-अद्वैत अविनाश सोवळे 

गोष्ट आहे तीन चार वर्षांपूर्वीची. माझ्या आधीच्या कंपनीत मी बसने जात असे. सकाळी जातांना सगळे जण उत्साहात आणि गप्पा गोष्टी करण्यात दीड तासांचे अंतर पटकन पार होत असे. हेच अंतर संध्याकाळी परततांना जास्त वाटत असे. त्यातही ट्राफिक लागले तर विचारायलाच नको. सकाळचे ट्राफिक जरा तरी सुसह्य वाटते पण संध्याकाळचे जास्तच त्रासदायक जाणवते. तर हा सगळा क्षीण घालवण्यासाठी आम्ही बस मध्ये काहीना काही खेळ खेळत असू. त्यातच अंताक्षरी सगळ्यांचा आवडता खेळ. आमच्या बस मध्ये वयोवर्षे २१ ते ५१ असे सर्व वयोगटातील लोकं होती. अंताक्षरी खेळण्यात सगळ्यांचाच उत्साह असायचा. जेव्हा माझ्यावर पाळी यायची तेव्हा मी बहुतेक करून रफी, तलत, मुकेश, मन्ना डे, हेमंत कुमार, किशोर दा, लता, नूरजहान, आशा, सुमन ते अगदी अनुराधा पौडवाल, अलका याज्ञिक, कविता कृष्णमुर्ती ह्यांची गाणी गायली जायची म्हणजे ओठांवर तीच गाणी येत. मला इतर सहकारी म्हणायचे देखील कि तू किती जुनी गाणी गातोस त्यावर मी फक्त ‘ओल्ड इज गोल्ड’ असं म्हणायचो.

एक दिवस काय झालं एका मुलीने ‘म’ ह्या अक्षरावरून गाणं म्हंटल “मेरे पिया गये रंगून किया है वहा से टेलीफुन” दुसऱ्यांदा ‘म’ आल्यावर “मेरे सपनो कि रानी कब आयेगी तू” हे गाणं म्हंटल. ती मुलगी नुकतीच कॅम्पस प्लेसमेंट मधून आमच्या कंपनीत लागली होती म्हणजे तिच्यासाठी जुनी गाणी म्हणजे फार तर “मैने प्यार किया” किंवा मग “प्यार झुकता नही” किंवा मग फार तर “प्रेमरोग” किंवा “बेताब”. पण ओठावर सहज आले ते फारच जुनं गाणं.

एक असा किस्सा तर दुसरा किस्सा अगदीच वेगळा. त्याचं आमच्या बसमध्ये एक मुलगी जी स्वतः शास्त्रीय गाणं शिकत होती. तिने कुणीतरी तोडफोड करून गायिलेले “ये मेरा दीवानापन है” हे गाणं किती चांगल आहे असं म्हटलं. मी तिला सांगेपर्यंत तिला माहीतच नव्हतं कि हे ओरिजिनल मुकेश जी ने गायिले आहे ते ही अलौकिक. असो.

कुठेही अंताक्षरी खेळ पण त्यात म्हंटली जाणारी ऐंशी टक्के गाणी ही जुनीच असतात. आता जुनी म्हणजे कोणती. वयोगटाप्रमाणे जुने ह्या शब्द काळसापेक्ष होतो. सत्तरच्या दशकात जन्मलेल्यांसाठी जुनी गाणी वेगळी तरी ऐंशीच्या, नव्वदच्या दशकात जन्मेल्यांसाठी जुनी गाणी वेगळी. खरतरं तुम्ही कोणत्या ही दशकात जन्म घेतला तरी आपल्या कानावर कुठल्याना कुठल्या मार्गाने जुनी गाणी पडत असतात आणि त्यातील गोडवा आणि सहजता ह्यामुळे ती आपल्याला सहज लक्षात राहतात. त्यामुळेच अंताक्षरी सारख्या कार्यक्रमात जुनीच गाणी म्हंटली जातात.

१९४५ ते १९६५ हा काळ भारतीय चित्रपट संगीताचा खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ. संगीतकार, गीतकार, गायक, वादक, संगीतप्रकार सगळ्याच बाबतीत ते अवीट गोडीचं होतं. संगीतकार हे पंडित होते तर गीतकार हे कवी आणि शायर होते. मुरलेले वादक आणि अलौकिक गायकी असं सगळंच काही स्वर्गीय.

golden era of hindi film music

सुरेल संगीताची वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानीच जणू. गुलाम मोहम्मद, गुलाम हैदर, पंडित ज्ञानदत्त, हुस्नलाल भगतराम, खेमचंद प्रकाश, पंकज मलिक, सज्जाद, अनिल विश्वास असे एकाहून एक श्रेष्ठ  संगीतकार ज्यांनी शास्त्रीय-उपशास्त्रीय-लोकसंगीत यांचा अनोखा मिलाफ आणून हिंदी चित्रपट संगीताला आकार देण्यास सुरुवात केली. पुढे तिच परंपरा नौशाद, सी रामचंद्र, वसंत देसाई ह्यांनी चालू ठेवली. हे होत असतांनाच गीतांना रागाची शाल ओढून त्यावर मोठ्या वाद्यवृंदाची आधुनिक कलाकुसर करून रसिक श्रोत्यांसाठी सादर करणारे होते शंकर जयकिशन. आपल्या सुरेख चालींनी मोहून टाकणारे मदन मोहन जी होते.

थांबा अजून मेजवानी संपली नाही. सचिन देव बर्मन, हेमंत कुमार, सलील चौधरी ह्यांच्या गाण्याचा बंगाली गोडवा होता. सोबतीला जयदेवांचे राजस्थानी मांडा चे स्वर किंवा काश्मीरच्या सुंदर कॅनवास ला अजूनच साज चढविणारे ओ पी नय्यर ह्यांचे ताल प्रधान संगीत. एका वेगळ्याच बाजाच संगीत घेऊन चित्रगुप्त, रोशन, रवी,  खय्याम होते तर होतेच पण सुधीर फडके आणि एन दत्ता ह्यांच्या रचना ही कान तृप्त करून जात.

अश्या अवीट सुरावटी तितक्याच ताकदीच्या शब्दांसाठी होत्या. ते शब्द होते हिंदी उर्दू साहित्यातील दिग्गजांचे. कवी प्रदीप, शकील बदायुनी, हसरत जयपुरी, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, नीरज, इंदीवर, एस एच बिहारी, राजेन्द्र कृष्ण, राजा मेहंदी अली खान, प्रेम धवन असे कितीतरी. भाव भावनांचा कल्लोळ असो की भावांची उधळण असो ह्या सर्वांनी ती आपल्या लेखणीतून अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे.

गायक गायिकांच्या बद्दल काय लिहावे ? सैगल, नूरजहान, लता, रफी, मुकेश, आशा, गीता दत्त, मन्ना दा, शमशाद बाई ह्यांच्या स्वरांनी आसमंत हा स्वर्ग होऊन जाई. आजही यांच्या गीतांची, संगीताची आणि आवाजाची म्हणजेच एकंदर गाण्याची प्रसिद्धी टिकून आहे आणि म्हणूनच आजच्या जाहिरातीत ही आयेगा आनेवाला ही सत्तर वर्षापूर्वीची रचना ऐकू येते त्यात आश्चर्य ते काय !

इतर वेळी समजायला कठीण वाटणारे अहिर भैरव आणि शिवरंजनी जेव्हा पुछो ना कैसे मैने रैन बिताई आणि लागे ना मोरा जिया होऊन येतात तेव्हा सहज आपल्या भावनेत उतरतात आणि ओठांवर रुळतात.

जीवनाची क्षणभंगुरता असो वा ठहराव असो तो “मन रे तु काहे न धीर धरे”, “मैं पल दो पल का शायर हूं”, “यह दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है” ह्या शब्दात सांगणारा साहीर असो किंवा “ऐ मेरे वतन के लोगों” आणि “हम लाये ही तुफान से किश्ती” म्हणून देशासाठी डोळ्यात अश्रू आणणारे कवी प्रदीप असो. आता अशी गाणी कुठे आहेत ?

हा इतका मोठा खजिना आहे कि तुम्ही कुठलीतरी १०० गाणी ऐकली तर दुसरी १०० गाणी तुमची वाट पाहत असतात आणि हा झरा असाच वाहत राहतो.

हजारो गाणी आहेत. काय लिहावे आणि किती लिहावे ! ह्या लेखात मी मुद्दामूनच कुठल्याही गीतकार संगीतकार आणि गायक गायिकेच्या एकाही गाण्याचा उल्लेख केला नाही कारण तसे केले असते तर अमुक गाणं घेताना दुसऱ्या गाण्यासोबत अन्याय झाला असता. हो खरं आहे ते जर मैं क्या जानू क्या जादू है बद्दल बोललो तर जब दिल ही टूट गया सोबत अन्याय होइल. अँखियाँ मिलाके बद्दल बोललो तर “रिमझिम बरसे बादरवा सुटायला नको. ही यादी प्रचंड मोठी आहे. १९६५ नंतरही बराच काळ हिंदी चित्रपट गीतांचा सुवर्ण जरी नाही तरी रजत काळ होता पण त्याबद्दल आणि सुवर्णकाळातील गीतकार, संगीतकार, गायक आणि गाणी ह्याबद्दल पुन्हा कधी तरी विस्तारपूर्वक लिहीन.

त्या दिवशी अंताक्षरी मध्ये त्या मुलीने गायिलेल गाणं हे तिच्या जन्माच्या पन्नास वर्षांपूर्वीच होतं. अजूनही त्याची गोडी कायम आहे आणि म्हणून तिच गाणी रिमिक्स होऊन परत येतात फक्त त्यात असतं ते शरीर, त्या गाण्याचा आत्मा तर त्यातील स्वर, भाव आणि शब्द ह्यांच्याशी मिळून मोक्ष पावलेला असतो.

माझ्यासाठी जुनी गाणी म्हणजे सुवर्णकाळातील. कारण ओल्ड इज गोल्ड.

                                                                         

Advait Avinash Sowale
Advait Avinash Sowale
+ posts

Leave a comment