगार देऊ नका. म्हणून तुझा पगार फक्त २०० रुपये असेल.नलिनीचे डोळे भरून आले.पण इलाज च नव्हता. शूटिंग सूरू झाले. हळूहळू रमेश देव बद्दल वाटणारी भिती कमी होऊ लागली. एकदा मात्र शॉट घेताना रमेश देव चा पाय शिफॉन साडीवर पडला आणि साडी फाटली. कंपनीने पगारातून पैसे कापून घेतले.(आज तागायत या फाटलेल्या साडीची आठवण सीमाताई रमेश देव ना करतात).याच सिनेमात नलिनी चे नाव बदलायला लागले.

एका ज्योतिषाने स वरून ठेवायला सांगितले. त्याच वेळी नूतन चा सीमा सिनेमा गाजला होता. भावाच्या सूचनेप्रमाणे नलिनी चे नाव बदलले. त्या आता झाल्या सीमा. मँजेस्टिक सिनेमात आलिया भोगासी चा प्रिमीयर झाला. योगायोग म्हणजे या थिएटर च्या समोर असलेल्या डॉक्टर पागनीसांच्या हॉस्पिटलमध्ये सीमाताई जन्मल्या होत्या.प्रिमीयर शो ला जायला नवी साडी हवी होती. ओळखीच्या बाईंच्या उधार खात्यावरून चंदेरी साडी सीमाताईंनी घेतली.थिएटर जवळ होते त्यामुळे चालत थिएटर वर आल्या. लोकांनी शेरा मारलाच टँक्सी ला पैसे नाहीत. आलिया भोगासी बरा चालला.या नंतर आला पहिले प्रेम. यावरून मधुसूदन कालेलकरांनी नाटक लिहिले दिल्या घरी तू सुखी रहा. यानंतर सीमाताईंनी फिल्मिस्तान साठी तिसरा सिनेमा स्विकारला बोले तैसा न चाले. १९५८ साली सीमाताईंनी फिल्मीस्तान सोडले.मग कँमेरामन व्ही.अवधूत यांच्या ग्यानबा तुकाराम सिनेमात ४०० रुपयाच्या कॉंट्रँक्ट वर सीमाताई ना रोल मिळाला. हिरो होते रमेश देव. आऊट डोअर शूटींग ला बैलगाडीतून रमेश देव सीमा प्रवास करतात असा शॉट होता.मधेच ढग आले. शूटिंग थांबले.तोच मौका साधून रमेश देव नी सीमावर आपले प्रेम व्यक्त केले. त्यांनी ही मूकसंमत्ती दिली. इथून प्रेमकहाणी सुरु झाली.

या नंतर सीमाताई ना मिळाला सिनेमा यंदा कर्तव्य आहे. हा सिनेमा फारसा चालला नाही. बाहेर चे सिनेमे मिळायला लागले.घरची परिस्थिती सुधारत होती. भावाला नोकरी लागली होती. पैश्याची गरज असल्याने मिळेल ते सिनेमे सीमाताई स्विकारत होत्या. राजमान्य राजश्री, भैरवी, सुन असावी तर अशी, यंदा कर्तव्य आहे असे सीमाताई नीं केले. राजमान्य राजश्री चे दिग्दर्शक राजा ठाकूर यांच्याशी त्यांचा परिचय झाला. राजाभाऊ परांजपे सीमाताईंचे आवडते दिग्दर्शक. पण त्यांच्या कडे काम करायचा योग येत नव्हता. नाटकात काम करायची हौस होतीच. उसना नवरा, प्रेमसन्यास, भावबंधन, लग्नाची बेडी या नाटकात सीमाताई भुमिका करत होत्या. एकदा पेपरमध्ये सीमाताई नी वाचले राजा परांजपे आपल्या आगामी जगाच्या पाठीवर सिनेमात नलिनी जयवंत ना नायिकेचा रोल देणार आहेत. पण दिवाळी च्या सुमारास राजा परांजपे सीमाताईंच्या घरी आले. जगाच्या पाठीवर मधला आंधळी चा रोल तुच करायचा असे त्यांनी सांगितल्यावर सीमाताई ना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्यांचा होकार आल्यावर राजा परांजपे यांनी सांगितले या साठी तुला मेहनत करावी लागेल. मी तुला अभिनय शिकवीन. जगाच्या पाठीवर सिनेमासाठी राजा परांजपे यांनी सीमाताईंवर खूप मेहनत घेतली. आंधळी वास्तववादी वाटावी म्हणून जुन्या बाजारातून फाटकी साडी चोळी आणली होती. लोणावळा एस.टी.स्टँडवर धक्का लागला ग गाण्याचे शूटींग सुरु होते. तिथला एक दादा भडकला. पैश्यासाठी आंधळीला उन्हात नाचवतोस असे म्हणून राजा परांजपे यांना मारायला धावला. सगळ्यांनी मधे पडून त्याला समजावले हे शूटिंग आहे. तेव्हा तो वरमला.इतका हुबेहुब रोल सीमाताईंचा होता. जगाच्या पाठीवर मराठीतला माईलस्टोन सिनेमा झाला.

यानंतर भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा सिनेमातला रोल सुलोचनाबाईंच्या शिफारशीमुळे सीमाताई ना मिळाला. १९६० सालानंतर माहिम च्या मोगल लेन मधल्या लछमन निवास मध्ये सराफ कुटुंब रहायला गेले. सुवासिनी सिनेमा च्या वेळी गैरसमजाने रमेश देव यांच्याशी सीमाताई नी अबोला धरला.काम करताना कुठेच हे जाणवू देत नसत. मग एक धागा सुखाचा या दत्ता धर्माधिकारी यांचा सिनेमा सीमाताई ना मिळाला. © विवेक पुणतांबेकर वरदक्षिणा सिनेमाच्या वेळी रमेश देव आणि सीमाताई यांच्यातला अबोला संपला. राजा ठाकूर यांचे दोन सुंदर सिनेमे सीमाताई ना मिळाले. रंगल्या रात्री अशा आणि पाहू रे किती वाट. आधी कळस मग पाया या सिनेमाबरोबरच भाभी की चुडियाँं चा रोल पण त्यांना मिळाला. रमेश देव आणि सीमा यांच्या लग्नाला अनेकांनी विरोध करूनही १ जुलै १९६३ ला कोल्हापूरच्या राजाराम टॉकीज मध्ये या दोघांचा विवाह खूप थाटामाटात झाला. या दोघांचे लग्न व्हायच्या सहा महिने आधी मोठ्या बहिणीचे लग्न दिग्दर्शक राजदत्त यांच्याशी झाले.

लग्न झाल्यावर सिनेमात कामं करायची नाहीत असे सीमाताई नीं ठरवले होते. फक्त लग्नाआधी साईन केलेले सिनेमे पुर्ण करत होत्या. पण रमेश देव यांचे मेहुणे यांचे मत होते की सिनेमात कामं करणे सुरु ठेव. त्यांनी रमेश ना सांगितले तुझी पत्नी कलाकार आहे. फारतर तू असलेल्या सिनेमात तिला काम करु दे. ही गोष्ट रमेश देव ना पटली. कोल्हापूर मध्ये काम करणे सीमाताई ना सोपे जायचे कारण घर जवळ होते. मोठ्या मुलाचा अजिंक्य चा जन्म झाल्यावर पाच महिन्यांनी सीमाताई नीं परत नाटकात कामं करायला सुरुवात केली. माझा कुणा म्हणू मी मधली त्यांची भुमिका फार गाजली.लग्नाआधी मिया बीबी राजी आणि प्रेमपत्र या दोन हिंदी सिनेमात त्यांनी कामं केली होती. अजिंक्य एक वर्षाचा झाला आणि देवेंद्र गोयल यांच्या दस लाख सिनेमात रमेश देव सीमा जोडीला रोल मिळाला. नायिका होती बबीता (करीश्मा आणि करीना कपूर ची आई) हिंदी मध्ये कामे मिळायला लागल्यावर सीमाताई नीं.हेअर ड्रेसर ठेवली.

अजिंक्य नंतर पाच वर्षानी त्यांचा दुसरा मुलगा अभिनय जन्मला. बी.नागीरेड्डी यांच्या यही है जिंदगी सिनेमात त्यांना संजीव कुमार च्या पत्नी चा रोल मिळाला. संजीव कुमार बरोबर आणखी एक सिनेमा त्यांनी केला राखी और हथकडी. त्यांनी आईची कामं करायला सुरुवात केल्यावर भरपूर रोल हिंदी सिनेमात मिळायला लागले. मराठी त अपराध प्रपंच मधल्या त्यांच्या भुमिका पण लक्षणीय होत्या. प्रपंच च्या प्रिमीयर शो ला ह्रषिकेश मुखर्जी आले होते. त्यांच्या बरोबर काम करायची सीमाताईंची इच्छा होती .ती पूर्ण झाली आनंद सिनेमाने.

रमेश देव आणि सीमाताईंनी मराठी चित्रपट निर्माण केला या सुखानों या. यात राजा परांजपे यांची पण छोटीसी भुमिका होती. तोच त्यांचा अंतिम सिनेमा होता. ९ फेब्रुवारी १९७८ ला राजाभाऊ गेले. जानकी सिनेमात अविस्मरणीय काम सीमाताई नी केले. मुले मोठी झाली. अजिंक्य अभिनेता बनला. त्याच्या साठी या दोघांनी सर्जा सिनेमा ची निर्मिती केली. धाकटा मुलगा अभिनय आर्किटेक्ट आहे. मुले, सुना नातवंडे यांच्यात रमून गेलेले सिनेविश्वावतले एकमेव आदर्श जोडपे. 

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment