-अजिंक्य उजळंबकर

१९९३ साली झी टीव्हीवर ‘बनेगी अपनी बात’ नावाची मालिका सुरु झाली आणि पुढे बरीच गाजली. त्यात ‘ऍश्ले’ नावाच्या तरुणाकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. हा तरुण तेंव्हा बऱ्याच जाहिरातीमधून पण दिसायचा. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून बीएससी इलेक्ट्रॉनिक्स शिकलेला हा तरुण अभिनयाच्या आपल्या वेडापायी मिळेल ते काम करण्यास तयार असायचा. आधीपासूनच खूप धडपड्या स्वभावाचा. कॉलेजात शिकतांना रोटरी क्लबच्या युथ एक्स्चेंज प्रोग्राम मध्ये निवड होऊन कॅनडाला जाऊन आला. एनसीसी तर्फे इंग्लंड मध्ये जाण्यास पात्र ठरला जिथे जाऊन त्याने मिलिटरी ट्रेनिंग घेतली. स्वतःची मिलीटरीत जाण्याची संधी हुकल्याने मग त्याने कोल्हापुरात ‘पब्लिक स्पिकिंग व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’ शिकविण्यास सुरुवात केली व पुढे याच विषयात मुंबईत पोस्ट-ग्रॅज्युएशन पण केले. ९२ साली जपान येथे झालेल्या ‘यंग बिझनेमॅन कॉन्फरन्स’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान या तरुणास मिळाला. यातून मिळालेल्या अनुभवाने व आत्मविश्वासाने हा तरुण मॉडेलिंगच्या क्षेत्रात आला व आणि त्यास नाव मिळाले ‘आर.माधवन’. (Actor R. Madhavan) 

सी-हॉक्स, तोल मोल के बोल, घर जमाई, साया यासारख्या टीव्ही मालिकांमधून माधवनचा चेहरा प्रेक्षकांना ओळखीचा झाला व आवडायला लागला. ९६ साली माधवनला ‘इस रात कि सुबह नही’ या चित्रपटात पहिल्यांदा छोटा रोल मिळाला. मग एका इंग्रजी व कन्नड चित्रपटात छोटे रोल केले. आणि मग अखेर १९९९ साली या मेहनती  तरुणाचे भाग्य उजळले. भारतीय सिनेमाच्या लेजेंड डायरेक्टर्स पैकी एक अशी ओळख असलेल्या मणिरत्नम सरांचे लक्ष या तरुणाकडे गेले व त्यांनी त्यास “अलाईपयुथे” नावाच्या तामिळ सिनेमात हिरोचा रोल ऑफर केला. मणिरत्नम यांनी एखाद्या नवोदितास हिरो म्हणून संधी देण्याची ही पहिलीच वेळ होती. यांनतर माधवनने मागे वळून पहिलेच नाही.

२००१ साली ‘मिन्नाले’ नावाच्या दुसऱ्या तामिळ चित्रपटातील त्याची भूमिकाही खूप गाजली. याच ‘मिन्नाले’ चा हिंदी रिमेक बनला व माधवनची हिंदी चित्रपटसृष्टीत एंट्री झाली. चित्रपट होता ‘रहेना है तेरे दिलमें’. यातील त्याने रंगविलेल्या मॅडी शास्त्रीने तरुणाईस वेड लावले होते. माधवनच्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांपैकी काही नावे- रंग दे बसंती, गुरु, तनू वेड्स मनू व रिटर्न्स, थ्री इडियट्स. २०१६ साली तो सह-निर्माता असलेल्या ‘साला खडूस’ या चित्रपटात त्याने साकारलेला बॉक्सिंग कोच प्रेक्षकांना आवडला होता. आता त्याचा ‘रॉकेट्री’ येतोय ज्यात त्याने भारताचे प्रसिद्ध अंतराळ शास्त्रज्ञ नम्बी नारायण यांची भूमिका साकारली आहे व सोबत या चित्रपटाद्वारे माधवन दिग्दर्शन क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकत आहे. रॉकेट्रीच्या उत्कंठावर्धक ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता वाढविण्यात यश मिळवले आहे.

अभिनयाव्यतिरिक्त माधवन नेहमीच सामाजिक कार्यातही अग्रेसर असतो. प्राणी संरक्षण, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण क्षेत्रात त्याचे कार्य चालू असते. माधवनने आतापर्यंत सहा भाषांमधील अनेक चित्रपटात कामे केली आहेत व त्याच्या खात्यात चार फिल्मफेअर पुरस्कार जमा आहेत. तसा तो आला १९९६ साली इस रात की सुबह नही द्वारे पण २० वर्षांपूर्वी म्हणजेच २००१ साली रहेना है तेरे दिलमें च्या मॅडीने माधवन ला खरी ओळख मिळवून दिली. एक गुणी अभिनेता ते आता एका असाधारण विषयावरील सिनेमाचा प्रगल्भ दिग्दर्शक हा २० वर्षांचा प्रवास माधवन ने मोठ्या मेहनतीने, कुठल्याही गॉडफादर शिवाय, स्वतःच्या जिद्दीवर पूर्ण केला आहे. 

अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

हॅप्पी बर्थडे माधवन !

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment