अनुपमा – ऐसी भी बातें होती हैं…

निर्माते एल. बी. लक्ष्मण यांच्यासाठी ऋषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला ‘अनुपमा’ हा एक भावपूर्ण चित्रपट होता. सर्वसाधारणपणे हिंदी सिनेमात मुलगा आणि आई यांच्या प्रेमाची कहाणी रंगविली जाते. अनुपममध्ये बाप आणि मुलगी यांच्यातील दुराव्याची कथा प्रथमच मांडली गेली होती. शर्मा या श्रीमंत माणसाचा त्याच्या मुलीवर – उमावर राग असतो. कारण तिला जन्म देताना त्याच्या प्रिय पत्नीचे निधन झालेले असते. यात आपल्या मुलीचा दोष नाही हे त्याला कळते; पण तो तिला क्षमाही करू शकत नाही. कारण त्याचे पत्नीवर अतिशय प्रेम असते. मुलगी लहान असताना तो तिला उद्देशून म्हणतो, तेरा कुसूर क्या है? मैं तुझसे क्यूं नफरत कर रहा हूं? तिरस्कार आणि प्रेम या दोन्हींच्या झगड्यात तो आतून तुटून लागतो. दु:ख विसरण्यासाठी तो दारूचा आसरा घेऊ लागतो; पण तो आसराही किती फसवा असतो! एकीकडे तो मुलीसाठी खेळणी, भेटवस्तू घेऊन येतो; पण ती समोर दिसताच त्याचा राग उफाळून येतो.
अशीच काही वर्षे जातात. उमा (शर्मिला टागोर) आता एक सुस्वरूप तरुण मुलगी बनलेली आहे. लहानपणापासून हेच ऐकत आल्यामुळे उमा देखील स्वत:ला आईच्या मृत्यूसाठी जबाबदार धरते. ती अबोल बनते, स्वत:ला मिटवून घेते. तिला वडिलांची भीती वाटू लागते. त्यांच्यासमोर ती एक शब्दही बोलू शकत नाही. तिला शिकवण्यासाठी शर्माने एका शिक्षकाची नियुक्ती केली आहे. त्यांची तक्रार आहे की, उमा अभ्यासात हुशार आहे, ती उत्तम लिहिते; पण विचारलेल्या एकाही प्रश्‍नाचे उत्तर ती देत नाही. छोट्या छोट्या प्रसंगांतून मानवी भावनांचे नाट्य फुलविणे हे ऋषीकेश मुखर्जी यांचे वैशिष्ट्य आहे. आपल्या प्रश्‍नांचे उत्तर ही मुलगी देत नाही हे पाहून शिक्षक रागवतात. ते चिडून म्हणतात, मोठ्या घराच्या मुलांचे असेच असते. आईबापाच्या लाडाने ती बिघडलेली असतात. उमा चमकून त्यांच्याकडे पाहते. पडद्यावर शर्मिलाच्या भावपूर्ण चेहर्‍याच्या क्लोजअप. ती बोलत काहीच नाही; पण तिच्या जिव्हारी ही गोष्ट लागली आहे, हे तिच्या डोळ्यांतून व्यक्त होते. कॅमेरा काचेकडे वळतो. त्यांच्यात ती आपले प्रतिबिंब शोधते आहे काय?…

वडील ऑफिसमध्ये गेल्यावर विरंगुळा म्हणून उमा पियानो वाजवीत बसते. एके दिवशी प्रकृती ठीक नसल्यामुळे ते लवकर घरी परततात. पाहतात तो उमा पियानो वाजवीत पाठमोरी बसलेली असते. क्षणभर ते कौतुकाने तिच्याकडे पाहतात. त्यांना जुनी आठवण येते. त्यांची पत्नी अशीच पियानो वाजवायची. ती आठवण येताच सारे बिघडते. ते रागाने तिचे वाजविणे बंद करतात. याला का हात लावलास? चिडून विचारतात. ती घाबरून आपल्या खोलीत निघून जाते.
आपला एकाकीपणा ती कसाबसा सहन करते; पण तिच्या वडिलांना त्यांचा एकाकीपणा सहन होत नाही. यामुळे आणि दारूचे व्यसन वाढल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत जाते. डॉक्टरांच्या सल्ल्यावरून ते दारू पिणे सोडतात आणि विश्रांतीसाठी महाबळेश्वरला जाऊन राहतात. या पार्श्वभूमीवर विलायतहून शर्मांच्या मित्राचा मुलगा अरुण (देवेन शर्मा) भारतात येतो. उमाचे लग्न अरुणशी करण्याचा तिच्या वडिलांचा विचार असतो. अरुणही महाबळेश्वरला येतो; पण सोबत तो त्याचा मित्र अशोक (धर्मेंद्र) यालाही त्याच्या आई व बहिणींसह घेऊन येतो. अशोक हा एक आदर्शवादी लेखक आहे. प्राध्यापकाची मिळालेली नोकरी, तिच्यात काम कमी व पगार जास्त म्हणून सोडून देऊन त्याने शिक्षकाची नोकरी स्वीकारली आहे.

महाबळेश्वर येथे शर्मांचे मित्र बक्षी यांचेही फार्महाऊस आहे. शर्मासोबत बक्षी व त्यांची उमाच्याच वयाची मुलगी अनिता हीदेखील येथे आली आहे. शर्मा, बक्षी आणि अशोक यांच्या तीन कुटुंबांची एक छान मैफल आता जमते.
अनिता आणि तिचे वडील यांची ओळख दिग्दर्शक कशा प्रकारे करून देतो ते पाहण्यासारखे आहे. ती एका संतापी घोड्यावरून रपेट करताना पाहून बक्षी तिला रागवतात; पण आपल्याला रागवल्याबद्दल तीच त्यांना रागवते. वडिलांशी दंगा मस्ती करते, त्यांना आपल्याशी पंजा लढविण्याचे आव्हान देते आणि हरल्यावर रूसते. जरा अंतरावर फार्महाऊसच्या खिडकीतून उमा हे सारे पाहत असते, एक मुलगी आपल्या वडिलांशी अशा प्रकारे वागू शकते यावर तिचा विश्वासच बसत नाही. तिचे वडील अनिताचा हा दंगा कौतुकाने पाहत असतात; पण तेवढ्यात खिडकीतून डोक्यावरच्या आपल्या मुलीचा चेहरा त्यांना दिसतो व त्यांच्या चेहर्‍यावरचे हसू आणि कौतुक मावळते. कसल्याही शब्दाविना ऋषीदा दोन व्यक्तींच्या मनात चाललेली खळबळ चित्रित करतात. दोन व्यक्तींमधील साम्य आणि विरोध ही या चित्रपटाची एक महत्त्वाची थीम आहे. उमा आणि अनिता यांच्या वागण्यात केवढा विरोध आहे हे आपल्याला पहिल्याच दृश्यात जाणवते; पण काही काळानंतर आपल्या लक्षात येते की, आतून अनिता ही उमासारखीच सरळ, साधी आणि मनाने चांगली आहे.
शर्मा आणि बक्षी दोघेही बिजनेसमन हे त्यांच्यातील साम्य. याच प्रसंगात दोघे बोलत असताना आपल्याला कळते की, बक्षीची बायकोही मुलगी एक वर्षाची असतानाच मरण पावली आहे; पण तेव्हापासून अनिता हेच त्यांचे सर्वस्व बनले आहे, तिचे आई आणि बाप तेच बनले आहेत. मुळाशी असणारी घटना सारखीच; पण तिचे दोन व्यक्तींवर वेगवेगळे परिणाम होतात. कारण तिच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो.

अरुणबरोबर महाबळेश्वरला आल्यानंतर अशोकची या सार्‍या मंडळींशी भेट होते. उमा त्याला भेटल्यावर काहीच बोलत नाही, एक शब्दही उच्चारत नाही. उलट अनिता मात्र बोलण्याचे थांबत नाही, याचे त्याला आश्चर्य वाटते. तो म्हणतो, यहां तो एक से बढकर एक कॅरेक्टर हैं, इन पे शॉर्ट स्टोरी क्या, पुरा नोबेल लिखा जा सकता है!
आपला मित्र अशोक लेखक असल्याचा अरुणला अभिमान असतो. अशोकची सार्‍यांशी ओळख करून देताना तो म्हणतो, अशोक बडे लेखक है. देश की बडी बडी पत्रिकाओं में इनकी कहानिया छपती हैं।
यावर बक्षी विचारतात, अच्छा काम क्या कहते है आप?
अरुणचा चेहरा उतरतो; पण अशोक म्हणतो, सही पूछा आपने. हमारे देश में लेखकों को काम अलग से ढूँढना पडता है।
संवादातून सामाजिक स्थितीवर उपरोधिक टीका करणे ही ऋषीदांची खासियत होती. सारखी बडबड करणारी अनिता अरुणच्या प्रेमात पडते तर मुळीच न बोलणार्‍या उमाकडे अशोक आकर्षित होतो. अशोकची आई उमाला आपल्या मुलीसारखी मानते. उमा कदाचित तिच्यात आपली हरवलेली आई पाहते. कारण एके दिवशी ती काहीच खात नाही असं दिसल्यावर उमा तिला म्हणते, कुछ तो खा लिजिए। लहानपणापासून उमाचा सांभाळ करणारी दाई ते ऐकून अवाक होते. आपणही या सिनेमात आता तिचा आवाजा प्रथमच ऐकतो. तिच्यात होत असलेल्या बदलाची ही पहिली नांदी.
शर्मिला टागोर उमाच्या भूमिकेत जितकी अप्रतीम लावण्यवती दिसली आहे तितकेच अप्रतीम भावदर्शन तिचे घडविले आहे. सत्यजित राय यांच्या ‘अपूर संसार’मधील तिच्या अभिनयाची तुलना करता येईल, अशी भूमिका तिने या सिनेमात केली होती. अशोक एकदा उमाला म्हणतो, आपको बोलने की जरूरत नहीं, आपकी आँखेही सब कुछ बोल देती हैं. शर्मिलाच्या अभिनयालाही हे विधान लागू होते. पापण्यांची उघडझाप, ओठांची हालचाल आणि देहबोली यातून उमाच्या मनातील सार्‍या भावना तिने सामर्थ्याने प्रकट केल्या होत्या. शंभर शब्द जे सांगू शकणार नाहीत ते नजरेतून सांगणारी शर्मिला म्हणजे सौंदर्य आणि ऋजुता यांचा झालेला मनोहर संगम होता.

हे वर्ष धर्मेंद्रसाठी फार महत्त्वाचे ठरले. यावर्षी त्यांचा ‘फूल और पत्थर’ हा चित्रपट प्रचंड गाजला. हीमॅनही त्याची जी प्रतिमा पुढे लोकप्रिय झाली तिचा उगम या चित्रपटात होता. ‘ममता’ आणि ‘अनुपमा’ या चित्रपटांनी त्याला एक संवेदनशील अभिनेता अशी ओळख मिळवून दिली. दुर्दैवाने कुत्ते, कमीने, मैं तुझे खा जाउंगा टाईप भूमिकांतच तो पुढे अडकला. ‘अनुपमा’मधील आदर्शवादी लेखकाच्या भूमकेत तो शोभून दिसला व त्याने संयत भाव दर्शनाने ही भूमिका जिवंत केली.
‘गुमराह’नंतर शशीकलेला पुन्हा एकदा एक लक्षवेधी भूमिका मिळाली होती. पडद्यावर ती असली की तिच्या असण्यामुळे वातावरणात चैतन्य यायचे. हिंदी सिनेमाने तिच्या अभिनयाला वाव मिळतील, अशा फार कमी भूमिका तिला दिल्या. तरुण बोसला एवढी महत्त्वाची व मध्यवर्ती भूमिका प्रथमच मिळाली होती. ती त्याने प्रभावीपणे केली. देवेन वर्मा, दुर्गा खोटे यांची कामेही सुरेख होती.
बुजुर्ग कलाकार डेव्हिड यांच्या भूमिकेला स्वतंत्रपण विचार करायला हवा अशी ती भूमिका आहे. मोझेस नावाचा हा अविवाहित, म्हातारपणाकडे झुकलेला वकील शर्मांचा मित्र आहे. हा एक जन्मजात विनोदी स्वभावाचा माणूस डेव्हिडने ज्या अवलिया पद्धतीने रंगविला आहे तिला तोड नाही. तो सतत आपल्या जवानीतील खोटे किस्से रंगवून सांगत असतो. गम्मत ही की, ऐकणार्‍यालाही हे किस्से खोटे आहेत हे समजते; पण सारेजण ते एन्जॉय करतात. मनाचे तारुण्य अजिबात न हरवलेला हा माणूस आहे. त्याला तरुणांत रमावे वाटते, त्यांच्या सुख-दु:खात तो त्यांच्या इतकाच गुंततो. न मागताही सल्ला देतो. कधी त्यांना रागावून वळणावरही आणतो. शर्मांच्या तो अगदी विरुद्ध आहे. दोन व्यक्तीतील संवाद वाढविणे ही त्याची आवड आहे. ही व्यक्तिरेखा लेखक-दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी अप्रतिम रंगविली आहे. त्यांनी मुद्दाम विनोदासाठी विनोदी पात्र आणले आहे, असे कुठेही जाणवत नाही. या पात्राला मुळात एक गंभीर, वैचारिक बैठक आहे हे कथेच्या शेवटीशेवटी जाणवते. अशोक-उमा आणि अरुण-अनिता या प्रेमी युगुलांना एकत्र आणण्यात तो मोलाची भूमिका निभावतो. ही बैठक पूर्णपणे समजून घेऊन डेव्हिडने या पात्राला विदुषक होऊ दिले नाही.
अशोक उमाच्या प्रेमात पडतो आणि उमाही त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले. मात्र आपल्या भावना बोलून दाखविण्याची तिला सवय नाही. काही दिवसांनी शर्मांना मुंबईहून तार येते व महाबळेश्वर सोडून ते उमासह मुंबईला परत जातात. जाताना उमा अशोकच्या नकळत त्याच्या खोलीत एक फुलांचा गुच्छ ठेवून जाते.
अशोकचे उमावरील प्रेम अनिताच्या ध्यानात येते. तसे ते शर्मांच्याही ध्यानात येते; पण अशोक गरीब असल्यामुळे ते या संबंधाच्या विरुद्ध असतात. अनिता अशोकला म्हणते, तू तिला पळवून का आणत नाहीस? यावर अशोक जे उत्तर देतो ते त्याच्या व्यक्तिमत्त्वावर वेगळा प्रकाश टाकणारे आहे. तो म्हणतो, मी माझी मते तिच्यार लादू इच्छित नाही. तिने स्वत:च आपल्या जीवनाची दिशा ठरविली पाहिजे.
अशोक जरी स्वत: होऊन तिच्यावर काही लादत नाही; पण शेवटी तिच्यातील बदलाला तोच कारणीभूत ठरतो. तिच्या जीवनावर तो अनुपमा या नावाची कादंबरी लिहितो आणि त्यातील नायिकेच्या रूपाने उमाच्या आयुष्यातील प्रश्‍न आणि त्यांचे एक संभाव्य उत्तर तो सादर करतो. ही कादंबरी उमाला आत्मभान मिळविण्यात मोलाची मदत करते. हळूहळू तिच्या ध्यानात येते की, आपला शत्रू कुणी बाहेरचा नाही, आपणच आपल्याभोवती भिंती घातल्या आहेत आणि आपणच त्या तोडू शकतो.
संवादाचा अभाव आणि संवादाचा प्रभाव ही या चित्रपटाची एक महत्त्वाची थीम आहे. संवाद कसा करावा हे उमाला ठाऊकच नाही हे एका प्रसंगात दिग्दर्शकाने मोठ्या युबीने दाखविले आहे. एकदा अशोकची बहीण उमाला फोन करते; पण फोनवर आपण जे ऐकतो त्याला उत्तर देण्यासाठी आपणही काही बोलावे लागते हे उमाला ठाऊकच नाही. ती फक्त होकारार्थी किंवा नकारार्थी मान हलविते.
चित्रपटाच्या शेवटी उमा आपले घर सोडून अशोकबरोबर जीवनाची वाटचाल करण्यासाठी निघते. स्वत:च लिहिलेल्या या अतिशय वेगळ्या कथानकावरील सिनेमाचा ऋषिकेश मुखर्जी यांनी केलेला शेवट मात्र हिंदी सिनेमाच्या परंपरेला साजेसा, मेलोड्रामाच्या अंगाने जाणारा आहे. हिंदी चित्रपट हे बहुसंख्य वेळा रेल्वेस्टेशनवरच येऊन का संपतात हे मला पडलेले एक कोडेच आहे. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या तिसरी कसमचा शेवटही रेल्वे स्टेशनवरच होतो; पण तो तसा होणे हे कथेच्या संदर्भात अत्यंत अपरिहार्य होते. येथे हा शेवट अशोकच्या घरीही करता आला असता, असो.
कैफी आझमी यांची गीते आणि हेमंतकुमार यांचे संगीत यांनी चित्रपटाच्या सौंदर्यात आणि आशयात मोलाची भर घातली होती. संगीतातील माधुर्य अनुभवाचे असले तर हेमंतकुमारचे संगीत ऐकावे. रवींद्र संगीताच्या अभ्यासामुळे त्यांच्या रचनांना गंभीर बैठक प्राप्त झाली आहे. ‘या दिल कि सुनो दुनियावालो’ या गाण्यावर आणि प्रसंगावर ‘जाने वो कैसे लोग थे’ या ‘प्यासा’मधील गाण्याची जरासी छाया जाणवते; पण उमाच्या जीवनाचे अत्यंत नेमकेपण वर्णन कैफी आझमींनी त्या गाण्यात केले होते.

ये फूल चमन में कैसा खिला, माली की नजर में प्यार नहीं
हसते हुए क्या क्या देख लिख अब बहते है आसूं बहने दो ।
अनिताच्या घरी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत अशोक हे गाणे म्हणतो खरा; पण त्याच्या डोळ्यांसमोर उमा आणि तिची कहाणीच असते. उमाचाही वाढदिवस याच दिवशी आहे; पण स्वत:च्या जन्माच्या दिवशीच आईचा मृत्यू झाल्यामुळे तिला वाढदिवस साजरा करण्यात रस नाही हे अशोकला थोड्या वेळापूर्वीच समजलेले असते. पार्टीत अनिता मंत्रमुग्ध होऊन हे गाणे ऐकते आणि उमाचे एक आजवर न जाणवलेले रूप तिच्यासमोर येते. उमाचे दु:ख तिच्या परिस्थितीतून सुटका करण्यासाठी प्रयत्न करू लागते.
‘भिगी भिगी फिजा’ हे खास आशा-स्टाईल गाणे त्यांच्या सर्वोत्तम गाण्यांपैकी एक आहे. शशीकलाने ते सादरही मोठ्या झोकात केले आहे.
‘धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार’ हे लतादीदींचे गाणे गाजले; पण मी शिफारस करीन ती ‘कुछ दिल ने कहा, कुछ भी नही…’ या कवितेची. या गीतात नायिकेची मनस्थिती अचूकपणे पकडताना कैफींनी केलेली न बोलताही संवाद होऊ शकतो ही कल्पनाच चटका लावणारी होती.
लताबाईंच्या आवाजात हे गाणे ऐकणे हा एक प्रसन्न करणारा अनुभव आहे. स्वत:शीच गुणगुणल्यासारखा अतिशय हळूवार आवाज आणि त्याला तितक्याच हळूवार संगीताची साथ… हे गाणे चित्रपटात ज्या पद्धतीने सादर केले होते त्यामुळे सोन्याला सुगंध लाभावा तसे काहीसे अनुभवायला मिळाले होते.
सकाळची प्रसन्न दव भरलेली वेळ. महाबळेश्वरची नयनरम्य वनश्री. दूर धुक्याने नटलेले डोंगर. अशोक टेकडीवर फिरण्यासाठी बाहेर पडला आहे. दूरवर, पायथ्याशी उमा गाणे गात फिरत आहे. आजूबाजूला कुणी नाही म्हणून तिला आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी सापडली आहे ती स्वत:तच दंग होऊन गाते –
कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं…
ऐसी भी बातें होती हैं, ऐसी भी बातें होती हैं…
जी मुलगी आजवर चार शब्द बोललीही नाही तिच्या तोंडचे गाणे ऐकताना अशोक प्रथम चकित होतो आणि मग मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहतो. मौनातून शब्द उमटणे ही तर कवितेची खूण असते. एका कवितेचा जन्म होताना एक लेखक पाहत असतो. त्याच्या मनाचे धागे तिच्याशी जुळायला सुरुवात झालेली असते.
गाणे म्हणत म्हणत उमा टेकडी चढू लागते. वर कुणी आपले गाणे प्राण कानात आणून ऐकतो आहे, याची जाणीव तिला नाही. ती आपल्यातच दंग आहे…
पलकों की थंडी सेज पर, सपनों की कलीयां सोती हैं,
ऐसी भी बातें होती हैं, ऐसी भी बातें होती हैं ।
पण असे स्वत:चे मन शोधता शोधता तिच्या हाती लागते ते आपले अतीव एकलेपण.
जीवन तो सुना ही रहा, सब समझे आई हैं बहार
कलियों से कोई पूछता, हसती हैं या वो रोती है
ऐसी भी बातें होती हैं, ऐसी भी बातें होती हैं ।
आपल्याशीच गुणगुणत ती वाट चढून येते आणि गाणे संपते. त्यावेळी तिच्यासमोर असतो अशोक. जणू तिच्या एकाकीपणाचा शेवट करण्यासाठी नियतीने पाठविलेले उत्तरच…

जयवंत पठारे यांनी महाबळेश्वरच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर हे गाणे चित्रित करताना गीतातला आणि संगीतातला गोडवा प्रत्यक्ष पडद्यावर साकार केला होता. त्यांच्या छायाचित्रणामुळे चित्रपटाचे सौंदर्य अधिकच खुलले होते. त्यांना या चित्रपटासाठी उत्कृष्ट छायाचित्रणाचे फिल्मफेअर पारितोषिक मिळाले.
‘अनुपमा’मधील चित्रणाचे सुजाता किंवा ‘परख’मधील बिनमदांच्या चित्रणाशी फार साम्य आहे. व्यावसायिक सिनेमा आणि कलात्मक सिनेमा यांच्यातील सीमारेषा पुसून टाकत मधल्या मार्गाने जाणारा चांगला सिनेमा देण्याची बिमल रॉय यांची परंपरा ते वारल्यानंतर गुलजार आणि ऋषिकेश मुखर्जी या त्यांच्या दोन शिष्यांनी आणखी पुढे नेली. हा चित्रपट ऋषिकेश मुखर्जी यांनी त्यांचेे गुरू बिमल रॉय यांना अर्पण केला आहे. एक शिष्य गुरूला याहून उत्तम कोणती श्रद्धांजली वाहू शकतो?
– विजय पाडळकर
9867598836

Website | + posts

Leave a comment