– © चैतन्य धारूरकर

 

सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक शेखर कपूर यांचा आज वाढदिवस. शेखरजींच्या करिअरमधील अत्यंत महत्वाचा सिनेमा ‘मि. इंडिया’ (Mr. India) चित्रपटास नुकतीच ३३ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सिनेअभ्यासक चैतन्य धारूरकर यांनी या एव्हरग्रीन चित्रपटाविषयी केलेलं विश्लेषण केवळ नवरंग रुपेरीच्या वाचकांसाठी.

विकीपिडीया फिल्मोग्राफीप्रमाणे ’मिस्टर इंडीया’ हा अनिल कपूरचा पंचविसावा आणि श्रीदेवीचा तेहतिसावा चित्रपट होता. 25 मे 1987 रोजी रिलीज झालेला ’मिस्टर इंडीया’ आज चौतीस वर्षांनंतरही प्रेक्षकांना तितकाच ताजा आणि हवाहवासा वाटतो. सिनेमाचे अभ्यासक याला ’मस्ट वॉच’ इंडीयन फिल्म्स्च्या यादीत मानाचं स्थान देतात. या सिनेमाची जादू रिवाईव करण्याचा हा छोटासा प्रयत्न.

*धीस विक दॅट इयर -*

एरवी शुक्रवारी सिनेमा रिलीज होण्याची प्रथा हि भारतात पुर्वीपासून रूढ. ऐंशीच्या दशकात भारतात काही ठिकाणी गुरूवारी (एक दिवस आधी) सिनेमे रिलीज होत. मिस्टर इंडीयाची याला अपवाद ठरला. सिनेमाची हवा अशी होती की काही थियेटर मालकांनी थेट बुधवारी मिस्टर इंडीयाची स्क्रिनींग केलं. बॅक टू बॅक सिनेमाचे खेळ लावण्यात आले. सिनेमानं धूम केली.

*कथानक -*

म्युजिक ट्यूशन घेऊन अरूण वर्मा आपला उदरनिर्वाह भागवत असतो. बालपणीच आई वडीलांचं छत्र हरवल्यानं त्याला लहान मुलांविषयी निर्व्याज प्रेम. इतकं, की दहा अनाथ मुलांना अरूणनं दत्तक म्हणून घेतलेलं. कॅलेंडर [सतीश कौशिक – कौशिक हे ’मिस्टर इंडीया’चे सहायक दिग्दर्शकही होते] या आपल्या सहकार्‍यासोबत अरूण या मुलांचं संगोपनही करत असतो. रूपलाल [हरिष पटेल] या किराणा दुकानदाराकडून महिन्याचं वाण सामान घेण्याकरीता घरात चणचण. घरमालक माणिकलाल [युनूस परवेझ] हा राहतं घर खाली करण्याकरता तगादा लावतोय. अशातच मग घरात पेइंग गेस्ट ठेवण्याचा निर्णय अरूण घेतो. ’पेइंग गेस्ट’ पाहिजे म्हणून जाहिरात द्यायला अरूण वर्तमानपत्राच्या कचेरीत जातो आणि अरूणला भेटते पत्रकार सीमा सोहनी. सीमाला राहण्यासाठी जागा पाहिजे आणि अरूणला महिन्याचा घरखर्च भागवण्यासाठी पैसे. दोघांचाही प्रॉब्लेम सॉल्व. पण सीमाला कुठे ठाऊक की घरात लहान मुलंही आहेत. मग मुलं आणि सीमा यांच्यातला कॉन्फ्लीक्ट.
इकडे मुगॅम्बो गॅंग [डागा आणि तेजा – शरत सक्सेना आणि अजित वाच्छानी] भारतात अवैध शस्त्र उतरवण्याकरता अड्डा म्हणून अरूणच्याच राहत्या घरावर ताबा मिळवण्यासाठी आता आतूर आहेत. मग काय, गुंड कारगा आणि त्याची माणसं दोन दिवसात घर खाली करण्याचा दम देतात. इकडे जुगल हि माहिती प्रोफेसर सिन्हा [अशोककुमार] यांना देतो आणि सिन्हा एक पत्र अरूणला लिहितात. जुगल आणि अरूण पत्र वाचून सिन्हा यांच्या घरात जातात आणि तिथे अर्थात त्यांना ते जादूई घड्याळ सापडतं. पुढली सारी कहाणी संवादांसकट मुखपाठ असलेली पिढीच्या पिढी हिंदूस्थानात हजारोंच्या संख्येनं आहे.

*जन्मकथा* –

जितका ’मिस्टर इंडीया’ रंजक तितकीच त्याची जन्मकथाही गमतीशीर. ज्येष्ठ दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती यांनी अमिताभ बच्चन यांना घेऊन एक चित्रपट सुरू केला. चित्रपटाच्या ’मुहूरत’चं दृश्य चित्रीत व्हायचं नेमकं त्यावेळेला अमिताभ बच्चन हे चित्रीकरणासाठी बाहेरदेशात गेलेले. मग काय, टेपरेकॉर्डवर अमिताभ यांच्या आवाजाची ध्वनिफीत वाजवण्यात आली आणि शुभारंभाचं दृश्य चित्रीत करण्यात आलं. हि गोष्ट लेखक-गीतकार जावेद-अख्तर यांच्या कानावर पडली. त्यांना कल्पना सुचली की जर नायकाच्या अनुपस्थितीत फक्त त्याच्या आवाजावर दृश्य चित्रीत होऊन शूटींग होऊ शकतं, तर मग नायक ’गायब’ आहे या कल्पनेवर अख्खा सिनेमाच का बनू नये? झालं ; सलीम-जावेद यांनी कथा फुलवली. ’मिस्टर इंडीया’ फ्लोअरवर गेला त्यापुर्वी अमिताभ किंवा राजेश यांना तो ऑफर करण्यात आला होता म्हणतात. [याबाबत मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलच्यादरम्यान झालेल्या रियुनिअनचे जे फुटेज युट्य़ूबवर उपलब्ध आहे त्याद्वारे दुजोरा होऊ शकलेला नाही]. पण नायक जर पडद्यावर ‘दिसणार’च नाही तर मग त्याला ‘काम’ कसलं ? ! अशी भूमिका आघाडीच्या अभिनेत्यांनी घेतली अशी वदंता आहे. घरच्याच निर्मितीसंस्थेत काम करायला अनिल कपूर राजी होताच. त्यात श्रीदेवीसारख्या टॉपच्या नायिकेसोबत स्क्रिन शेअर करायची खुशी होतीच. ©

*अनिलची पराकाष्ठा -*

प्रॉडक्शन असिस्टंट सुरिंदर कपूर यांचा अनिल हा मधला मुलगा. पुढे सुरिंदर कपूर यांनी स्वत:ची निर्मितीसंस्था सुरू केली. थोरला मुलगा बोनीनं ’हम पाच’ या 1980 च्या सिनेमाच्या प्रोडक्शनमध्ये वडीलांच्यासोबत रस घेतला. अनिलला या पडद्यामागच्या मेहनतीइतकंच पडद्यावरील ग्लॅमर खुणावत होतं. त्यासाठी पडेल ती मेहनत घ्यायला तो तयार होता. यासाठी काय काय टक्केटोणपे अनिलनं खालले नव्हते ! घरच्याच प्रोडक्शन हाऊसवर असिस्टंट म्हणून आघाडीच्या अभिनेत्यांसाठी प्रसंगी छत्री धरून उभा रहा, कधी त्यांचा ड्रायवर बन, नेमानं त्यांना सकाळी सकाळी शूटींगच्या वेळेपुर्वी झोपेतून उठव अशी सारी सारी किरकोळ कामं अनिलनं हसत हसत केली. मिथुन, कन्हैयालाल या अभिनेत्यांना झोपेतून उठवणं कठीण होतं हे अनिलनं एका मुलाखतीत मध्यंतरी सांगितलं. बरं, आधी कुठं कुठं म्हणून यानं ऑडीशन नव्हत्या दिल्या. लेखी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून पुण्याच्या फिल्म इंस्टीट्य़ूटमधील प्रवेशास अनिलला मुकावं लागलं. ’रॉकी’मध्ये संजय दत्तच्या मित्राच्या भूमिकेसाठी त्यानं ऑडीशन दिली, त्यात रिजेक्शन आलं. दाक्षिणात्य सिनेमांमध्ये छोटेमोठे रोल केले. 1980 सालच्या ’राजश्री’च्या बॅनरखाली तयार झालेल्या ’एक बार कहो’ सिनेमासाठी पंधराशे रूपये मानधनावरही अनिलनं काम केलं. मग 1983 साली घरच्या बॅनरखाली आला ’वो सात दिन’. त्यात अनिलच्या निरलस कामाचं कौतुक झालं. 1984 साली ‘मशाल’मधील भुमिकेसाठी अनिल कपूरला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. 1985 च्या ’मेरी जंग’ने अनिलची वर्णी आता ए-लिस्टच्या अभिनेत्यांमध्ये लागली. लोक त्याला अमिताभला पर्याय म्हणून पहायला लागले. अल्थिया गिब्सन हि अमेरिकी टेनिसपटू म्हणते, Winning once can be a fluke; winning twice proves you are the best. ’मेरी जंग’च्या यशानं अनिलच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केलं. ’मिस्टर इंडीया’ ने अनिलचा पार राज्याभिषेकच केला.’मिस्टर इंडीया’ हि त्याच्या जिद्दीला मिळालेली संधीची जोड होती.

*श्रीदेवी नावाचं पॉवरहाऊस –*

श्रीदेवीला अभिनयाचं स्कूल का म्हणतात हे समजून घ्यायला ’मिस्टर इंडीया’ पुरेसा आहे. एरवी मुलांशी भांड भांड भांडणारी, त्यांचा त्रागा करणारी सीमा सोहनी मुलं उपाशीयेत म्हणून समजल्यावर अस्वस्थ होते तो क्षण किंवा डागा-तेजा जोडगोळीला पहिल्यांदा भेटते तेव्हा डोक्यावरील हॅटला लगडलेली द्राक्ष, सफरचंद खात खात स्वत:ला इंट्रोड्युस करणारी मिस हवाहवाई किंवा ’मिस्टर इंडीया’ विषयी परमोच्च कौतुक, कुतूहल यासह त्याच्यावर लट्टू झालेली सीमा – सर्व दृश्यात ’श्री’ने ॲक्टींची नवी परिमाणं सिध्द केली. असं म्हणतात की अन्यथा ’बापू’ यांच्या दिग्दर्शनाखाली बेतलेल्या एका चित्रपटासाठी मानधन देऊन निर्माता बोनी कपूर यांनी तीस दिवसांच्या शूटींगसाठी श्रीदेवी हिच्या तारखा बूक केल्या होत्या. त्या इकडे वळत्या करण्यात आल्या. त्या सत्कारणी लागल्या. कारगा सोशल क्लबमध्ये चार्लीच्या वेषात धुमाकूळ घालणारी श्रीदेवी हा हिंदी सिनेमांच्या इतिहासातला एक अजरामर सीन होऊन गेला. अवघ्या नऊ मिनिटांचा हा सीन शूट करायला तब्बल बत्तीस दिवस लागले हे व्हिएफएक्सच्या जमान्यात आज कुणाला खरं वाटणारं नाही. © ’हवाहवाई’ आणि ‘काटे नहीं कटते’ या गाण्यामधील श्रीदेवीपुढं आजकालचे सगळे आयटम सॉंग्ज तद्दन फुटकळ, अळणी आणि निष्प्रभ वाटतात. मामी 2015 च्या ’मिस्टर इंडिया’ रियुनियनसाठी श्रीदेवी आणि प्रमुख कलाकार, जावेद अख्तर, निर्माता बोनी कपूर, सहायक दिग्दर्शक सतीष कैशिक एकत्र आले होते. सगळ्यांनी सिनेमाच्या आठवणी जागवल्या. श्रीदेवीला विचारलं नंतर पत्रकारांनी, “ तुम्ही इतका सर्वोत्कृष्ट नृत्याविष्कार कसा काय साधलात?” हि पठ्ठी तिच्या ठेवणीतील विनयभावाने सगळं श्रेय नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांना देऊन मोकळी. हास्य, कारूण्य, दु:ख, क्रोध, विनोद – नवरसातील बहुतेक रस ’श्री’नं बिनचूक वठवले. इतके की, आजच्या आणि पुढील अनेक पिढ्या अभिनेत्रींना टेक्स्ट बूक म्हणून सीमा सोहनीच्या पात्राचा अभ्यास करावा.

*मोगॅम्बो नावाचा कहर –*

ॲक्टींग इज रिॲक्टींग हे अभिनयाचं सूत्रय. एखादी भावना प्रकर्षानं लोकांत रूजवायची, पोहचवायची तर त्या भावनेवरील प्रतिक्रिया तितकीच ताकदीची आणि तोलामोलाची असायला हवी. अरूण वर्माच्या सालस, सर्‍हदयी, प्रेमळ पात्राला एकदम टोकाची विखारी प्रतिक्रिया अगदी ताकदीनी दिली अमरिश पुरी यांनी. हिंदी चित्रपटसृष्टीला एक यादगार व्हिलन मिळाला. गब्बरचा पट्टा आणि मोगॅम्बोच्या अंगठ्यांचा आवाजा यांचा ‘इको’ सदाके लिए गुंजत राहणारा आहे. दुर्दैव बघा, 1987 साली फिल्मफेअर अवॉर्ड्स काही कारणास्तव दिलेच गेले नाहीत. अन्यथा, पुरी यांच्याखेरीज त्यावर दुसर्‍या कुणाची मोहोर असणार होती?

*नेमके संवाद, सुश्राव्य संगीत, संयत दिग्दर्शन –*

कॅलेन्डर आणि अरूण रूपचंदच्या दुकानात किराणा सामान आणायला जातात तेव्हा कॅलेन्डर म्हणतो, “चलीये अरूण भय्या घरपर जाके कंकरसे गेहू चुनने है..!” किंवा अरूण पेईंग गेस्टचे ’इश्तेहार’ द्यायला ‘अखबार’च्या ऑफीसमध्ये जातो तेव्हा सीमा सोहनी त्याला कुख्यात दरोडेखोर ’मंगलू’ समजून त्याची मुलाखत म्हणून प्रश्न विचारायला लागते. झालेली गफलत लक्षात आल्यानंतर ती अरूणला म्हणते, “अच्छा, तुम मंगलू नहीं हो? तो तुम इस कमरेमें क्या कर रहे हो?” यावर अरूण उत्स्फूर्तपणे म्हणतो, “ मॅडम, आपभी इस कमरेमें हैं और जहां तक मेरा खयाल है, आपभी मंगलू नहीं हैं !”. पुढे सीमा पेईंग गेस्ट म्हणून अरूणच्या बंगल्यात राहायला जाते आणि मुलांच्या फूटबॉलवरून भांडण होते तेव्हा सीमा अरूणला म्हणते,”अब ये फूटबॉल अदालतमें जायेगी.” त्यावर अरूण म्हणतो, “अदालत? पर अदालत क्यों? मॅडम अदालतमें कोई फूटबॉल खेलता नहीं है!” [ROFL]. या सार्‍या संवादांमधला सहजपणा प्रत्येकाच्या तोंडून इतक्या बालसुलभ भावानं व्यक्त झाला की संपूर्ण चित्रपटभर एक निर्व्याज हास्य सिनेमा पाहणार्‍याच्या चेहर्‍यावर विलसत राहतं.©

चित्रपटाची तयारी सुरू झाली तेव्हा संगीत अर्थात लक्ष्मी-प्यारे करणार होते. कीशोर कुमार आणि लक्ष्मी-प्यारे यांच्या जोडीत तेव्हा सारं आलबेल नव्हतं. ‘पुन्हा लक्ष्मी-प्यारेंसोबत गाणार नाही’ अशी प्रतिज्ञा कीशोरदा करून बसले होते. आणि ’जिंदगीकी यही रित हैं..” या गाण्यासाठी कीशोरदांशिवाय दुसरं कोणी कसंच पुरून उरेल याभावनेनं अनिल कपूर अस्वस्थ होता. त्यानं भीत भीत कीशोरदांना साकडं घातलं. मि.इंडीयात तुम्ही गायलाच हवं. ते तयार झाले. बॉलीवूडला, संगीतप्रेमींना जीवनाचं सार सांगणारं एक यादगार गाणं मिळालं. हवाहवाईच्या बाबतीतला तर किस्सा मोठा मजेदार आहे. कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे गाणं वास्तविक दुसरंच कुणीतरी गाणं अपेक्षित होतं. फक्त डबिंगच्या तांत्रिक खबरदारीसाठी कविता यांच्या आवाजातील गाण ध्वनिमुद्रीत करण्यात आलं. त्यात एका कडव्यात शब्द होते,

_समझे क्या हो नादानों, मुझको भोली ना जानो_
_मैं हूँ साँपों की रानी, काँटा मांगे ना पानी_
_सागर से मोती छीनूं, दीपक से ज्योति छीनूं_
_पत्थर से आग लगा लूं, सीने से राज़ चुरा लूं_
_हाँ चुरा लूं चुरा लूं हाँ हाँ चुरा लूं_
_*जानू* जो तुमने बात छुपाई, हो जानूं जो तुमने बात छुपाई_
_कहते हैं मुझको हवा हवाई_

यातल्या शेवटून दुसर्‍या ओळीत गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी गाण्यात गोंधळ केला. *’जानू’* ऐवजी त्या *’जीनू’* जो तुमने बात छुपाई असं गाऊन गेल्या. पण गाणं आधी रेकॉर्ड झालं तेव्हा याकडे कुणी फारसं लक्ष दिलं नाही. जेव्हा फायनली कविताजींचंच गाणं सिनेमात घ्यायचं ठरलं तेव्हा संगीतकार प्यारेलाल यांनी हि गोष्ट कविताजींना सांगितली. त्या अस्वस्थ झाल्या. ‘चुकलेला भाग किंवा संपूर्ण गाणंच मी परत एकदा गाते. आपण परत रेकॉर्ड करू’, असं त्यांचं म्हणणं. मात्र झालेलं गाणंच अवीट झालंय यावर दोघंही संगीतकार ठाम होते. अशा पध्दतीनं आणखी एक गीत संगीतप्रेमींच्या मनात कायमचं घर करून गेलं.©

आज जे अप्रूप सर्वार्थानं शूजीत सरकार, प्रियदर्शन यांच्या कामाबाबत अनेकांना वाटतं अगदी तितकाच आणि तसाच शेखर कपूर यांच्या कामाचा विस्तार आहे. कुठे ‘मासूम’, कुठे ‘मिस्टर इंडीया’, कुठे ‘बॅन्डीट क्वीन’ आणि कुठे ‘एलिझाबेथ’. यामाणसाकडून अधिक काम व्हायला पाहिजे असं मि. इंडीया बघताना वारंवार वाटत राहतं. राजकुमार हिराणी एकदा म्हटल्याचं आठवतंय, “उत्कृष्ट सिनेमा तो जो तुम्ही कधीही, कुठेही, केव्हाही, कुठपासूनही बघितला तरी तुम्ही तो एंजॉय करू शकता”. शेखर यांची सिनेमा माध्यमावरील हिच पकड मिस्टर इंडीयाभर पदोपदी जाणवत राहते.

*लगन-जिद्द-निष्ठा –*

मामी रियुनिअनला सतीष कैशिक यांनी शेअर केलेल्या एक-दोन गोष्टीच सिनेमामागील निर्मात्याची जिद्द, प्रेरणा, समर्पणभाव पुरेशा स्पष्ट करणार्‍या आहेत. कला दिग्दर्शक बिजॉन दासगुप्ता यांनी समुद्रकिनारी मनस्वीपणे डिजाईन केलेला बंगल्याचा सेट होता. या सेटच्या पाठीमागे जी लहान मुलं सिनेमात सहभागी होती त्यांच्या राहण्या-खाण्याची खास सोय बोनी कपूर यांनी केली. मुलांना खेळण्यासाठी वॉलीबॉल, कॅरम होता. त्यांचा शाळेचा अभ्यास बुडू नये म्हणून खास शिक्षक तैनात होते. तरीही, मुलांना सीनसाठी तयार करण्यात कशी दमछाक होत असे हे आजही सतीष कैशिक मोठ्या अपुर्वाईनं सांगतात. मामीच्या रियुनिअनला जावेद अख्तर म्हणाले तेच खरं, “Only unreasonable people can make film like Mr. India. Only dreamer can think of making it”. खरंचय ते. मिस्टर इंडीया हे बोनी कपूर, सुरिंदर कपूर यांनी पहिलेलं स्वप्न होतं, ते त्यांनी नेटानं सत्यात उतरवलं, भारताला पहिला सुपरहिरो दिला. ©

*ट्रिवीया –* सिनेपत्रकार व ‘नवरंग रुपेरी’ या चित्रपटविषयक अंकाचे संस्थापक संपादक अशोक उजळंबकर यांनी आमच्याकडे मिस्टर इंडीयाच्या खेळाचे फॅमिली पास दिले होते. हि गोष्ट मी इयत्ता पहिली वर्गात असतानाची. सोबत प्रमोशनल स्टिकरही होते. चाबूकधारी श्रीदेवीचा फोटो आणि मागे टोपीवाल्या अनिल कपूरच्या हास्यमुद्रा असं ते स्टीकर. हे स्टीकर पुढं अनेक वर्ष आमच्या दिवाणखान्याच्या दरवाज्यावर विराजमान होतं. औरंगाबादेत अभिनय टॉकीजमध्ये मी बघितलेला मिस्टर इंडीया हा पहिला सिनेमा. पुढे उजळंबकर काकांना मी ‘मिस्टर इंडीया’चे काका म्हणायचो ते आजवर म्हणतोच. त्यांचा नंबरही माझ्या फोनमध्ये याच नावाने सेव आहे.

दिग्दर्शक शेखर कपूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

 

(लेखक हे व्यवसायाने वकील असून सिनेमा माध्यमाचे अभ्यासक आहेत)

(© लेखाचे सर्व हक्क राखीव); Image Courtesy- Google

Chaitanya Dharurkar
+ posts

2 Comments

  • Dr. MILIND Mane
    On December 6, 2020 11:52 am 0Likes

    Nice review of the movie, it’s my all time favourite movie only for Shridevi’s uniqe performance.

    • admin
      On December 9, 2020 9:25 pm 0Likes

      Thanks for your precious comments

Leave a comment