जन्मदिन विशेष ..किस्सा तलतच्या पहिल्या गाण्याचा

-धनंजय कुलकर्णी, पुणे

सिनेमाच्या सुवर्णयुगाचा महत्वाचा साक्षीदार होता तलत महमूद. तपन कुमार या नावाने तो कलकत्यात गात असे. ’तसवीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी’ ’सब दिन एक समान नही था’ या आणि अशा अनेक गैरफिल्मी गाणी व गजल यातून त्याने सुरूवातीला चांगलीच लोकप्रियता हासिल केली होती. मखमली स्वराच्या तलतच्या आवाजात एक नैसर्गिक कंप होता. त्याच्या पहिल्याच सिनेमाच्या गाण्याच्या वेळचा किस्सा मशहूर जरी असला तरी तो आजच्या पिढीकरीता सांगण आवश्यक आहे.

तलतच्या आवाजाची जादू ओळखून अनिल विश्वास यांनी त्याला मुंबईला बोलावले. त्याला पहिलाच प्ले बॅक द्यायचा होता तो दिलीपकुमार यांना! काही विघ्नसंतोषी लोक होते त्यांना तलतच्या या भाग्याचा हेवा वाटू लागला. त्यांनी तलतला ’तुझ्या आवाजात तर कंप आहे ..तुझा आवाज सिनेमासाठी योग्यच नाही’ असं सांगत त्याच्या आत्मविश्वासाला सुरूंग लावायचा प्रयत्न सुरू केला. बिचारा तलत यामुळे प्रचंड नर्व्हस झाला. पहिल्याच गाण्याच्या वेळी (’आरजू’ सिनेमा – १९५०) तो प्रचंड अपसेट होता. रिहर्सलच्या वेळी तो नैसर्गिकपणे गात नव्हता. अनिलदांना ते वारंवार खटकू लागलं. तलतला देखील आपण  आपल्या स्वत:च्या मूळ आवाजात गात नाही हे लक्षात येत होतं. अनिलदा चिडले ’ तलत ये तुम क्या गा रहे हो तुम्हारी आवाज को क्या हो गयाकहां गई तुम्हारी वो आवाज?’ तलतचा कंठ दाटून आला त्याने घडलेला किस्सा सांगितला.

अनिलदांनी त्यांना धीर दिला आणि तुझ्या आवाजातील कंप हिच तुझ्या स्वरातील मोठी गुणवत्ता आहे असे प्रशस्तीपत्र दिले आणि तलतला ’जाओ तुम उस तलत को लेके आओ’ असा आदेश दिला. ज्याला तलत न्यूनत्व समजत होता तेच त्याचे खरे अ‍ॅसेट होते. अनिलदांच्या बोलण्याने शंकेचे, न्यूनगंडाचे सारे सारे मळभ दूर झाले व मोठ्या आत्मविश्वासाने तो गावून गेला. त्याचे पहिले सिनेमातील गीत ज्याचे बोल होते ’ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल जहां कोई न हो..’ अनिलदांनी त्याला वेळीच सावरले व त्याच्या करीयरला आकार दिला. पुढे सलील चौधरीमदन मोहन, ओपी, सचिनदासी रामचंद्र सर्वांकडे तो पन्नासच्या दशकात गात राहिला. १९६३ सालच्या ‘जहांआरा’ या सिनेमा नंतर मात्र त्याच्या हितशत्रूंनी परत डोकं वर काढलं व त्याला सक्तीची निवृती घ्यायला भाग पाडलं. पुढची ३५ वर्षे तो मायानगरीत होता पण त्याच्या कडे कुणाचंच लक्ष नव्हतं.

आज २४ फेब्रुवारी. तलत महमूद यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने आदरांजली.

singer talat mahmood

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment