– अशोक उजळंबकर
चित्रपटाकडून दूरदर्शनकडे दाखल झालेले दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे बलदेव राज चोप्रा (B.R. Chopra). ‘महाभारत’ या मालिकेला खूप प्रसिद्धी मिळाली. बी आर चोप्रा यांनी ही निर्मिती अगदी मोठ्या प्रमाणावर केली होती. ‘महाभारत’ या मालिकेने बी आर चोप्रा यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्राप्ती करून दिली. यापेक्षा या मालिकेमुळे बी आर चोप्रा हे नाव भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले. चित्रपटसृष्टीशी १९४० पासून संबंधित असलेले चोप्रा अनेक वर्ष इतरांकडे सहाय्यक म्हणूनच वावरले. त्याकाळी संधी मिळणे खूपच कठीण होते. पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा राज, निर्माता म्हणून आर. के. हे बॅनर घेऊन दाखल झाला होता. राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद या त्रिकुटापैकी राज व देव आनंद यांनी अनुक्रमे ‘आर. के.’ व ‘नवकेतन’ या आपल्या बॅनर ची स्थापना करून चित्रपट निर्मिती सुरू केली होती.
फिल्मी दुनियेचे बी.आर यांना लहानपणापासूनच खूप आकर्षण राहिले होते. मुंबईत आल्यावर स्टुडिओमध्ये चकरा मारून त्यांनी अनेक मातब्बर दिग्दर्शकांकडे सहाय्यक म्हणून काम केले. आपण निर्माता व्हावे म्हणजे आपल्याला दिग्दर्शक म्हणून आपोआपच जबाबदारी मिळेल हा विचार त्यांच्या मनात येत होता. परंतु निर्माता होणं ही बाब तेवढी सोपी नव्हती. त्यावेळी ‘गोपाल पिक्चर्स’ या संस्थेत त्यांना काम मिळाले होते. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते व संस्थेचे श्री बालन यांचा चोप्रा यांच्यावर खूपच विश्वास बसला होता. त्यांनी ‘अफसाना’ या आपल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी बी.आर यांच्यावर सोपवली. अशोक कुमार, प्राण आणि जीवन यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या व त्या काळी आघाडीवर असलेले हुस्नलाल भगतराम यांनी ‘अफसाना’ ला संगीत दिले होते. ‘रेडीओ सिलोन’ वर रविवारी रात्री १० ते ११ दरम्यान जुन्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम लागत असे. त्या कार्यक्रमाचे नाव होते ‘हमेशा जवां गीत’ व या कार्यक्रमाच्या सुरुवातीला याच अफसाना मधील लताच्या आवाजातील गाणे वाजवले जात होते त्या गाण्याचे बोल होते “खुशियो के दिन मनाये जा, दिल के तराने गाये जा, तुझको जवानी की कसम, दिल की लगी बुझाये जा, दुनिया मेरी बसाये जा, आजा पिया आजा”, “अभी तो मै जवान हूँ “, गीतकार गाफील हारनालवी यांचे हे गीत खूप गाजले होते. आज देखील या गाण्याची गोडी तशीच कायम आहे व मनाच्या स्मृतीवर हे गाणे पूर्णपणे गोंदले गेले आहे. हुसनलाल भगतराम म्हणजे अवीट गोडीचे संगीतकार होते. त्यांच्या सर्वच चित्रपटात खुप गाणी असायची. लताच्या मुख्य गाण्याशिवाय १) वो पास भी रहकर पास नही, हम दूर भी रहकर दूर नही , २) आज कुछ ऐसी चोट लगी है टूट गया पैमाना दिल का ३) कहा है तू मेरे सपनो के राजा ही गाणी गाजली. दिग्दर्शक म्हणून बी.आर चोप्रा यांचा ‘अफसाना’ (Afsana) खूपच यशस्वी ठरला.
‘अफसाना’ नंतर मात्र बी.आर यांच्याकडे अनेकांचे लक्ष गेले. हिरा फिल्म्स च्या ‘शोले’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. ‘शोले’ मध्ये अशोक कुमार, बिना रॉय, जीवन, मनमोहन कृष्ण यांच्या प्रमुख भूमिका होत्या तर संगीत धनीराम/नरेश भट्टाचार्य यांनी सांभाळले होते. ‘अफसाना’ इतके यश ‘शोले’ या चित्रपटाला मिळाले नाही कारण कथानक खूपच ठिसूळ होते व संगीताची भट्टी जमली नव्हती. ‘शोले’ ची निर्मिती देखील खूपच लांबली होती. याच हिरा फिल्म्स च्या पुढील ‘चांदनी चौक’ या चित्रपटाची कामगिरी त्यांनीच पार पाडली. हळूवार प्रेम कथा असेच ‘चांदनी चौक’ चे वर्णन करावे लागेल. त्याकाळी थोडाफार आघाडीवर असलेला शेखर ‘चांदनी चौक’ चा नायक होता, तर नायिका होती मीना कुमारी. ‘शोले’च्या अपयशानंतर निर्मात्यांनी संगीताची जबाबदारी ‘रोशन’ यांच्यावर सोपवली होती. ‘हमे ऐ दिल कही ले चल बडा तेरा करम होगा’ या मुकेशच्या गीता व्यतिरिक्त ‘चांदनी चौक’ ची कोणतीही आठवण उरली नाही.
‘दिल की शिकायत नजर की शिकवे, एक जुबां और लाख बयाँ’ ही शैलेंद्रची रचना लताच्या आवाजात ‘चांदनी चौक’ मध्ये ऐकायला मिळाली. याशिवाय लताच्या आवाजातील ‘बहक चले मेरे नयनवा, हाय न जाने कैसे चली हवा’ हे गाणेदेखील खूप गाजले होते. ‘चांदनी चौक’ व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला होता. चित्रपट निर्मिती आपण सुरू करावी हे बी.आर यांचे स्वप्न होतं, परंतु पुरेसे आर्थिक पाठबळ नसल्यामुळे त्यांनी माघार घेतली होती. तीन चित्रपट दुसऱ्याकडे दिग्दर्शित केल्यावर पाच वर्षांनी त्यांनी ‘बी. आर. फिल्म्स’ चे बॅनर सुरू केले व ‘एकही रास्ता’ (Ek Hi Raasta) या चित्रपटाची घोषणा केली. ‘अफसाना’ व ‘शोले’चा नायक अशोक कुमार ‘एकही रास्ता’ मध्ये नायक होता. तर सुनील दत्त, मीना कुमारी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘एकही रास्ता’ मधील ‘चली गोरी पी से मिलन को चली, नयना बावरिया मन मे सावरिया’ हे हेमंत कुमार यांच्या आवाजातील गाणं खास गाजलं होतं. बी.आर यांच्या या पहिल्या निर्मितीला हेमंत कुमार यांनी संगीत दिलं होतं. ‘एकही रास्ता’ चे कथानक उत्कृष्ट जमून आले होते व बी. आर. चोप्रा यांचे दिग्दर्शन देखील उठावदार झाले होते.
Naya Daur Movie Poster
Naya Daur Movie Poster
स्वातंत्र्यानंतर भारतीय औद्योगिक क्षेत्रात बरीच क्रांती झाली होती. नवीन कारखान्यांमध्ये मशीनने सर्व जागा व्यापली होती व कामगार वर्गावर बेकारीची कुऱ्हाड कोसळू पाहत होती. बऱ्याच कारखानदारांनी आपल्या कारखान्यांमध्ये नवीन मशिनरी बसून कामगार कमी केले होते. या नव्या क्रांतीचा धागा पकडून बी. आर. चोप्रा यांनी ‘नया दौर’ (Naya Daur) ची निर्मिती केली. त्याकाळी तरुण दिलांची धडकन असलेल्या ‘दिलीप कुमार’ याला नायकाच्या भूमिकेत यांनी करारबद्ध केले तर मधुबाला बरोबर चार रिळांचे चित्रीकरण केल्यानंतर, ‘वैजयंतीमाला’ हिला नायिका म्हणून घेतले होते. मधुबाला चे वडील ‘दिलीप कुमार हा नायक नको’ असे म्हणत होते. बी.आर. चोप्रा यांनी दिलीप साहेबांना अगोदरच करारबद्ध केल्यामुळे ते नायक बदलायला तयार नव्हते. शेवटी मधुबाला ची जागा वैजयंतीमालाने घेतली व ‘नया दौर’ सुपर हिट ठरला. त्यावेळी आघाडीवर असलेले संगीतकार ओ पी नय्यर यांनी संगीत दिले होते. आशा, शमशाद, रफी यांच्या आवाजातील ‘नया दौर’ ची गाणी खूप गाजली. त्यापैकी ‘साथी हात बढाना साथी रे’, ‘आना है तो आ राह में कुछ’, ‘रेशमी सलवार कुर्ता जाली का’, ‘मांग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ ही गाणी तर अविस्मरणीय आहेतच शिवाय पंजाबी भांगडा असलेले ‘ये देश है वीर जवानो का अलबेलो का मस्तानो का’ हे रफी, बलवीर यांच्या आवाजातील गाणे आजही महाविद्यालयीन स्नेह संमेलनात, लग्नाच्या वऱ्हाडात पेश केले जाते. ‘नया दौर’ पासून बी.आर यांच्या कारकीर्दीला खरोखरच नवी दिशा मिळाली. आपण स्वतः निर्मिती संस्था स्थापन केल्यानंतर येणाऱ्या अडचणी तसेच दिग्दर्शन क्षेत्रातील स्वातंत्र्याचा त्यांना उलगडा झाला. ‘एकही रास्ता’ सारख्या धीरगंभीर चित्रपटानंतर आलेला ‘नया दौर’ म्युझिकल हिट ठरला. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘नया दौर’ रंगीत करून बी. आर. चोप्रा यांनी पुन्हा प्रदर्शित केला. जुन्या रसिकांनी त्याचे स्वागतच केले.
हेमंत कुमार, ओ पी नय्यर नंतर बी आर चोप्रा यांनी आपल्या ‘साधना’ (Sadhana) या स्त्री समस्येची उकल करणाऱ्या चित्रपटाच्या गाण्यांकरता एन. दत्ता यांना करारबद्ध केले. सुनील दत्त, वैजयंतीमाला यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. सुनील दत्त यापूर्वी त्यांच्या ‘एकही रास्ता’ मध्ये चमकला होताच. कोठीवर आलेल्या रसिकांसमोर गाणारी नायिका ‘कहो जी तुम क्या खरिदोगे, सुनो जी तुम क्या क्या खरिदोगे’ म्हणते. हे मुजरा नृत्य खूप गाजलं, तर लताच्या धीर गंभीर आवाजातील “औरत ने जनम दिया मर्दों को, मर्दो ने उसे बाजार दिया” ही साहिर लुधियानवी यांची रचना रसिकांना गंभीर वातावरणात घेऊन गेली. साहिर लुधियानवी यांची प्रत्येक रचना रसिकांच्या काळजाला स्पर्श करून जात होती. ‘साधना’ चित्रपट खुप गाजला व त्याला बरीच पारितोषिक देखील मिळाली. ‘साधना’ नंतर ‘धूल का फूल’ (Dhool Ka Phool) ही बी.आर फिल्मची निर्मिती होती. परंतु दिग्दर्शक म्हणून ‘यश चोप्रा’ समोर आले होते. ‘धूल का फूल’ हा म्युझिकल हिट ठरला. यश चोप्रा यांनी ‘कुमारी माता’ व ‘अनौरस संतती’ या नाजूक विषयाची हाताळणी अगदी सुरेख केली होती.
Kanoon Movie Poster
Kanoon Movie Poster
‘धूल का फूल’ नंतर आलेला ‘कानून’ (Kanoon) हा चित्रपट खास गाजला. ‘कानून’ मध्ये एकही गाणे नव्हते. राजेंद्र कुमार, अशोक कुमार, नंदा, मेहमूद, ओम प्रकाश, नाना पळशीकर यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. ‘कानून’ हा सस्पेन्स चित्रपट होता व चित्रपटाच्या रहस्याची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवण्यात बी. आर. चोप्रा कमालीचे यशस्वी ठरले होते. ‘खून करो और बचकर दिखाओ’ हा कोर्टातील वकिलांच्या खोलीतील संवाद आजही लक्षात राहतो. ‘धूल का फूल’ पासून यश चोप्रा बी.आर मध्ये दिग्दर्शक म्हणून दाखल झालेले होतेच. ‘कानून’ नंतर आलेल्या ‘धर्मपुत्र’ चे दिग्दर्शन त्यांनीच पार पाडले. लग्नानंतर आपल्या प्रियकराला विसरू न शकलेल्या एका विवाहित स्त्रीची गंभीर कथा त्यांनी ‘गुमराह’ (Gumraah) मध्ये मांडली होती. ‘गुमराह’ चा अर्थ ‘रस्ता हरवलेली’. अशोक कुमार चे लग्न निरुपा रॉय बरोबर झालेले असते. परंतु अचानक निरुपा रॉय मरण पावते. तिच्या धाकट्या बहिणी सोबत म्हणजेच माला सिन्हा सोबत अशोक कुमार चा दुसरा विवाह होतो. माला सिन्हा सुनील दत्त वर प्रेम असते. लग्नानंतर देखील माला सिन्हा, सुनील दत्त यांच्या भेटीगाठी होत असतात व याची खबर अशोक कुमारला असते. मालाच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिला ब्लॅकमेल करणारी ‘शशिकला’ अप्रतिम होती. ‘शशिकला’ हिला या भूमिकेबद्दल अनेक सन्मान मिळाले. ‘गुमराह’ ची गाणी रवी यांनी स्वरबद्ध केली होती व सर्वच्या सर्व सुपरहिट होती.
Gumraah Film Poster
Gumraah Film Poster
‘गुमराह’ नंतर आलेला ‘वक्त’ मल्टीस्टारर म्हणून गाजला. त्याचे यश चोप्रा यांनी दिग्दर्शन केले होते. ‘वक्त’ ची गाणी गाजली व कलावंत एकापेक्षा एक होते. ‘वक्त’ नंतर ‘हमराज’ ची मांडणी थोडीफार ‘गुमराह’ च्या धरतीवर केली होती. परंतु त्याला थोडा रहस्याचा टच होता. प्रेमाचा एक रहस्यमय वेगळा त्रिकोण ‘हमराज’ मध्ये पहायला मिळाला. नायिका ‘विम्मी’ चे आगमन खूप गाजले परंतु तिला ‘हमराज’ नंतर मिळालेले सर्व चित्रपट साफ कोसळले. ‘गुमराह’ पासून संगीतकार ‘रवी’ बी.आर मध्ये दाखल झाले होते. बी.आर यांचे ते आवडते संगीतकार होते. राज कुमार, सुनील दत्त, विम्मी यांच्या ‘हमराज’ मध्ये प्रमुख भूमिका होत्या. महेंद्र कपूर हा गायक देखील ‘धूल का फूल’ पासून बी.आर यांच्या चित्रपटात गात होता. ‘हमराज’ (Hamraaz) ची सगळी गाणी महेंद्र कपूर यांच्या आवाजात होती. दिग्दर्शन बी.आर यांचंच होतं.
‘हमराज’ नंतर आलेल्या ‘आदमी और इन्सान’ व ‘इत्तेफाक’ या दोन चित्रपटांना यश चोप्रा यांचे दिग्दर्शन होते. इत्तेफाक हा रहस्यमय चित्रपट म्हणून खूप गाजला. राजेश खन्ना, नंदा यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. इत्तेफाक पर्यंत बी.आरफिल्म हे बॅनर अगदी यशाच्या शिखरावर होते. त्यानंतर मात्र या बॅनरची घसरण सुरू झाली. ‘दास्तान’ व ‘धुंद’ हे दोन चित्रपट स्वतः बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेले होते. ‘दास्तान’ हा ‘अफसाना’ या त्यांच्या जुन्या चित्रपटाचा रिमेक होता. परंतु त्यावर बी.आर यांचा पगडा आहे असे अजिबात वाटले नाही. ‘जमीर’ पासून बी आर चोप्रा यांचे सुपुत्र रवी चोप्रा यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले व आपली वेगळी छाप दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘जमीर’ अयशस्वी ठरला. कर्म, पती पत्नी और वह, इंसाफ का तराजू, निकाह, तवायफ, आवाम हे चित्रपट बी आर फिल्म बॅनर खाली तयार झाले व त्या सर्वांना बी आर चोप्रा यांचे दिग्दर्शन होते. ‘निकाह’ मुस्लिम सोशल चित्रपट मात्र सुपरहिट ठरला. एका वेगळ्या विषयाची मांडणी त्यांनी निकाह मध्ये केली होती. ‘सलमा आगा’ ही नायिका-अभिनेत्री ‘निकाह’ (Nikaah) ची नायिका होती तर ‘इंसाफ का तराजू’ सेन्सॉर वादामुळे गाजला. छोटीसी बात (बासू चॅटर्जी), ‘अग्निपरीक्षा’ (के मुजुमदार), ‘आज की आवाज’, दहलीज (यश चोप्रा), ‘किरायेदार’ (बासू चॅटर्जी) हे चित्रपट बी.आर फिल्म्स या बॅनरखाली तयार झाले होते. १९५१ ते १९७० पर्यंत बी.आर फिल्म्स या बॅनरचा दरारा होता. साहिर लुधियानवी या गीतकारावर बी.आरचोप्रा यांची अपार श्रद्धा होती. बी.आर यांनी संगीतकार बदलले परंतु शेवटपर्यंत गीतकार मात्र साहिरच राहिले. प्रत्येक विषयाची हाताळणी एका वेगळ्या ढंगात करण्याचा बी.आर यांचा प्रयत्न असायचा.
(“लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन” या ज्येष्ठ सिनेसमीक्षक ‘अशोक उजळंबकर’ लिखित, हिंदी सिनेमाचे निवडक दिग्दर्शकांच्या पुस्तकांमधील ‘बी.आर. चोप्रा’ यांच्यावरील लेख खास नवरंग रुपेरीच्या वाचकांसाठी)
Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment