-विवेक पुणतांबेकर

 

‘बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है’….आज सकाळी हे गाणे रेडिओवर ऐकले आणि लक्ष्यात आले आज गीतकार हसरत (Hasrat Jaipuri) यांचा जन्मदिवस. योगायोग म्हणजे आजच त्यांचे ज्येष्ट पुत्र अख्तर यांचा पण वाढदिवस. मुलगा आणि वडिल यांचा वाढदिवस एकाच तारखेला येणे हा दुर्मिळ योगच. इक्बाल हुसेन यांचा जन्म जयपुरचा. सुखवस्तु कुटुंबात जन्मलेले. त्यांचे आजोबा फिदा हुसेन शायर होते. शायरीचा वारसा आजोबांकडून त्यांच्याकडे आला. इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेतल्यावर नंतर त्यांनी उर्दू आणि पर्शियन भाषेचा अभ्यास केला. वयाच्या विसाव्या वर्षी ते शायरी लिहायला लागले. ते रहात होते त्या गल्लीत राधा नावाची हिंदू मुलगी रहात होती. तिच्या प्रेमात इक्बाल पडले. तिच त्यांची स्फूर्ती देवता होती. या एकतर्फी प्रेमात हसरत हे टोपण नाव घेऊन त्यांची शायरी सुरु झाली. राधा ला लिहीलेले प्रेमपत्र १९६४ च्या ‘संगम’ सिनेमात वापरले गेले.

कामधंदा शोधायला मुंबईत आले. सगळ्यात पहिली नोकरी मिळाली बस कंडक्टर ची. त्यांचा बिल्ला नंबर होता १७२७. सात वर्षे नोकरी करत असताना कुठल्याही सुंदर मुलीकडून तिकीटाचे पैसे कधीच न घेतल्याची कबुली त्यांनी मुलाखतीत दिली. यानंतर ते आॅपेरा हाऊस च्या समोरच्या फुटपाथवर खेळणी विकत. म्युनिसिपालटीच्या माणसांनी त्यांची हातगाडी जप्त करुन नेली. अशा अवस्थेतही लिखाण सुरुच असे. इप्टा या संस्थेच्या कार्यक्रमात मजदूर की लाश ही कविता सादर करताना पृथ्वीराज कपूर (Prithviraj Kapoor) नी ऐकली. त्यांना कविता खूप आवडली. ते हसरत ना पृथ्वी थिएटर्स मध्ये घेऊन गेले. तिथेच राज कपूर (Raj Kapoor) यांच्याशी मैत्री झाली.

 

Raj Kapoor with Hasrat Jaipuri, Shnakar-Jaikishan and Shailendra
Raj Kapoor with Hasrat Jaipuri, Shnakar-Jaikishan and Shailendra

 

राज कपूर सिनेमा निर्मितीत उतरले. बरसात (Barsaat) सिनेमाच्या वेळी राज कपूरनी हसरत ना बोलावले. अट सांगितली तयार केलेल्या चालीवर गाणे लिहावे लागेल. हसरत तयार झाले. पहिलेच गाणे त्यांनी लिहीले ‘जिया बेकरार है’, यानंतर लिहिले ‘छोड गये बालम’. इथून त्यांचे आर.के. फिल्मस मध्ये स्थान पक्के झाले.

 

 

कालांतराने शैलेंद्र पण आर.के. फिल्मस मध्ये आले. हसरत शैलेंद्र शंकर जयकिशन या चौघांनी इतिहास रचला. आर.के. फिल्मस बरोबर करार झाला तेव्हा हसरत सुपर सिनेमात बुकींग क्लार्क होते. राज कपूरकडे शैलेंद्र, हसरत, शंकर शंकर जयकिशन हे पगारी नोकर होते यामुळे पोटापाण्याचा प्रश्र सुटला. राज कपूर नी उदारपणे बाहेरच्या सिनेमासाठी काम करायची परवानगी या सर्वांना दिली. शैलेंद्र आणि हसरत यांची मैत्री शेलेंद्रच्या मृत्युपर्यंत टिकली. दोघेही एकत्र काम करत. मिळणारे मानधन वाटून घेत. काही काळ व्ही. शांताराम यांच्यासाठी पण हसरत नी लिखाण केले. झनक झनक पायल बाजे, तुफान और दिया सिनेमाची गाणी लिहीली. ‘तुफान और दिया’ मध्ये डाॅक्टरच्या भुमिकेत हसरत पडद्यावर दिसले होते. शंकर जयकिशन यांच्या शिवाय ओ.पी. नय्यर, नौशाद, एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन सारख्या अनेक संगीतकारांकडे हसरत नी गीते लिहिली आहेत. त्यांच्या बहिणीचे लग्न बराच काळ जमत नव्हते. तिची ऊदास अवस्था घालविण्यासाठी त्यांनी लिहिले ‘सुनो छोटीसी गुडिया की लंबी कहानी’. हे गाणे खूप गाजले. नंतर त्यांच्या बहिणीचे लग्न संगीतकार सरदार मलिक बरोबर झाले.

 

 

अन्नू मलिक त्यांचा भाचा. वैयक्तिक जीवनात त्यांना व्यहवारकुशल पत्नी लाभली. तिने त्यांचा संसार जिद्दीने उभा केला. आपल्या तिन्ही मुलांना शिस्त लावून त्यांचे शिक्षण पुर्ण केले. हसरत ना सिनेमात मिळालेल्या पैश्यातुन जुहु ला प्लाॅट घेऊन त्यावर बंगला बांधला. त्याचा तळमजला बॅन्केला भाड्याने दिला. आलेल्या भाड्यातून आणखी एक मजला बांधला. आज हसरत ची दोन्ही मुलं तिथे रहातात. मुलगी लग्न करुन पाकिस्तानात गेली. हसरत एकदा रात्री उशिरा घरी आले. त्यांची पत्नी त्यांची वाट पाहून जेवणाच्या टेबलावर झोपली होती. हे पाहून हसरत भावूक झाले आणि त्यांनी लिहिले ‘गम उठाने के लिये मै तो जिये जाऊंगा’. यानंतर त्यांनी फिल्मी पार्ट्यांना जाणे बंद केले. मोठ्या मुलाचा जन्म झाल्यावर त्याचे डोळे पाहून त्यांना सुचले ‘तेरी प्यारी प्यारी सुरत को किसीकी नजर ना लगे चश्मेबद्दुर’.

 

 

त्यांच्या असंख्य गीतांनी आमचे लहानपण समृध्द केले. शैलेंद्र च्या अकाली मृत्युने काही काळ नैराश्यात गेले. राज कपूर दुरावल्यावर त्यांनी लिहिलेले ‘जाने कहां गये वो दिन’ गाणे ‘मेरा नाम जोकर’ मधले सगळ्यात अप्रतिम गाणे होते. ‘कल आज और कल’ नंतर त्यांचा आर.के. फिल्मस शी संबंध संपला. ‘राम तेरी गंगा मैली’ च्या वेळी राज कपूरनी त्यांच्याकडून लिहून घेतले ‘सुन साहिबा सुन प्यार की धून’. १९९९ ला हसरत गेले. आजही त्यांच्या गाण्यांची मोहीनी आपल्यावर कायम आहे.

 

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment