मराठी चित्रसृष्टीतील चतुरस्त्र व प्रतिभासंपन्न अभिनेत्री जयश्री गडकर त्यांच्याविषयी काही रंजक गोष्टी :
१. जयश्रीजींचा जन्म २१ मार्च १९४० रोजी, कारवार जिल्ह्यातील कणसगिरी या गावी झाला. शालेय शिक्षण मुंबईत झाले. लहानपणापासून गाण्याची आवड असल्याने मास्तर नवरंग यांच्याकडे त्या गाणे शिकल्या.
२. वयाच्या १० व्या वर्षापासून त्यांनी हौस म्हणून नाटकात कामे केली व सोबतच शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेतले.
३. १९५५ साली आलेल्या व्ही. शांताराम यांच्या झनक झनक पायल बाजे या चित्रपटात त्या एका समूहनृत्यात सहनर्तिका म्हणून दिसल्या.
४. योगायोगाने वयाच्या बरोबर १६ व्या वर्षी म्हणजे २१ मार्च १९५६ रोजी नायिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट होता गाठ पडली ठका ठका.
५. जयश्रीजींच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरलेला सांगत्ये ऐका हा चित्रपट आला १९५९ साली. यातील त्यांच्या बुगडी माझी सांडली गं या लावणीने त्यांना अवघ्या महाराष्ट्रात कमालीची लोकप्रियता मिळवून दिली, त्यांना रसरंग फाळके पुरस्कार मिळाला. चित्रपट पुण्यात सलग १३२ आठवडे चालला.
६. १९६१ सालच्या मानिनी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटाने त्यांची तमासगिरीणीची इमेज तोडली व सोज्वळ गृहिणीच्या रूपातही प्रेक्षकांचे त्यांना अफाट प्रेम मिळाले.
७. १९६४ ते १९६५ या तीन वर्षात त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारांची हॅट्ट्रिक केली. चित्रपट होते सवाल माझा ऐका, साधी माणसं व पवनाकाठचा धोंडी.
७. राज्य शासनातर्फे जयश्रीजींच्या ज्या भूमिकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव झाला त्या होत्या- साधी माणसं, पाटलाची सून, थांब लक्ष्मी कुंकू लावते, घर गंगेच्या काठी व घरकूल.
८. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे या साधी माणसं चित्रपटातील गाण्यासाठी व एकंदर चित्रपटासाठी त्यांनी आधी लोहाराचा भाता कसा चालवायचा हे शिकून घेतले होते.
९. मराठीसोबतच हिंदी, गुजराती, मारवाडी, पंजाबी, भोजपुरी, कन्नड, तेलगू या भाषांमधूनही भूमिका करत एकूण २५० चित्रपटांतून भूमिका केल्या.
१०. जयश्रीजींचे गाजलेले चित्रपट ठरले, सवाल माझा ऐका, साधी माणसं, पवनाकाठचा धोंडी, थांब लक्ष्मी कुंकू लावते, युगे युगे मी वाट पहिली, घरकूल, घर गंगेच्या काठी, पाटलाची सून, अवघाची संसार, मोहित्यांची मंजुळा, मानिनी इत्यादी.
११. हिंदी चित्रपटातही धार्मिक, पौराणिक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. सारंगा चित्रपटातील “सारंगा तेरी याद में” हे त्यांचे हिंदीतील गाजलेले गाणे.
१२. १९७५ साली बाळ धूरी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. दूरदर्शनवरील रामायण मालिकेत या दोघांची दशरथ व कौशल्येची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.
१३. निर्माती, दिग्दर्शिका म्हणून १९९६ सालचा”अशी असावी सासू” हा त्यांचा चित्रपट तर त्या आधी १९९४ साली “सासर माहेर” या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते.
१४. जयश्रीजींना गदिमा पुरस्कार, झी-अल्फा गौरव पुरस्कार, गंगाजमुना पुरस्कार, सींटा पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
अशा महान अभिनेत्रीस  नवरंग रुपेरी तर्फे विनम्र अभिवादन.
– टीम नवरंग रुपेरी
(स्केच सौजन्य- श्रीकांत धोंगडे)
Website | + posts

Leave a comment