-अजिंक्य उजळंबकर

तिचे अजिबात कळत नसलेले गीत ऐकून मध्येच तो म्हणतो… 
‘हो हो आपड़िया’ .. ते ऐकून ती उत्तरते “हा हा जैसे सब समझ गया!” .. 
परत दोघे गातात.. मग तो म्हणतो…  ‘नी रोम्बा अड़गा इरुक्के’ हे ऐकून प्रश्नार्थक ती विचारते
“रम्बा? ये रम्बा-मम्बा क्या है?”
काहीतरी खूप मोठे असे तो तिला खुणावतो … 
या सगळ्या गोंधळावर अखेरीस ती गाते,
“इतनी ज़ुबानें बोलें लोग हमजोली,
दुनिया में प्यार की एक है बोली,
बोले जो शमा …
बोले जो शमा, परवाना …
मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना
तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अंजाना … “
शेवटी काहीच न कळलेला तो तिला एवढेच म्हणतो.. ‘परवा इल्लये नल्ला पादरा’ म्हणजे ‘तू खूप छान गातेस!’ 
चाळीस वर्षांपूर्वी हे सर्व सिनेमागृहात पाहून, ऐकून, घरच्यांच्या नकळत सिनेमागृहात गेलेल्या व आत एकमेकांच्या बाजूला बसलेल्या कितीतरी प्रेमी युगलांनी  सिंगल स्क्रीन थिएटरच्या अंधारात एकमेकांचा हात अजून घट्ट धरला होता. ‘वासू-सपना’ ही तर केवळ पडद्यावर दिसणाऱ्या हिरो-हिरोईन्सची नावे होती परंतु प्रत्यक्षात अगणित जोडप्यांना या दोघांमध्ये स्वतःचीच प्रेमकथा दिसायची. सिनेमाचा इम्पॅक्ट इतका काही जबरदस्त होता की सिनेमाच्या क्लायमॅक्स प्रमाणे कित्येक जोडप्यांनी आपली प्रेमकथाही यशस्वी होत नाहीए हे बघून वासू-सपना प्रमाणेच जीवन संपविले. गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिलेले .. 
“हम तुम दोनों जब मिल जायेंगे,
एक नया इतिहास बनायेंगे,
और अगर हम ना मिल पाए तो
तो भी एक नया इतिहास बनायेंगे” 
हे बोल तरुणाई प्रत्यक्षात उतरवेल  याची दिग्दर्शक के. बालचंदर यांनीही कल्पना केली नव्हती. १९७७ साली मुमताज अभिनीत ‘आईना’ नावाच्या सिनेमाने के बालचंदर यांचा दिग्दर्शक म्हणून हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश झाला होता पण तो अयशस्वी ठरला. १९७८ साली “मारो चरित्र” नावाच्या तेलगू सिनेमाने तेथील तरुणाईला वेड लावले होते.  ‘के बालचंदर’ दिग्दर्शित या सिनेमाचा नायक होता ‘कमल हासन’. कमल हासन यांचा तेलगू चित्रपटसृष्टीत नायक म्हणून हा पहिला सिनेमा होय. मग याच नायकाला कायम ठेऊन  ‘मारो चरित्र’ च्या हिंदी रिमेकचे काम बालचंदर यांनी काही वर्षांनी सुरु केले. हा कमल हासन यांचा हिंदीतील पहिला चित्रपट ठरणार होता. आणि मग १९८१ साली भारतीय सिनेमा इतिहासातील “वन ऑफ दि ग्रेटेस्ट लव्ह स्टोरी” समजला जाणारा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘एक दुजे के लिए’. (Ek Duuje Ke Liye) अभिनेत्री रती अग्निहोत्री व माधवी यांचे सुद्धा हिंदीतले हे पहिले पाऊल होते. यांच्यासोबतच आणखी एका दाक्षिणात्य व्यक्तीचे सुद्धा हिंदीतले हे पहिले पाऊल होते. ते होते गायक एस.पी. बालसुब्रमण्यम. (Revisiting the Evergreen Hindi Movie ‘Ek Duuje Ke Liye’ Completing 40 Years of its Release)
 
सांस्कृतिक, भाषिक, चाली-रीती, खान-पान यात पराकोटीचे अंतर असलेले सख्खे शेजारी पक्के वैरी असे पंजाबी आणि तामिळ कुटुंब गोव्यात राहात असते. सातत्याने या ना त्या कारणाने भांडत असलेल्या या दोन शेजाऱ्यांची पुढची पिढी वासू हा तामिळ भाषिक तर सपना ही हिंदी भाषिक. मग भाषेविना प्रेमाची सुरुवात कशी तर रात्रीच्या वेळी घरातील लाईट आळीपाळीने बंद-चालू करणे, घरातील धुण्याच्या कपड्यांच्या आवाजाने होकार कळवणे असे सर्व गमतीशीर मार्गाने चालू होते. गोव्याच्या समुद्राच्या, किनाऱ्यावरील दगडांच्या व रेतीच्या, उंच नारळांच्या साक्षीने हे प्रेम फुलते. 
 
“तुम हो बुद्धू मान लो, यू आर हैंडसम जान लो,

सब बातों को छोड़ के, आँखों को पहचान लो,

आँखों ने आँखों से वादे यही किए,
उसको क़सम लगे
जो बिछड़ के इक पल भी जिए,
हम बने, तुम बने, एक दूजे के लिए”
 
असे सपना म्हणत असली तरी ‘आई डोंट नो व्हॉट यू से?’ असे वासूचे उत्तर असते

 
मनातले अगतिक असे हे प्रेम सांगावे कसे आणि सांगावे कुठे याचे उत्तर या जोडप्याला बंद झालेल्या लिफ्ट मध्ये मिळते. 
“मेरे जीवन साथी प्यार किये जा’
जवानी दिवानी, खूबसूरत, जिद्दी पडोसन 
सत्यम शिवम सुंदरम”
म्हणत जवळपास ६५-६६ हिंदी सिनेमांची नावे घेत ही दोघे माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगतात.

अर्थातच घरच्यांचा याला कडाडून विरोध, मग ‘एक वर्ष एकमेकांपासून १००% वेगळे राहून दाखवा तरच हे प्रेम खरे आहे नाहीतर हे केवळ शारीरिक आकर्षण आहे’ या आरोपाला खोडून काढण्यासाठी दोघे वेगळे होतात. क्षणभर वेगळे राहण्याची तयारी नसलेले हे जोडपे वर्षभराने परत भेटून लग्न करू या आशेने वेगळे होते. वासू हैद्राबादला जातो तर सपना गोव्यातच थांबते. विरहाने व्याकुळ सपना वासूच्या आठवणीत गोव्यातील त्या प्रत्येक  जागेला भेट देते जिथे या दोघांनी भेटून कधीही वेगळे न होण्याच्या शपथा घेतलेल्या असतात. 
“जिस में जवान हो कर, बदनाम हम हुए

उस शहर, उस गली, उस घर को सलाम
जिसने हमें मिलाये, जिसने जुदा किया
उस वक़्त, उस घड़ी, उस गज़र को सलाम
प्यार तेरी पहली नज़र को सलाम   … “

म्हणत वासू-सपना आपले एक वर्ष पूर्ण करीत असतात. हैदराबादेत वासू संध्या नामक एका तरुण विधवेकडून नृत्य व हिंदी भाषा शिकतो. संध्याचे मनोमन वासुवर प्रेम जडते खरे पण वासू मात्र सपनाच्या भेटीच्या प्रतीक्षेत व्याकुळ असतो .. गात असतो …
“हम तुम दोनों जब मिल जायेंगे
एक नया इतिहास बनायेंगे,
और अगर हम ना मिल पाए तो
तो भी एक नया इतिहास बनायेंगे”

 

अखेरीस दुर्दैवाने कथानक असे काही फिरते कि या गाण्यातल्या अखेरच्या दोन ओळीच खऱ्या ठरतात..इतिहास बनतो मात्र शेवट दुःखद होतो. 

‘एक दुजे के लिए’ चा प्राण म्हणजे त्याचे संगीत. आणि हा प्राण ज्यांनी चित्रपटात फुंकला ती जोडी म्हणजे दि ग्रेट लक्ष्मीकांत प्यारेलाल. जसे चित्रपटात वासू-सपना ‘एक दुजे के लिए’ जोडी तशी संगीतकारांची ही जोडी सुद्धा प्रत्यक्षात जणू एक दुजे के लिए बनलेली.  एस.पी. बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या आवाजाची जादू ८० च्या दशकातील तरुणाईला वेड लावून गेलीच पण आज चाळीस वर्षांनीही, यु-ट्यूब च्या जमान्यात या गाण्यांना करोडो रसिक आजही त्याच रसिकतेने बघत आहेत. कोट्यवधी व्यूहज आजही ही सर्व गाणी यु-ट्यूबवर खेचत आहेत.
ज्या ‘मारो चरित्र’ वरून ‘एक दुजे के लिए बनला’ त्याला  एम.एस. विश्वनाथन यांचे संगीत होते. त्यातील सर्वच गाणी एसपींनी गायली होती. मग  ‘एक दुजे के लिए’ करिता हिंदीतल्या कमल हसनसाठी पण हाच आवाज कायम ठेवण्याचा निर्णय झाला. परंतु ‘एक मद्रासी गायक हिंदी भाषेतील गीतांना कितपत न्याय देऊ शकेल?’ हि शंका ‘एक दुजे के लिए’ चे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना होती त्यामुळे त्यांचा सुरुवातीला एसपींच्या आवाजाला विरोध होता. यावर दिग्दर्शक बालचंदर यांचे असे म्हणणे पडले कि ‘कथेचा नायक दाक्षिणात्य आहे जो चित्रपटात व्यवस्थित हिंदी बोलू शकत नाही. त्यामुळे एसपी हिंदी गातांना कमी जरी पडले तरी ते पात्राला अनुसरून ठरेल’. त्यानंतर एसपींच्या नावावर शिक्कामोर्तब झाले व अशा रीतीने हिंदी सिनेमाला एक महान गायक मिळाला व एसपींना राष्ट्रीय पुरस्कार. म्हणजे जिथे एसपी हिंदीत व्यवस्थित गाऊ शकतील का हि शंका होती तिथे एसपींनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ‘तेरे मेरे बीच में’, ‘हम तुम दोनो जब मिल जायेंगे’, ‘मेरे जीवन साथी’, ‘हम बने तुम बने एक दुजे के लिए’ या सर्वच गाण्यात एसपींनी लता दीदींसोबत अगदी जीव ओतला होता. खासकरून ‘मेरे जीवन साथी’ हे गाणे तर धम्माल झाले होते. ‘तेरे मेरे बीच में’ साठी एसपींना फिल्मफेअर नामांकनाही मिळाले होते. सिनेमाच्या गीत-मुद्रणाच्या पहिल्याच दिवशी लता दीदींसोबत गायचे म्हणून एसपी जरा तणावात होते त्यातच त्यांच्या हातून लता दीदींच्या साडीवर चहा सांडला. लता दीदी तेंव्हा त्यांना म्हणाल्या ‘टेन्शन घेऊ नका, हा शुभसंकेत आहे, सर्व काही छान होईल.’ झालेही तसेच. 

 
राज कपूर सहीत कित्येक जणांनी बालचंदर यांना चित्रपटाचा दुःखद शेवट बदला असा सल्ला दिला होता परंतु बालचंदर यांनी कोणाचेच ऐकले नाही. हा शेवटच या चित्रपटाला अजरामर करेल हा त्यांचा विश्वास अखेर खरा ठरला. चित्रपट बघून कित्येक जोडप्यांनी निवडलेल्या आत्महत्येच्या पर्यायामुळे चित्रपटावर टीकाही खूप झाली. बालचंदर यांनी यानंतर कमल हसन यांना घेऊन ‘एक नई पहेली’ व ‘जरासी जिंदगी’ या दोन आशयघन चित्रपटांचे दिग्दर्शन केले परंतु त्या चित्रपटांना ‘एक दुजे’ ची सर आली नाही. ‘एक दुजे’ नंतर आलेला कमल आणि रती जोडीचा ‘देखा प्यार तुम्हारा’ सिनेमा सुद्धा अयशस्वी ठरला. त्याकाळात अमिताभ बच्चन समोर आपला चित्रपट आणण्याची हिम्मत कुठला निर्माता दाखवत नसे. मार्च महिन्यात आलेले, अमिताभचे ‘नसीब’ नावाचे वादळ तेंव्हा बॉक्स ऑफिसवर जोरात घोंघावत होते. सिंगल स्क्रीनच्या जमान्यात अमिताभचा सिनेमा एकावेळी अनेक सिनेमागृहात प्रदर्शित व्हायचा. ‘नसीब’ सोबत मनोज कुमार, दिलीप कुमार यांचा ‘क्रान्ती’ सुद्धा अनेक चित्रपटगृहात यशस्वी क्रांती करीत होता. असे असूनही निर्माता एल.व्ही. प्रसाद यांनी ५ जून १९८१ ला ‘एक दुजे के लिए’ प्रदर्शित करण्याची जोखीम उचलली. प्रदर्शनापूर्वीच ‘एक दुजे’ ची गाणी गाजली होती. त्याचा परिणाम असा झाला कि तरुणाईने पहिल्याच आठवड्यात सिनेमा डोक्यावर घेतला. नंतर फॅमिली व त्यातही खासकरून महिलावर्गाने प्रचंड गर्दी केली. राज कपूर यांच्या ‘बॉबी’ नंतर एखाद्या संगीतमय प्रेमकहाणीला असा प्रतिसाद हिंदी सिनेमाने कधीही पहिला नव्हता. ‘एक और इतिहास’ असे नाव आधी या चित्रपटाचे ठरले होते जे बदलून ‘एक दुजे के लिए’ झाले खरे पण सिनेमाने ‘एक और इतिहास’ रचून दाखविलाच. बेस्ट फिल्म, डायरेक्टर, ऍक्टर, ऐक्ट्रेस असे एकूण १३ फिल्मफेअर नामांकन एक दुजे के लिए ला मिळाले होते ज्यात विजेते ठरले के बालचंदर (पटकथा), आनंद बक्षी ( तेरे मेरे बीच में) व एन.आर. किटू (संकलन) हे तिघे. 
Director K. Balachander
Director K. Balachander
 
सिनेमात एक दृश्य आहे, जिथे सपनाची खाष्ट आई सपना आणि तिच्या वडिलांसमोर समोर वासूचा फोटो जाळते. ते जाळतांना तिची आई सपना ला म्हणते, ‘तुम्हारे डैडी ने मुझसे शर्त लगाई थी की ये फोटो जल नहीं सकती, मैं जलाकर दिखा रही हूँ. आखिर वही मिसाल हुई, मैं ही जीत गई’ आपल्या प्रियकराचा जळता फोटो बघून सपनाच्या डोळ्यातून अश्रू येतात. सपना आपल्या जिभेने त्या अश्रूंचीही चव घेते. तेंव्हाच घरातील मोलकरीण सपना च्या वडिलांसाठी चहा आणते. सपना काही एक न बोलता सरळ तो चहाचा कप घेते व वासूच्या जळालेल्या फोटोची राख त्या चहात मिसळते, चमच्याने एकत्र करून तो गरम चहा एका घोटात पिऊन घेते व आत निघून जाते. हे दृश्य बघून सपना चे वडील तिच्या आईला विचारतात, ‘अब कौन जीता?’  सिनेमागृहात यावेळी टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा प्रचंड पाऊस पडतो. सिनेमातील असे अनेक दृश्य आजही या कलाकृतीला चाळीस वर्षांनंतरही जिवंत ठेऊन आहेत, पुढेही कायम जिवंत ठेवतील. 
“उल्फ़त के दुश्मनों ने कोशिश हज़ार की
फिर भी नहिं झुकी जो, उस नज़र को सलाम
प्यार तेरी पहली नज़र को सलाम   …” 

Ajinkya Ujalambkar
+ posts

Leave a comment