-© विवेक पुणतांबेकर

‘एक दिन बिक जायेगा माटी के मोल जग मे रह जायेंगे प्यारे तेरे बोल …..’ ‘धरम करम’ सिनेमातले गाणे रेडिओवर लागले होते. ही सुरेख रचना लिहीणारे गीतकार मजरुह सुलतानपुरी (Majrooh Sultanpuri) यांचा आज स्मृतिदिन. आज त्यांच्या काही आठवणी सांगायचा हा अल्पसा प्रयत्न.

सिनेमाची कला चाळिसच्या दशकात बहरायला लागली. अनेक नवनवे संगीतकार कलाकार, गीतकार, दिग्दर्शक यांचा प्रवेश सिनेविश्वात झाला. यातलेच एक असरार ऊल हसन खान ज्यांना आपण मजरुह सुलतानपुरी नावाने ओळखतो.  उत्तर प्रदेशातल्या सुलतानपूर गावात १ /१०/१९१९ ला त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल पोलिस अधिकारी होते. घरात मात्र कर्मठ वातावरण असल्याने असरार ना पारंपारिक उर्दू शिक्षण घ्यावे लागले. यातूनच अरेबिक आणि उर्दू भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. शालेय शिक्षणानंतर त्यांनी लखनौ च्या युनानी औषध महाविद्यालयात प्रवेश घेतला. परिक्षा उत्तीर्ण करुन ते हकिम झाले. गझल आणि शायरीचा नाद लहानपणापासून होताच. मजरुह या टोपण नावाने ते शायरी करत. एका मुशायर्‍यात त्यांची गझल खूप लोकप्रिय झाली. यानंतर हकिम म्हणून दवाखाना थाटण्यापेक्षा शेरोशायरी आणि गझल यांच्या विश्वात ते रमून गेले. जिगर मोरादाबादी या प्रसिध्द शायरांचे ते शागिर्द बनले. उत्तमोत्तम शायरी ते लिहू लागले. १९४५ साली मुंबईत एका मुशायर्‍यात त्यांची शायरी ऐकून भारावलेले निर्माते दिग्दर्शक ए.आर. कारदार नी सिनेमात यायचा प्रस्ताव दिला. आधी मजरुह तयार नव्हते. पण जिगर मोरादाबादींनी त्यांना समजावले. कारदार त्यांना घेऊन नौशाद यांच्याकडे गेले. या भेटीतून त्यांना पहिला सिनेमा मिळाला ‘शाहजहान’. मजरुह नी लिहीलेली ‘शाहजहान’ ची गाणी खूपच लोकप्रिय झाली. त्यांनी लिहिलेले आणि कुंदनलाल सैगल यांनी गायलेले ‘जब दिल ही टूट गया’ सैगल यांच्या अंत्ययात्रेत वाजवले गेले.

नाटक, डोली, अंजुमान , हिम्मत अश्या सिनेमात मजरुह नी गाणी लिहिली पण खर्‍या अर्थाने ते प्रसिध्द झाले ‘अंदाज’ सिनेमाच्या गाण्यांनी. आजही ‘अंदाज’ ची गाणी लागली की रसिक हरवून जातात. या नंतर ‘शहिद’ आणि ‘आरझू’ ची मजरुह यांनी लिहीलेली गाणी पण खूप लोकप्रिय झाली. १९४९ साल मात्र त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले. मजरुह साम्यवादाकडे झुकलेले होते. सरकारने साम्यवादी लिखाणावर बंदी घातली होती. त्यांनी लिहिलेल्या सरकार विरोधी कवितेमुळे त्यांना अटक झाली. माफी मागायला नकार दिल्यामुळे दोन वर्षाचा तुरुंगवास नशिबात आला. याच कालखंडात बलराज सहानी यांना पण दोन वर्षाची शिक्षा झाली होती. या खडतर काळात घरच्यांचे खूप हाल झाले. राज कपूरना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी दोन हजार रुपये मजरुह यांच्या घरी पोहोचवले. तुरुंगातून सुटल्यावर मजरुह राज कपूरना भेटले. राज कपूरनी पैसे परत घ्यायला नकार दिला. एखादे गीत लिहून द्यायला सांगितले. हे गीत होते ‘एक दिन बिक जायेगा’. ‘धरम करम’ मध्ये हे गीत वापरले गेले. गुरु दत्त यांच्या ‘बाझ’ सिनेमाची गाणी मजरुह नी लिहीली. ती खूप गाजली. यांनतर ‘आर-पार’ ची गाणी त्यांनी लिहीली. ‘आर-पार’ चा नायक कल्लू बंबईय्या हिंदीत बोलतो. त्याला अनुसरुन वेगळ्या पध्दतीची गाणी मजरुह नी लिहीली.

यानंतर Mr.and Mrs 55 ची मजरुह यांची गाणी अविस्मरणीय होती. मजरुह नी नौशाद, अनिल विश्वास, मदन मोहन, रोशन, सलिल चौधरी, चित्रगुप्त, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल अशा नामवंत संगीतकारांबरोबर काम केले. पण एस.डी. आणि आर.डी. बर्मन या पितापुत्रांबरोबर लिहीलेली गाणी विलक्षण सुंदर होती. एस.डी. बर्मन यांच्या बरोबर पेईंग गेस्ट, नौ दो ग्यारह, काला पानी,  सोलवा साल, सुजाता, बंबईका बाबू, जुवेल थीफ, अभिमान मधली गाणी फार लोकप्रिय झाली. छेडछाड असलेली गाणी लिहीण्याचा पहिला मान मजरुह यांचा. आधी बर्मनदांना ही छेडछाड गाणी फारशी पसंत नव्हती पण मजरुह नी समजावल्यावर बर्मनदांनी आपली चूक कबूल केली. हलकी फुलकी गाणी लिहिणार्‍या मजरुह नी चांद फिर निकला ( पेईंग गेस्ट), हम बेखुदी मे तुम को पुकारे (काला पानी), साथी ना कोई मंझिल (बंबई का बाबू) अशी गंभीर गाणी पण समर्थपणे लिहीली.

आर.डी. बर्मन आणि मजरुह जोडीने पुढचा काळ गाजवला. मजरुह यांच्या आग्रहामुळेच आर.डी.ना ‘तिसरी मंझिल’ सिनेमा मिळाला. बहारो के सपने, प्यार का मौसम, कारवां, यादों की बारात, हम किसीसे कम नही, जमाने को दिखाना है या नासिर हुसैन यांच्या सिनेमात सुरेख गाणी लिहीली नासिर हुसैन चा मुलगा मन्सूर खान याच्या कयामत से कयामत आणि जो जीता वोही सिकंदर साठी पण मजरुह नी गीते लिहीली.नवोदित संगीतकारांबरोबर पण मजरुह गाणी लिहीत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सुरुवातीच्या काळात मजरुह नी गाणी लिहीली होती. मजरुह ना एकमेव फिल्मफेअर अवाॅर्ड मिळाले ते ‘दोस्ती’ सिनेमासाठी लिहिलेल्या ‘चाहूंगा मै तुझे’ गाण्यासाठी.

मजरुह कुटुंबवत्सल होते. आपण सिनेमासाठी गाणी लिहीतो पण ती ऐकल्यावर पत्नीची काय प्रतिक्रिया असेल याची त्यांना चिंता वाटायची. ‘दिल्लीका ठग’ मधले त्यांनी लिहीलेले ‘सीएटी कॅट’ गाणे रेकाॅर्ड झाल्यावर सगळ्यांनी अभिनंदन केले पण मजरुह मात्र शरमले होते. त्यांनी लिहिलेल्या गाण्याच्या रेकाॅर्डिंगला ते हजर असायचे. गायकाला उत्तेजन द्यायचे. कारवां च्या ‘पिया तू अब तू आजा’ च्या रेकाॅर्डिंग च्या वेळी मात्र ते बाहेर पडले. आशाताईंनी कारण विचारले तेव्हा ते म्हणाले मी हे असले गाणे लिहीले घरच्यांनी ऐकले तर काय म्हणतील??? मंगेशकर कुटुंबियावरील स्नेहाने त्यांच्या मराठी गाण्याच्या रेकाॅर्डिंग ला ते आवर्जून हजर असत. शिवकल्याण राजा अल्बम च्या रेकाॅर्डिंग ला मजरुह सुलतानपुरी हजर असल्याची आठवण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितली होती. दादासाहेब फाळके पुरस्कार लाभलेले मजरुह हे एकमेव गीतकार. भारत सरकार ने त्यांच्यावर खास डाक तिकीट काढले होते. अनेक सुंदर गीते, गझले लिहिणारे मजरुह फुफ्फुसाच्या विकाराने आजारी होते. २४ मे २००० ला न्युमोनियाने त्यांचे मुंबईत निधन झाले. हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळातल्या गीतकारांची पिढी संपली.

 

  • जादू ९० च्या दशकाची... साल १९९०
  • Attack | Official Trailer
  • जन्मदिन विशेष-सी रामचंद्र-अण्णांचा धमाका!
  • अनपॉज्ड
  • स्मृतिदिन विशेष .. सिनेसृष्टीतील सुवर्णपर्ण पद्मश्री श्रीदेवी...
Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment