-डॉ. राजू पाटोदकर

मराठी चित्रपट सृष्टीतील एक एक जबरदस्त, भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेत्री जयश्री गडकर. अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शक, लेखक, उत्तम नृत्य कौशल्य अशा विविधांगी कलागुणांनी निपून अशा जयश्री गडकर यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना ही भावपूर्ण शब्दसुमनांजली…

जयश्री गडकर यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९४२. कारवार जवळील कणसगिरी या गावचा. कणसगिरी (सदाशिवगड) हा भाग पूर्वीच्या कारवार जिल्ह्यातील पण तो आता कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात येतो. लहानपणापासूनच त्यांना नृत्याची आवड होती. हा योगायोगच ….चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटातून १९५५ यावर्षी नृत्य कलाकार म्हणून पहिल्यांदा त्यांनी रुपेरी पडद्यावर आपले आगमन केले.

jayshree gadkar

मला आठवतं लहानपणी म्हणजे स्वतंत्ररित्या मी ज्या वेळेस चित्रपट पाहू लागलो, त्यावेळी बीड येथील अशोक टॉकीज मध्ये “हर हर महादेव’ हा चित्रपट पाहिला. या धार्मिक चित्रपटात महादेवाच्या भूमिकेत दारासिंह तर पार्वतीच्या भूमीकेत जयश्री गडकर होत्या. त्यांनी साकारलेले पार्वतीमातेचे रूप, ते सौंदर्य, ती भूमिका माझ्या मनावर खूप बिंबली. कदाचित बालवयाचा तो परिणाम असावा.. पुढे मी त्यांना ज्या वेळी प्रत्यक्ष भेटलो त्यावेळी ‘हर हर महादेव’ चा उल्लेख करून त्या भूमिकेबद्दल बोललो.

jayshree gadkar in tulsi vivah

१९९३ ला ‘सासर माहेर’ या मराठी चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूर येथील पॅलेस मध्ये सुरू होते. चित्रपटाचे शूटिंग कव्हरेज करण्यासाठी खास मुंबईहून काही पत्रकार कोल्हापूरला आले होते त्यात लोकमत साठी मी देखील होतो. चित्रपटात अशोक सराफ, डॉ. निशिगंधा वाड, अशोक शिंदे, बाळ धुरी, स्वप्नगंधा, नेहा बोरगावकर तसेच पाहुणा कलावंत म्हणून माझा मित्र दिपक देऊळकर होता. महत्त्वाचे म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शन जयश्री गडकर करत होत्या. मातब्बर मराठी, हिंदी दिग्दर्शकानं सोबत काम केलेल्या जयश्रीबाईंचा दिग्दर्शक म्हणून हा जरी पहिलाच चित्रपट असला तरी आपल्या कलेशी प्रचंड प्रामाणिक असल्यामुळे एखाद्या मुरब्बी दिग्दर्शका प्रमाणे त्यांनी पटापट त्या दिवशीचे दोन-तीन सीन संपविले. सेटवर सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरयुक्त भिती होती. हे मला त्यादिवशी जाणवले. त्यांच्या पत्रकारांशी गप्पा झाल्या. अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही बाबी कशा वेगवेगळ्या आहेत हे त्या सेटवर तर मी अनुभवले प्रत्यक्ष बोलताना देखील जयश्रीबाईंनी याचं सुरेख विश्लेषण केलं. पुढे त्यांनी ‘अशी असावी सासू’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन व निर्मिती केली.

jayshree gadkar

 

लोकप्रिय मराठी अभिनेत्री

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिनकर पाटील यांनी ‘दिसतं तसं नसतं’ या चित्रपटातून छोट्याशा भूमिकेसाठी जयश्री बाईंना संधी दिली. राजा गोसावी यांच्या सोबत या चित्रपटातील काम होतं. त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. जयश्रीबाईंचे काम दिनकर पाटलांना आवडले आणि त्यांनी ‘सांगते ऐका’ या महत्त्वाच्या चित्रपटातून पुढे त्यांना प्रमुख भूमिका दिली. हा तमाशाप्रधान चित्रपट होता. या चित्रपटाने मोठा इतिहास घडविला हे सर्वश्रुत आहे. त्या नंतर चित्रपटांचा हा प्रवास जोरदारपणे सुरू झाला.
जवळपास २५० चित्रपटातून जयश्रीबाईंनी काम केले. चार दशके त्यांनी गाजवली. त्यांनी केलेल्या काही प्रमुख चित्रपटांची नावे घ्यायची ठरली तर ती ‘सुगंधी कट्टा’, ‘सांगते ऐका’, ‘साधी माणसं’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘घरकुल’, ‘सून लाडकी या घरची’, ‘पंढरीची वारी’, ‘कसं काय पाटील बर हाय का’, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जिद्द’, ‘आई मला क्षमा कर’, ‘लाखात मी देखणी’, ‘मल्हारी मार्तंड’, ‘मानिनी’, ‘वैशाख वणवा’, ‘गण गौळण’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘नया कदम’, ‘मास्टरजी’, ‘श्रवण कुमार’, ‘विर भिमसेन’, ‘शेर शिवाजी’, ‘नजराना’, ‘माया बाजार’, ‘ईश्वर’, ‘लव कुश’, ‘पत्तो की बाजी’, ‘कृष्णा कृष्णा’ अशी एकापेक्षा एक सुपरहिट आहेत.

jayshree gadkar in avaghachi sansar

तमाशाप्रधान चित्रपटातून सुरुवातीला काम केलेल्या जयश्रीबाईंनी पुढे उत्तम असे धार्मिक चित्रपट देखील केले. तसेच त्यांच्या सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी स्वीकारले. प्रत्येक चित्रपटांतून त्यांचा अभिनय सरसच ठरला. त्यामुळे लोकप्रिय व यशस्वी मराठी अभिनेत्रीचे मोठे बिरूद त्यांना लाभले. मराठी व हिंदी दोन्ही भाषेतून चित्रपट केले. अरुण सरनाईक, रमेश देव, सूर्यकांत, डॉ. श्रीराम लागू ,दारासिंग, चंद्रकांत यांच्यासमवेत त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. १९८७ मध्ये ‘रामायण’ या दूरदर्शन वरील मालिकेने तमाम भारतीयांना मोठी भुरळ पाडली होती. रामानंद सागर उर्फ पापाजी निर्मित या मालिकेत जयश्रीजींनी कौशल्यामातेची भूमिका केली होती तर त्यांचे पती अभिनेते बाळ धुरी हे राजा दशरथ झाले होते.

तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर पाच वेळेस महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेल्या जयश्री गडकर यांनी ‘अशी मी जयश्री’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. आपल्या अप्रतिम अभिनयाने अजरामर झालेल्या जयश्री गडकर यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी २९ ऑगस्ट २००८ रोजी या जगातून एक्झीट घेतली. उत्तम व उत्कट अभिनयाचे एक पर्व संपले.

jayshree gadkar
……………………………….

जयश्री गडकर यांची काही गाजलेली गाणी…

१) नाचू किती नाचू किती कंबर लचकली..सुगंधी कट्टा

२) बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला.. सांगते ऐका

३) पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा..मल्हारी मार्तंड

४) सोळा वरीस धोक्याचं.. सवाल माझा ऐका

५) राजाच्या रंग महाली…साधी माणसं.

६) ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे…साधी माणसं.

७) बाई मी पतंग उडवीत होते.. लाखात मी देखणी

८) कशी गवळण राधा बावरली..एक गाव बारा भानगडी

९) राया आता रिक्षा होऊ दे सुरू… एक गाव बारा भानगडी

१०) पप्पा सांगा कुणाचे….घरकुल

raju patodkar
Dr Raju Patodkar
+ posts

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) (वर्ग-1) या पदावर कार्यरत.

शिक्षण- पीएच.डी, एम.ए., (जर्नालिझम), एम.ए., (मराठी), एम.ए., (राज्यशास्त्र), एम.ए., (समाजशास्त्र), बॅचलर इन ड्रामा, हिंदी (पंडित), जीडीसीए, बी.कॉम, बी.जे., जवळपास दोनशे मराठी, हिंदी मालिका तसेच 25 मराठी चित्रपटात अभिनय. राज्यातील विविध वर्तमान पत्रातून लेखन. जवळपास 5 हजार लेख-मुलाखती प्रकाशित.

पी.एच.डी. विषय श्री. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद एक चिकित्सक अभ्यास. (1975 ते 2005)

भ्रमणध्वनी क्र.- 9892108365.

Leave a comment