-अशोक उजळंबकर

हिंदी चित्रपटसृष्टी निर्मिती व दिग्दर्शन या क्षेत्रात भट्ट कुटुंबाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. चित्रपट बोलू लागल्यापासून विजय भट्ट (Director Vijay Bhatt)या क्षेत्रात आहेत. 1935 च्या सुमारास मुंबईत आल्यानंतर त्यांनी अनेक निर्मात्यांकडे चित्रपटाच्या प्रत्येक विभागाचे प्रमुख म्हणून उमेदवारी केली. व्यवस्थापक, सहायक दिग्दर्शक, संकलक इत्यादी सर्व बाबींकडे त्यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन त्या आत्मसात करून घेतल्या होत्या. दिग्दर्शक म्हणून आपल्याला संधी मिळावी या शोधात विजय भट्ट होते. (Remembering Director Vijay Bhatt)

1940 च्या सुमारास सामाजिक आणि धार्मिक चित्रपटांची चलती सुरू झाली होती. चित्रपटाची आवड सर्वत्र निर्माण झाली होती व सामाजिक समस्यांची उकल करणारे चित्रपट निघू लागले होते. विवाहपूर्व संबंध असावेत किंवा नाही, जर असले तर यामध्ये बंधन असावे, ते कसे, याची चर्चा चित्रपटातून होत होती. त्या काळचा आघाडीचा नायक जयराज याला घेऊन विजय भट्ट यांनी ‘एक ही भूल’ हा चित्रपट सेटवर नेला. खरं तर दिग्दर्शनाची त्यांनी मिळालेली ही प्रथम संधी होती व एवढा अवघड विषय त्यांनी घ्यायला नको होता, तरीदेखील त्यांनी याच विषयाची निवड केली. जयराजसोबत मेहताब ही टॉपवरची नायिका त्यांनी घेतली होती. ‘एक ही भूल’ बरा चालला. त्याचबरोबर त्यांनी ‘नरसी भगत’ हा धार्मिक चित्रपट दिग्दर्शित केला. या दोन्ही चित्रपटांना शंकरराव व्यास यांचे संगीत होते. ‘नरसी भगत’ची नायिका होती दुर्गा खोटे. नरसी भगतपासून जणू काही पौराणिक चित्रपटांची रांगच सुरू झाली. प्रेम अदीब, शोभना समर्थ यांना घेऊन त्यांनी ‘भरत मिलाप’ बनविला, तर हीच जोडी पुढे ‘रामराज्य’ मध्ये कायम होती.

Ek Hi Bhool (1940 film) Poster

 सामाजिक, पौराणिक कथानकानंतर स्वारी ऐतिहासिक विषयांकडे वळली व ‘विक्रमादित्य’ याच नावाने त्यांनी चित्रपट तयार केला. विक्रमादित्याच्या न्यायदानाच्या कथा खूप प्रसिद्ध होत्या व या विषयावर कोणी चित्रपट बनविला नव्हता. प्रेम अदीब या नायकास त्यांनी यात संधी दिली होती; परंतु प्रमुख भूमिका मात्र पृथ्वीराज कपूर यांना दिली होती. रत्नमाला-पृथ्वीराज ही जोडी ‘विक्रमादित्य’मध्ये चांगलीच गाजली. ‘विक्रमादित्य’ या चित्रपटास उत्तर भारतात त्याकाळी बरे यश मिळाले. पृथ्वीराज कपूर यांनी प्रमुख भूमिका खूपच जोरदार सादर केली होती. त्यांच्या या भूमिकेबद्दल त्यांना त्या काळी पारितोषिक देण्यात आले होते. पहिल्या चित्रपटापासून त्यांनी शंकरराव व्यास यांच्याकडेच संगिताची जबाबदारी सोपवली होती. सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारा ‘समाज को बदल डालो’ त्यांनी 1947 मध्ये तयार केला. आता मात्र संगिताची जबाबदारी खेमचंद प्रकाश यांना देण्यात आली होती. खेमचंद प्रकाश यांची गाणी बरी गाजली. प्रमुख भूमिकेकरिता अरुण-मृदुला यांना घेतले होते, तर याकूबचे काम सर्वांना आवडले होते.

शोभना समर्थ व प्रेम अदीब ही जोडी त्यांनी ‘रामराज्य’नंतर ‘रामबाण’ मध्ये परत चमकवली होती. रामाच्या चित्रपटाचे सर्व ‘गुत्तेच’ त्यांनी या जोडीकडे सोपविले होते. 1948 नंतर मात्र त्यांनी एकदम चार वर्षांनी म्हणजेच 1952 मध्ये ‘बैजू बावरा’ या चित्रपटाची निर्मिती केली. ‘बैजू बावरा’ संगीत क्षेत्रातील अवघड निर्मिती होती; परंतु बराच काळ विचार केल्यानंतर विजय भट्ट यांनी हा चित्रपट तयार करण्याचे ठरविले. ‘एक ही भूल’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटात बालकलाकार म्हणून त्यांनी मीनाकुमारीला संधी दिली होती. आता ‘बैजू बावरा’ची नायिका म्हणून त्यांनी तिचीच निवड केली. संगीतप्रधान चित्रपट असल्यामुळे नौशाद यांच्याकडे संगिताची जबाबदारी त्यांनी सोपवली होती. नायक होता भारतभूषण. खरं तर भारतभूषणमध्ये अभिनयगुण होते; परंतु त्याला सहसा कोणी संधी देत नसे. ‘बैजू बावरा’मधील बैजूच्या महत्त्वपूर्ण भूमिकेकरिता त्यांनी भारतभूषण यांची निवड केली.

1952 साली पडद्यावर आलेला ‘बैजू बावरा’ सुपरहिट ठरला व भारतभूषण एकदम टॉपच्या नायकांमध्ये गणला जाऊ लागला. या चित्रपटाला नौशाद यांनी दिलेले संगीत देशभर गाजले. देशाच्या कानाकोपऱ्यात भारत भूषणचे नाव जाऊन पोहोचले. याच चित्रपटात तानसेनची भूमिका सुरेंद्रनाथ या कलावंताने उत्कृष्ट सादर केली होती. ‘बैजू बावरा’ नंतर 8 वर्षांनी आलेल्या ‘मुगल ए आजम’मध्येदेखील सुरेंद्रनाथ या कलावंतानेच तानसेन सादर केला होता; परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, दोन्ही चित्रपटांत तानसेनची भूमिका करणाऱ्या सुरेंद्रनाथला मात्र ‘तानसेन’ या चित्रपटात ही भूमिका मिळाली नाही. त्या चित्रपटाकरिता भारत भूषणची निवड झाली होती. ‘बैजू बावरा’च्या निर्मितीच्या वेळी प्रकाश पिक्चर्स ही विजय भट्ट व शंकर भट्ट यांची कंपनी बुडायला आली होती. धार्मिक, सामाजिक चित्रपटांनी त्यांचे खूप नुकसान झाले होते. कंपनी बंद करावी लागते की काय, असे वाटत होते. हे दोघे नौशाद यांना संगीत-दिग्दर्शन करण्याची विनंती करण्यास गेले. मीना कुमारी व भारत भूषण यांच्या अगोदर नर्गिस व दिलीप कुमार यांच्या नावाचा विचार झाला होता; परंतु या दोघांचे ‘दर’ त्यावेळी आकाशाला जाऊन भिडले होते. कलावंतांना देण्याइतका पैसा विजय भट्ट यांच्याकडे नव्हता. भारत भूषण व मीना कुमारी यांच्या करिअरची नुकतीच कोठे सुरुवात झाली होती. त्या दोघांना या चित्रपटाकरिता करारबद्ध करण्यात आले. राधाकिशन याने घसीट खाँची विनोदी भूमिका व्यवस्थित पार पाडली, तर सम्राट अकबराची भूमिका बिपिन गुप्त यांनी सांभाळली होती. संगीत हाच ‘बैजू बावरा’ या चित्रपटाचा स्थायीभाव असल्याने लता मंगेशकर व महंमद रफी यांनी गायिलेली गाणीदेखील शास्त्रीय ढंगावरच केलेली होती. त्या गाण्यात मुख्यत्वे भैरवी, दरबारी, कानडा, जोगिया, तोडी अशा रागिण्यांचा उपयोग केला होता. मालकंस रागात स्वरबद्ध केलेलं महंमद रफी यांचं, ‘मन तडपत हरि दर्शन को आज’ हे भजन चित्रपटसंगीतातील एक उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. त्यावेळी उत्कृष्ट संगीतकार म्हणून नौशाद यांची फिल्मफेअर पारितोषिकाकरिता निवड करण्यात आली होती.

1) ‘झुले में पवन के आयी बहार’ लता – रफी, 2) ‘तू गंगा की मौज, मै जमना का धारा’ लता – रफी, 3) ‘दूर कोई गाये, धुन ये सुनाये’ शमशाद-लता, रफी 4) ‘बचपन की मुहब्बत को’ लता मंगेशकर, 5) ‘मोहे भूल गये सावरियाँ’ लता मंगेशकर 6) ‘ओ दुनिया के रखवाले’ महंमद रफी, 7) ‘आज गावत मन मेरा झुम के’ डी. व्ही. पलुस्कर व उस्ताद अमीरखाँ ही गाणी तुफान गाजली. ‘बैजू बावरा’ या चित्रपटाने इतिहास घडविला. ‘बैजू बावरा’ नंतर मात्र त्यांनी चैतन्य महाप्रभू व रामायण हे दोन धार्मिक चित्रपट दिले; परंतु त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. प्रदीप कुमार वैजयंतीमाला या जोडीला घेऊन त्यांनी ‘पटराणी’ बनविला; परंतु त्यालाही यश आले नाही. ‘पटराणी’करिता त्यांनी त्यावेळचे आघाडीचे संगीतकार शंकर-जयकिशन यांची निवड केली होती. ‘बैजू बावरा’ या म्युझिकल हिटनंतर त्यांनी ‘गुंज उठी शहनाई’ हा चित्रपट दिला. संगीतकार होते – वसंत देसाई. पुन्हा एकवार शास्त्रीय संगीताची बहार यात पाहायला मिळाली होती. राजेंद्र कुमार, अमिता, अनिता गुहा यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. ‘गुंज उठी शहनाई’चे कथानक चांगले होते व गाणी मुख्यतः गाजली होती 1) ‘दिल का खिलौना हाये टूट गया’, 2) ‘कह दो कोई ना करे यहाँ प्यार’, 3) ‘जीवन मे पिया तेरा साथ रहे’, 4) ‘तेरी शहनाई बोले, सुन के दिल मेरा डोले’ 5) तेरे सूर और मेरे गीत ही गाणी कमालीची लोकप्रिय झाली. राजेंद्र कुमारदेखील ‘गुंज उठी शहनाई’ मुळे थोडा फार्मात आला. त्यानंतरचा ‘अंगुलीमाल’ मात्र साफ आपटला. ‘बापूने कहा था’ हा देशभक्तीपर चित्रपट होता, त्यामुळे त्याचे यश मर्यादित स्वरूपात होते.

      मनोजकुमार 1956 साली येथे आला; परंतु त्यांच्या कारकीर्दीला ब्रेक देणारा चित्रपट त्याला मिळत नव्हता. विजय भट्ट यांनी त्यास आपल्या ‘हरियाली और रास्ता’ मध्ये घेतले. ‘पटराणी’चेच संगीतकार शंकर – जयकिशन यांना त्यांनी परत संधी दिली. ‘बैजू बावरा’, ‘गूंज उठी शहनाई’नंतर ‘हरियाली और रास्ता’ची गाणी गाजली. ‘हरियाली और रास्ता’मध्ये एकंदर नऊ गाणी होती. महेंद्रकपूरच्या सोलो आवाजातील ‘खो गया है मेरा प्यार’ आणि मुकेशचे सोलो ’तेरी याद दिल से भुलाने चला हूँ’, खास गाजले 1) ‘इब्तिदा-ए-इष्क मे हम सारी रात जागे’ मुकेश-लता, 2) ‘बोल मेरी तकदीर मे क्या है’ – मुकेश-लता, 3) ‘लाखो तारे आसमान मे एक मगर ढुंढे न मिला’ मुकेश-लता ही द्वंद्वगीते लोकप्रिय ठरली होती.

‘हरियाली और रास्ता’ नंतर परत एकवार मनोज कुमार-माला सिन्हा जोडीला विजय भट्ट यांनी ‘हिमालय की गोद में’ मध्ये संधी दिली. चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणदणीत यशस्वी ठरला. या यशात कल्याणजी आनंदजी यांच्या सुपरहिट संगीताचा वाटा मोठा होता. ‘हिमालय की गोद में’ ला फिल्मफेअर पुरस्कार समारंभात एकूण सहा नामांकनं मिळाली होती ज्यातील  उत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार या सिनेमाने पटकाविला. 

यानंतर आलेले विजय भट्ट यांचे दिग्दर्शक म्हणून अखेरचे तीन चित्रपट रामराज्य, बनफूल व हिरा और पत्थर मात्र अपयशी ठरले. पौराणिक, समस्याप्रधान, ऐतिहासिक, संगीत प्रधान चित्रपट विजय भट्ट यांनी दिले. कौटुंबिक व संगीतप्रधान चित्रपटांचे निर्माता – दिग्दर्शक म्हणून त्यांनी येथे आपली ओळख प्रस्थापित केली. ‘बैजू बावरा’मुळे विजय भट्ट हे नाव सर्वांच्या सदैव लक्षात राहील हे निश्‍चित.

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment