त्या वर्षी आजच्या दिवशी..वो तो है अलबेला, हजारों में अकेला …‘कभी हां कभी ना’ 

– ©अजिंक्य उजळंबकर

वर्ष १९८८. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्यांनी आपल्या जादुई ब्रशने भारताचा मिडल क्लास कॉमन मॅन जगाला दाखवला असे आर के लक्ष्मण यांच्या कॉमन मॅन चे प्रतिनिधित्व करणारी एक सिरीयल यावर्षी दूरदर्शनवर झळकली. ‘वागले कि दुनिया’. वागले यांच्या रूपात तो कॉमन मॅन साकारला होता अभिनेते अंजन श्रीवास्तव यांनी. आर के यांचे कार्टून्स त्यांच्या साधेपणासाठी जसे गाजले तशीच ही मालिका सुद्धा. दूरदर्शनचे ते सोनेरी दिवस होते. “जाने भी दो यारो” या एव्हरग्रीन सिनेमानंतर दिग्दर्शक कुंदन शाह यांनी आपला मोर्चा टीव्हीकडे वळविला होता. १९८४ साली आलेली ‘ये जो है जिंदगी’, १९८६ साली आलेली ‘नुक्कड’, १९८७ साली आलेली ‘मनोरंजन’ व १९८८ साली आली ‘वागले कि दुनिया’ या सर्व मालिकांचे यशस्वी दिग्दर्शन केले होते कुंदन शाह यांनी. ‘वागले कि दुनिया’ च्या एका भागात वागले यांना एका बेफिकीर तरुणाची कार रस्त्यावर टक्कर देते. हा तरुण या मालिकेत या एका भागा पुरताच होता म्हणून कोणाचे लक्ष गेले नाही. वागले म्हणजे अंजन यांच्यासोबत हाच तरुण त्यादरम्यान आलेल्या ‘उम्मीद’ नामक मालिकेत पण झळकला होता ज्याची निर्मिती कुंदन शाह यांची होती. परंतु त्यानंतर त्या तरुणाने रंगविलेला अभिमन्यू रॉय नावाचा ‘फौजी’ व शेखरन नावाचा ‘सर्कस’ चा मालक मात्र टीव्ही प्रेक्षकांना आवडला होता. ‘वागले कि दुनिया’ नंतर मात्र दिग्दर्शक कुंदन शाह यांनी तब्बल ७ वर्षांचा ब्रेक घेतला. ९४ साली जेंव्हा ते सिनेमांच्या दुनियेत दिग्दर्शक म्हणून परतले तोपर्यंत हा तरुण ‘शाहरुख खान’ नावाचा स्टार झाला होता ज्याचे सहा सिनेमे प्रदर्शित झाले होते. १९९४ च्या फेब्रुवारीत आला कुंदन शाह दिग्दर्शित “कभी हां कभी ना” ज्यात त्या तरुणाच्या वडिलांच्या भूमिकेत होते वागले अर्थात अंजन श्रीवास्तव.

“कभी हां कभी ना” चे निर्माता विक्रम मेहरोत्रा यांच्या आग्रहाखातर कुंदन शाह शाहरुख खान यास साइन करण्यासाठी म्हणून पोहोचले. कुठे? तर दिवाना सिनेमाच्या सेटवर. १९९१ साली. शाहरुखला कुंदन यांची स्क्रिप्ट खूप आवडली होती व त्याने तोंडी होकार आधीच कळविला होता. कुंदन आणि त्याच्यात व्यावसायिक नाते नव्हते तर जवळचे मित्रत्वाचे संबंध होते पण निर्माते विक्रम काही ऐकेनात म्हणून दिवानाच्या सेटवर अखेर शाहरुखने हा सिनेमा साइन केला. साईनिंग अमाऊंट रु. ५००० घेऊन. टोटल फीस होती रू. २५०००/- . पण ९४ साली ‘कभी हां कभी ना’ (केएचकेएन) प्रदर्शित होईपर्यंत शाहरुख खान यांचे ‘दिल आशना है’, ‘दिवाना’, ‘चमत्कार’, ‘माया मेमसाब’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘बाझीगर’ व ‘डर’ हे सिनेमे प्रदर्शित होऊन एव्हाना शाहरुख खान नामक स्टार जन्मला होता. केएचकेएन खरंतर ‘बाझीगर’ व ‘डर’ च्या आधीपासून तयार होता पण वितरणासाठी कुणीच वितरक तयार होईनात. बाझीगर व डर मधील शाहरुख च्या भूमिका बघून तर वितरक अजूनच नकारात्मक झाले. कारण ‘केएचकेएन’ च्या कथेत सुनील (शाहरुख खान) हा टिपिकल बॉलिवूड हिरो नव्हता तर साधा मध्यम वर्गीय नायक होता ज्याला बरेच प्रयत्न करूनही कथेच्या अखेरीस नायिका काही मिळत नाही. आता अशा कथेच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची रिस्क घेण्यास कोणी वितरक तयार होईनात हे बघून अखेर शाहरुख खान मध्ये पडला. कारण हा चित्रपट शाहरुखचा अतिशय आवडीचा व स्पेशल होता म्हणून तो प्रदर्शित होण्यासाठी त्याने स्वतः वितरक होण्याचे ठरवले. व्हीनस कॅसेट कंपनी, निर्माते विजय गिलानी व स्वतः शाहरुख या तिघांनी मिळून हा चित्रपट वितरणासाठी घेतला व अखेर फेब्रुवारी ९४ रोजी चित्रपट प्रदर्शित झाला.

Left to Right: Kurush deboo, Deepak Tijori, Ashutosh Gowarikar, Shahrukh Khan and Aditya Lakhia
Left to Right: Kurush deboo, Deepak Tijori, Ashutosh Gowarikar, Shahrukh Khan and Aditya Lakhia

गोव्यात राहणारा कथेचा नायक सुनील (शाहरुख खान) याचे आयुष्यात दोनच गोष्टींवर मनापासून प्रेम असतं. एक म्हणजे संगीत व दुसरी म्हणजे त्याची मैत्रीण आना (सुचित्रा कृष्णमूर्ती). सुनीलच्या मित्रांचा एक म्युझिकल बँड असतो ज्यात इतर मित्रांसोबत क्रिस (दीपक तिजोरी) आहे ज्याचे सुद्धा आनावर प्रेम असते. आनाला पण क्रिस आवडत असतो पण सुनील मात्र आना साठी केवळ एक चांगला मित्र असतो. आनाचे प्रेम मिळविण्यासाठी मग सुनील येन केन प्रकारेण क्रिसला मधून हटविण्याचा प्रयत्न करतो. नको त्या चुका करतो, ज्याचा त्याला स्वतःला पश्चाताप होतो व त्या चुका तो स्वतःहून कबूलही करतो. अखेर आना वर खरे प्रेम असलेला सुनील तिच्या आनंदासाठी म्हणून स्वतःहून बाजूला हटतो व शेवटी आना व क्रिसचे लग्न होते.

Suchitra Krishnamurthy, Naseeruddin Shah and Shahrukh Khan in Kabhi Haan Kabhi Naa
Suchitra Krishnamurthy, Naseeruddin Shah and Shahrukh Khan in Kabhi Haan Kabhi Naa

कुंदन शाह यांच्या ‘जाने भी दो यारों’ मधील दोन नायकही असेच होते. ‘केएचकेएन’ च्या सुनील सारखे. अगदी कॉमन मॅनशी पटकन रिलेट होणारे व शेवटी हरणारे. सुरुवातीला उल्लेख केलेल्या कुंदन शाह यांच्या सर्व टीव्ही मालिका सुद्धा अशाच मिडल क्लासच्या अवती भोवती फिरणाऱ्याच होत्या. म्हणून प्रेक्षकांना शाहरुख ने साकारलेला सुनील अगदी आपल्या घरातलाच एक व्यक्ती वाटला होता. संगीताच्या दुनियेत व आनाच्या स्वप्नात रमणारा मध्यमवर्गीय सुनील परीक्षेत चार वर्षांपासून फेल होत असल्याने आई वडील व मित्रमंडळी यांच्या नजरेत मात्र केवळ एक लुजर असतो. ही भूमिका शाहरुखच्या करिअरमधील ‘वन ऑफ दि बेस्ट’ भूमिका आहे. स्वतः शाहरुख सुद्धा कित्येक मुलाखतींमधून याविषयी बोलत आला आहे. यात शाहरुख ‘डर’ किंवा ‘बाझीगर’ सारखा निगेटिव्ह भूमिकेत नव्हता पण काहीशी ‘ग्रे शेड’ असलेली हि भूमिका होती. पण काहीशीच. कारण आना आणि क्रिस मध्ये जाणून बुजून गैरसमज पसरविणारा सुनील स्वतःच आपल्या चुकांची कबुली नंतर देतो. माफी मागतो. म्हणजे  मनाने तितकाच प्रामाणिक व निर्मळ. इतका उत्स्फूर्त व इतका नैसर्गिक अभिनय यात शाहरुखने केलाय कि कित्येक शॉटच्या दरम्यान स्वतः कुंदन शाह त्याच्या अभिनयाने चकित होऊन गरज नसतांना रिटेक करायचे. का तर त्याला अभिनय करतांना परत परत बघण्याची त्यांना इच्छा व्हायची इतका सुंदर अभिनय तो करायचा. त्यावर्षीचा “फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर क्रिटिक्स अवॉर्ड” या भूमिकेसाठी शाहरुखला मिळाला होता. सोबत हाच “क्रिटिक्स अवॉर्ड फॉर बेस्ट मुव्ही” चा पुरस्कार मिळाला होता कुंदन शाह यांना. याच वर्षी शाहरुख चा ‘अंजाम’ हा सिनेमा आला होता ज्यात तो ‘कम्प्लिट निगेटिव्ह’ होता. योगायोगाने या भूमिकेसाठी याच वर्षीचा “बेस्ट व्हिलन फिल्मफेअर अवॉर्ड” सुद्धा शाहरूखलाच मिळाला होता. इतर कलाकारांमध्ये दीपक तिजोरीचा अभिनय चांगला होता. नवोदित सुचित्रा ठीकठाक तर नासिरुद्दीन शाह यांचा फादर ब्रिगेन्झा छान.

Deepak Tijori, Suchitra and Shahrukh Khan in Kabhi Haan Kabhi Naa
Deepak Tijori, Suchitra and Shahrukh Khan in Kabhi Haan Kabhi Naa

संगीतकार जतीन ललित यांचे सुपरहिट व मेलडीयस संगीत हा खरंतर केएचकेएन चा आत्मा होता. सहाच्या सहा गाणी सुरेल व श्रवणीय. कुंदन शाह यांचा हा पहिलाच चित्रपट ज्यात गाणी होती. विशेष म्हणजे ज्येष्ठ गीतकार मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिलेले प्रत्येक गीत हे इतके सिच्युएशनल होते की जणू काही ते कथेला पुढे घेऊन जात आहे इतके अविभाज्य वाटत होते. शिवाय कथा व पटकथाकार कुंदन शाह व पंकज अडवाणी यांच्या पात्राला समजावून सांगणारे. म्हणजे तुम्ही “वो तो है अलबेला, हजारों में अकेला” गाण्याच्या कडव्यांचे बोल ऐकले तर ते सुनील या पात्राविषयी इतकं परफेक्ट पणे बोलतात कि बस्स. “आना मेरे प्यार को ना तुम झूठा समझो जाना” पण तसेच. ‘ऐ काश के हम होश में अब’, ‘दिवाना दिल दिवाना’ ही दोन गीतेही मजरुहजींनी अतिशय सुंदर शब्दांनी गुंफली होती व जतीन ललित यांनी तितकेच श्रवणीय संगीतही दिले होते ज्यामुळे ‘केएचकेएन’ हा जतीन ललित यांच्या करिअरमधील एक माईलस्टोन सिनेमा ठरला. यातील ‘ऑड’ गाणे म्हणजे ‘सच्ची ये कहानी है’ हे डॉनच्या आयुष्यावर लिहिलेले गाणे. ७६ साली अमेरिकन पॉप सिंगर जॉनी वेक्लीन चे “इन झायर” हे गाणे अतिशय गाजले होते. त्याच गाण्याची चाल या गाण्याला दिली होती. ऑड वाटत असले तरी हे गाणे सुद्धा कथेच्या प्रसंगाला अनुसरून लिहिले होते हे विशेष.

Director Kundan Shah
Director Kundan Shah

चित्रपट अत्यंत कमी बजेटमध्ये बनविण्यात आला होता. शाहरुखने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली होती. कित्येक सीन्स मध्ये त्याने अतिशय उत्स्फूर्त व नैसर्गिक अभिनय तर केला आहेच शिवाय बजेट कमी आहे म्हणून कधीच तक्रार केली नाही व अखेरीस चित्रपट प्रदर्शित होऊ शकला तोही शाहरुख मुळेच असे कुंदनजींनी अनेक मुलाखतीत सांगितले आहे.

Music Director Jatin Lalit
Music Director Jatin Lalit

तर असा होता ‘कभी हां कभी ना’. ९४ सालीच यानंतर सहा महिन्यांनी आलेल्या “हम आपके है कौन” ने केवढे मोठे ऐतिहासिक यश संपादन केले हे आपण सर्व जाणतोच. शिवाय मोहरा, क्रांतीवीर, राजा बाबू, लाडला, सुहाग, राजा बाबू, विजयपथ, दिलवाले, मै खिलाडी तू अनाडी अशा तद्दन मसाला सिनेमांसमोर ‘केएचकेएन’ साधासुधा असूनही धीराने उभा राहिला व टिकला. आजही याला मोठी रिपीट व्हॅल्यू आहे ती केवळ त्याच्या ‘स्ट्रेट फ्रॉम दि हार्ट’ अशा प्रामाणिक मांडणी मुळेच.

वो तो है अलबेला, हजारों में अकेला …

थँक्स कुंदनजी. थँक्स शाहरुख. थँक्स जतीन ललित.

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment